Dailyhunt

Commander-in-Chief Fitness Trump : ट्रम्प यांच्या मानसिक संतुलनावर अमेरिकन संसदेत प्रश्नचिन्ह; 'कमांडर इन चीफ' पदावरून जोरदार खडाजंगी

डेमोक्रॅटिक खासदार सारा जेकब्स यांचा थेट सवाल; संरक्षण सचिवांनी 'राष्ट्राध्यक्षांचा अपमान' असल्याचे म्हणत झापले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या वादग्रस्त विधानांवरून पुन्हा एकदा जागतिक राजकारण तापले आहे.

यावेळी खुद्द अमेरिकेच्या ‘हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी’च्या बैठकीत ट्रम्प यांच्या मानसिक स्थिरतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सॅन दिएगोच्या डेमोक्रॅटिक काँग्रेस सदस्या सारा जेकब्स यांनी संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांना थेट सवाल केला की, “डोनाल्ड ट्रम्प हे ‘कमांडर इन चीफ’ पद भूषवण्यासाठी मानसिकदृष्ट्या पुरेसे सक्षम आणि स्थिर आहेत का?” या प्रश्नामुळे बैठकीत उपस्थित असलेले सर्वच नेते अवाक् झाले.

या थेट प्रश्नावर संरक्षण सचिव हेगसेथ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी याला राष्ट्राध्यक्षांचा अपमान संबोधत म्हटले की, “ट्रम्प हे सर्वात गतिमान आणि दूरदर्शी सरसेनापती आहेत.” यावर जेकब्स यांनी ट्रम्प यांच्या काही वादग्रस्त ट्विट्सचा आणि त्यांना येशू ख्रिस्ताच्या रूपात दाखवणाऱ्या एका एआय-निर्मित (AI-generated) फोटोचा संदर्भ दिला. “मी माझ्या मतदारांना हे कसे समजावून सांगू?” असा सवाल करत त्यांनी ट्रम्प यांच्या अजब वागणुकीवर बोट ठेवले. हेगसेथ यांनी प्रतिसवाल करताना विचारले की, “तुम्ही असाच प्रश्न जो बायडेन यांना त्यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात विचारला होता का?”

विशेष म्हणजे, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असतानाच हा वाद समोर आला आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर युद्ध पेटले असून, या काळात ट्रम्प यांनी “एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल” असे खळबळजनक ट्विट केले होते. केवळ विरोधी पक्षच नाही, तर रिपब्लिकन पक्षाच्या काही नेत्यांनीही ट्रम्प यांच्या या युद्धकाळातील मानसिक स्थितीवर शंका उपस्थित केली आहे. सध्या अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात ट्रम्प यांची विधाने आणि देशाची सुरक्षितता यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठी शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook