Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

NEET Paper Leak Update : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट; 'प्लॅटिनम गोल्ड बॅच'च्या माध्यमातून लाखोंची वसुली?

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचले असून केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणात मोठी कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली असून लातूरमधील प्रसिद्ध 'रेणुकाई करिअर सेंटर'चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांच्यानंतर आता बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरूर यांनाही अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनंतर या संपूर्ण प्रकरणाने नवे वळण घेतले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोटेगावकर यांच्या क्लासेसव्यतिरिक्त डॉ. शिरूर यांच्या एका फ्लॅटवर गुप्तपणे 'प्लॅटिनम गोल्ड बॅच' चालवली जात होती. या विशेष बॅचमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे. या रॅकेटमध्ये डॉ. शिरूर, कुलकर्णी आणि मोटेगावकर हे तिघे प्रमुखरीत्या सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

CBI आणि पोलिसांनी पाच डॉक्टरांची चौकशी केल्यानंतर डॉ. मनोज शिरूर यांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाची माहिती दिल्याची चर्चा असून नीटचा पेपर विविध ठिकाणी पोहोचवण्यामध्ये त्यांची भूमिका असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

या प्रकरणाचा तपास सध्या युद्धपातळीवर सुरू असून येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षेतील गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि पैशांच्या जोरावर सुरू असलेल्या रॅकेटमुळे स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook