Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Manoj Jaranage Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार; ३० मे पासून थेट उन्हात आमरण उपोषण!

‘मेलो तरी चालेल, पण मागे हटणार नाही’; जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा

मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांवरून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सरकारकडून सातत्याने होणाऱ्या विलंबामुळे संतप्त झालेल्या जरांगे यांनी येत्या ३० मे पासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे ऐतिहासिक आणि अत्यंत कठोर आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. “यावेळी देशात कधीही झाले नसेल इतके टोकाचे उपोषण मी करणार आहे,” असा निर्धार त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.

विशेष म्हणजे, मे महिन्याच्या या रणरणत्या उन्हात जरांगे पाटील कोणत्याही मंडपाशिवाय आणि सावलीशिवाय थेट उघड्यावर उपोषणाला बसणार आहेत. “माझ्या समाजातील मुलांच्या आयुष्याचा उन्हाळा झाला आहे, त्यामुळे मीही उन्हातच बसणार. या आंदोलनादरम्यान उष्माघाताने किंवा इतर कारणाने माझ्या जिवाचे बरे-वाईट झाल्यास त्याला पूर्णपणे राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असतील,” असा थेट आणि गंभीर इशारा त्यांनी दिला आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केल्यानंतरही सरकारकडून कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने जरांगे यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे.

जरांगे पाटील यांनी समाजाला शांत राहण्याचे आवाहन करत म्हटले आहे की, “मी तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी लढत आहे. त्यामुळे कोणत्याही समाजबांधवांनी अंतरवली सराटीकडे गर्दी करू नये किंवा कोणताही उद्रेक करू नये. आपल्याला आपले हक्काचे आरक्षण शांततेच्या मार्गानेच मिळवायचे आहे.” सरकारने वारंवार वेळ मागूनही मराठा कुणबी मंत्रालय स्थापन न करणे, पश्चिम महाराष्ट्रात ओबीसी सदन न बांधणे आणि कुणबी प्रमाणपत्र वाटप रोखणे यांमुळे मराठा समाजात तीव्र असंतोष पसरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook