Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नेपाळच्या महापुरात महाराष्ट्रातील 9 भाविकांचा संपर्क तुटला

नेपाळच्या महापुरात महाराष्ट्रातील 9 भाविकांचा संपर्क तुटला

Mumbai Live 3 days ago

मात्र, या नऊ जणांच्या मृत्यूची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यांचा सध्या ठावठिकाणा समजू शकलेला नसून, महाराष्ट्र सरकार, जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून त्यांच्या कुटुंबीयांशी समन्वय साधत शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार संपर्क होऊ न शकलेल्या भाविकांमध्ये—

रेखा सतीश पाटणकर

सतीश विनायक पाटणकर

अपर्णा समीर जोशी

समीर मुकुंद जोशी

सुनील सुदर्शन सुभेदार

संजय राजमल पाटील

नलिनी संजय पाटील

राजनिश रघुनाथ नातू

यशस भांड — वाशी, नवी मुंबई

यांचा समावेश आहे.

ठाण्यातील रेखा पाटणकर आणि सतीश पाटणकर हे 27 भाविकांच्या समूहासोबत प्रवास करत होते. 25 ऑगस्टच्या रात्री त्यांच्याशी शेवटचा संपर्क झाला. 26 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 8.27 वाजता समूहातील एका व्यक्तीने ते चिनी इमिग्रेशन पॉइंटवर पोहोचल्याची माहिती नातेवाईकांना दिली. त्यानंतर मात्र संपर्क तुटला.

नौपाडा येथील अपर्णा जोशी आणि समीर जोशी हे देखील कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. 26 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता त्यांच्याशी शेवटचा संपर्क झाला. त्यावेळी ते नेपाळ-चीन सीमेच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली.

तर राजनिश रघुनाथ नातू यांच्याशी सकाळी सुमारे 8.05 वाजता शेवटचा संपर्क झाला. तेही तिबेट-नेपाळ सीमेच्या परिसरात असल्याचे सांगण्यात आले.

डोंबिवलीतील कासारिओ, पलावा येथील 68 वर्षीय सुनील सुदर्शन सुभेदार हे मुंबईतील 'हिल्स अँड ट्रेल्स' या टूर ऑपरेटरमार्फत कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेले होते.

26 ऑगस्ट रोजी सकाळी 8.28 वाजता नेपाळ-चीन इमिग्रेशन कार्यालयातून त्यांच्याशी शेवटचा संपर्क झाला. त्यांचा मुलगा स्वानंद सुभेदार यांनी वडिलांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित परत आणण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे.

कल्याणमधील संजय राजमल पाटील (60) आणि नलिनी संजय पाटील (56) हेही कैलास-मानसरोवर यात्रेसाठी केरुंग मार्गाने निघाले होते.

या दाम्पत्याचे शेवटचे ठिकाण काठमांडूमधील लाझिम्पाट येथील हॉटेल शंकर असल्याचे समोर आले आहे. हॉटेल प्रशासनाच्या माहितीनुसार, दोघेही 25 ऑगस्टच्या सकाळी हॉटेलमधून निघाले.

त्यांचा नियोजित मार्ग काठमांडू-टिमुरे-रसुवागढी/चीन सीमा-केरुंग असा होता. ते सुमारे 31 भाविकांच्या समूहासोबत प्रवास करत होते. मात्र, ते चीन सीमेपर्यंत पोहोचले की तिबेटमध्ये दाखल झाले, याची अद्याप खात्री झालेली नाही.

वाशीतील यशस भांड हे रसुवा मार्गे टिमुरेकडे प्रवास करत होते. 26 ऑगस्ट रोजी सकाळी 7.15 वाजता त्यांच्याशी संपर्क झाला होता. त्यानंतर सुमारे 8.15 वाजता त्यांच्या मोबाइलवरून मिस्ड कॉल आला; मात्र तो कॉल उचलता आला नाही.

यशस भांड हे काठमांडूस्थित रिचा टूर्समार्फत प्रवास करत असल्याची माहिती प्रशासनाकडे आहे.

रसुवा-भोटेकोशी परिसरातील पुरामुळे महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. महाराष्ट्र सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून परराष्ट्र मंत्रालय तसेच नेपाळमधील संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून संपर्क तुटलेल्या नागरिकांची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

यापूर्वी नेपाळच्या विविध भागात महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकले असल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी 53 जण सुरक्षित असल्याची पुष्टी झाली होती.

दरम्यान, कैलास-मानसरोवर यात्रा पूर्ण करून किंवा यात्रेवर असलेले महाराष्ट्रातील सुमारे 150 भाविक तिबेटमध्ये असल्याचीही माहिती समोर आली होती. सागा येथे अडकलेल्या 37 भाविकांना काठमांडूकडे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.

नेपाळमध्ये असलेल्या आणि संपर्क होऊ न शकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला नाव, मोबाइल क्रमांक, शेवटचे ठिकाण किंवा हॉटेल, टूर ऑपरेटर, प्रवासाचा मार्ग आणि सोबत असलेल्या व्यक्तींची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष:
1077 — टोल फ्री हेल्पलाइन
93723 38827
022-2530174

संपर्क तुटलेल्या या 9 भाविकांच्या मृत्यूची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. प्रशासन त्यांचा ठावठिकाणा आणि सुरक्षिततेची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Live Marathi