Dailyhunt

Baramati By Election : "आम्ही विनंती करत राहू!" बारामती निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून बड्या नेत्यांनी सेट केली मोठी फिल्डिंग!

जितदादांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक, शरद पवार आणि ठाकरेंना साद, मात्र काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.

महायुतीकडून सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, ही निवडणूक ‘बिनविरोध’ व्हावी यासाठी सत्ताधारी गटाने कंबर कसली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले की, राजकीय कटुता टाळण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करणे हीच खरी आदरांजली ठरेल, यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील आहोत.

या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) आपला उमेदवार उभा करणार नसल्याचे आधीच जाहीर केल्याने महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, काँग्रेसने आपला उमेदवार घोषित केल्याने पेच निर्माण झाला आहे. सुनेत्रा पवार यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन केला होता, तर भुजबळ यांनी राष्ट्रीय स्तरावर मल्लिकार्जुन खरगे आणि जयराम रमेश यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. “अजितदादा आज आपल्यात नाहीत, अशा कठीण प्रसंगात संघर्षापेक्षा समन्वयाची गरज आहे,” अशी भावना भुजबळांनी व्यक्त केली.

बारामतीच्या राजकीय इतिहासातील ही अत्यंत भावनिक निवडणूक ठरत आहे. शरद पवारांच्या गटाने माघार घेतली असली तरी, काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम राहते की महायुतीच्या विनंतीला मान देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook