Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Raqesh Bapat : अभिनेता राकेश बापट झळकणार 'तुझ्याकडे तुला मागणे' मालिकेत; अभिमान सरदेसाईंच्या भूमिकेतून प्रेक्षकांना भुरळ पाडण्यास सज्ज

'नवरी मिळे हिटलरला'च्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनीच्या नव्या मालिकेत राकेश बापट साकारणार राजकारणी, उद्योजक अन् 'सिंगल फादर'ची बहुआयामी भूमिका; वाढदिवसाच्या मुहुर्तावर मालिकेची घोषणा होताच चाहत्यांमध्ये वाढली उत्सुकता.

मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या चार्मिंग आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय अभिनेता राकेश बापट पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतील 'एजे'च्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर, आता राकेशच्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्टार प्रवाह वाहिनीने त्याच्या चाहत्यांना एक भन्नाट सरप्राईज दिले आहे. 'तुझ्याकडे तुला मागणे' असे नाव असलेल्या या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली असून, यात राकेश अत्यंत प्रभावी आणि रुबाबदार अंदाजात झळकणार आहे. या मालिकेत तो 'अभिमान सरदेसाई' हे पात्र साकारत असून, तो एक यशस्वी उद्योजक असण्यासोबतच राजकारणातही सक्रिय असलेला एक प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता असणार आहे. एकाच व्यक्तीच्या व्यावसायिक आणि राजकीय अशा दोन्ही बाजू राकेश आपल्या कसलेल्या अभिनयाने कशा उलगडतात, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून, यात राकेश एका 'सिंगल फादर'च्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'ईशानचा बाबा ही मीच आणि आई सुद्धा मीच,' असे म्हणत त्याने साकारलेली ही भूमिका त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील अत्यंत वेगळ्या धाटणीची ठरणार आहे. वाढदिवसाच्याच दिवशी नव्या मालिकेची घोषणा झाल्यामुळे राकेशच्या चाहत्यांसाठी हा दिवस दुग्धशर्करा योग ठरला आहे. अभिमान सरदेसाईच्या आयुष्यातील गुंतागुंत, त्याचा व्यवसाय, राजकारण आणि वैयक्तिक आयुष्यातील भावनिक प्रवास नेमका कसा असेल, हे पाहण्यासाठी आता प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook