ओतूर,प्रतिनिधी:दि.२ सप्टेबर [ रमेश तांबे ]
ओतूर येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर तिसरा श्रावणी सोमवार यात्रा पार पडल्यानंतर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,ओतूर ( ता.जुन्नर ) येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी दि.१ सप्टेबर रोजी यात्रा परिसरात प्लास्टिक,कचरा संकलन करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या ८७ स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवत तब्बल १३ ट्रॉली प्लास्टिक कचरा संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. राजेंद्र आंबवणे यांनी दिली. यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने यात्रा परिसरात निर्माण होणारा प्लास्टिक कचरा आणि इतर घनकचरा यामुळे पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स व इतर प्लास्टिक कचरा संकलित करून परिसर स्वच्छ केला. या उपक्रमातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.सुवर्णा डुंबरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचे कार्य केले जात असल्याचे सांगितले. समाजाप्रती आपलेही काहीतरी उत्तरदायित्व आहे, ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रूजणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे संतुलन राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट यांनी विद्यार्थ्यांनी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाने राबविलेल्या या विधायक उपक्रमाचे मनस्वी स्वागत केले. मानवाकडून पर्यावरणावर होत असलेले अतिक्रमण कमी करणे, पर्यावरणाचे संतुलन राखणे आणि प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी राबविलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, समाजामध्ये पर्यावरण संवर्धनाची सकारात्मक जाणीव निर्माण करण्यासाठी तो फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. कल्याण सोनावणे, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. वसंत गावडे, डॉ.राजेश रसाळ, डॉ.किशोर काळदंते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ.विनायक कुंडलिक आणि शिक्षकेतर कर्मचारी निखिल काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. राजेंद्र आंबवणे यांनी आभार मानले.
