अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसारखी हेअरस्टाईल आणि ७०० किलो वजन; इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय
बांगलादेशातून सध्या सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय वर्तुळात एक अत्यंत रंजक बातमी समोर आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या ‘हेअरस्टाईल’मुळे बांगलादेशात तुफान लोकप्रिय झालेल्या एका दुर्मिळ अल्बिनो (पांढऱ्या) रेड्याची बकरी ईदनिमित्त दिली जाणारी कुर्बानी अखेरच्या क्षणी टळली आहे. पंतप्रधान तारिक रहमान यांच्या सरकारने थेट मध्यस्थी करत या रेड्याची कुर्बानी रोखली असून, त्याला राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात (National Zoo) कायमस्वरूपी सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सुमारे ७०० किलो वजनाचा हा अनोखा रेडा एका व्यापाऱ्याने ईदच्या कुर्बानीसाठी खरेदी केला होता. मात्र, त्याच्या डोक्यावरील सोनेरी केस आणि त्याची ठेवण हुबेहूब अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखी वाटल्याने इंटरनेटवर त्याचे नाव ‘डोनाल्ड ट्रम्प’ ठेवण्यात आले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांची अलोट गर्दी जमू लागली. वाढता तणाव आणि सुरक्षेची कारणे लक्षात घेऊन बांगलादेशचे गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांच्या आदेशानुसार, सरकारने खरेदीदाराचे पैसे परत केले आणि या प्राण्याला वाचवले. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, ‘डोनाल्ड ट्रम्प’ या नावाने प्राण्याची कुर्बानी दिल्यास कोणताही आंतरराष्ट्रीय किंवा राजनैतिक वाद निर्माण होऊ नये, म्हणून सरकारने हे पाऊल उचलले.
नेमका कसा आहे हा ‘डोनाल्ड ट्रम्प’ रेडा?
बांगलादेशात सहसा काळ्या किंवा गडद राखाडी रंगाचे रेडे आढळतात. मात्र, या रेड्याला ‘अल्बिनिझम’ (Albinism) हा अनुवांशिक बदल आहे. यामुळे त्याच्या शरीरात मेलेनिन तयार होत नाही, परिणामी त्याची त्वचा पांढरी, नाक गुलाबी आणि डोक्यावरील केस सोनेरी दिसतात. ढाक्याजवळील नारायणगंज येथील फार्मचे मालक जियाउद्दीन मृधा यांनी हा चार वर्षांचा रेडा १० महिन्यांपूर्वी खरेदी केला होता. त्याच्या डोक्यावरील केसांची स्टाईल पाहून मृधा यांच्या लहान भावाने गमतीने त्याचे नाव ‘डोनाल्ड ट्रम्प’ ठेवले होते. फार्म मालकांच्या मते, हा रेडा इतर सामान्य प्राण्यांच्या तुलनेत अतिशय शांत स्वभावाचा आहे. त्याला दिवसातून अनेकदा आंघोळ घालावी लागते आणि त्याच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते.
कुर्बानीच्या चक्रातून सुटलेला हा ‘डोनाल्ड ट्रम्प’ रेडा आता ढाक्याच्या नॅशनल झूमध्ये पाठवण्यात आला आहे. प्राणीसंग्रहालयात पोहोचल्यानंतर आता तो पर्यटकांसाठी एक विशेष आणि मोठे आकर्षण ठरेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
