Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Rajnath Singh : NEET पेपरफुटी प्रकरणावर राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण चर्चा; NTA अधिकारी आणि वरिष्ठ मंत्र्यांची उपस्थिती

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकार आता अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत केंद्र सरकारमधील अनेक वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) चे महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारीही बैठकीत सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. NEET परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारांबाबत सविस्तर आढावा घेणे, प्रश्नपत्रिका फुटीचे धागेदोरे तपासणे आणि सध्याच्या तपासाची दिशा निश्चित करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणाचा तपास देशभरात वेगाने सुरू केला आहे. विविध राज्यांमध्ये छापेमारी आणि चौकशीची मोहीम राबवण्यात येत असून अनेक संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्या रॅकेटचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती मिळत आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत असताना केंद्र सरकार या प्रकरणात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नवीन उपाययोजना जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook