मुंबईत पावसाळ्यातील दुर्घटनांची मालिका सुरूच आहे. चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आता दक्षिण मुंबईतील वाळकेश्वरमध्ये इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळून 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे जुन्या सेस इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बाबुलनाथ रोडवरील एका निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग अचानक कोसळला. त्यावेळी इमारतीखाली उभे असलेले 51 वर्षीय संतोष रामचंद्र भारसकर हे ढिगाऱ्याखाली दबले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि पालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखालून भारसकर यांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पालिकेच्या माहितीनुसार, संबंधित इमारत ही म्हाडाच्या मालकीची सेस इमारत आहे. या दुर्घटनेनंतर दक्षिण मुंबईतील जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या देखभाल व सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात भिंती आणि छतांमधून पाणी झिरपल्याने स्टीलला गंज लागतो. लाकडी बीम कमकुवत होतात आणि इमारतींची संरचनात्मक क्षमता कमी होते. त्यामुळे पावसाळ्यात अशा इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना वाढतात.
अवघ्या २४ तासांपूर्वी चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता वाळकेश्वरमधील या दुर्घटनेमुळे मुंबईतील पावसाळी सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

