Dailyhunt

Anjali Damania : भोंदूबाबा खरात प्रकरणात अंजली दमानियांचा मोठा खुलासा

नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर दररोज नव्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणाला आणखी वेग आला तो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या दाव्यामुळे.

त्यांनी खरातच्या मोबाईलचा कॉल डेटा रेकॉर्ड (CDR) आपल्या हाती लागल्याचा दावा केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, या रेकॉर्डमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरातला तब्बल 17 वेळा फोन केल्याची नोंद आढळते.

या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, हा सीडीआर दमानियांकडे नेमका कसा आला, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला. या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली.

दमानिया यांनी सांगितले की, "सीडीआर कुठून आला याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. 31 तारखेपासून मी मुंबईत नव्हते, त्यामुळे मराठी माध्यमांशी संवाद साधता आला नाही. 1 एप्रिलला दुपारी मला एका व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वतःला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह सांगत खरातची संपूर्ण माहिती आणि सीडीआर माझ्याकडे असल्याचे सांगितले."

त्या पुढे म्हणाल्या की, "त्या व्यक्तीने मला सर्व कागदपत्रे पाठवली. रात्री वेळ मिळाल्यानंतर मी ती नीट तपासली. त्यात संबंधित कंपनीची माहितीही होती. ही एक्सेल शीट खरी आहे का, याची खात्री करण्यासाठी मी ती 'क्लॉड'वर तपासली."

या संपूर्ण खुलाशादरम्यान दमानिया भावूक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रूही आले. या प्रकरणामुळे आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook