Dailyhunt

Sanjay Raut : "मैत्री जपा, हक्क हिरावू नका!" विधान परिषदेवरून राऊतांनी काँग्रेसला दिला 'राजकीय' डोस

“प्रादेशिक पक्षांच्या हक्कावर डल्ला मारू नका”; विधान परिषदेवरून शिवसेनेचा सणसणीत टोला

विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर करताच महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.

काँग्रेसने या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्यानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी आज आक्रमक पवित्रा घेत काँग्रेसला खडे बोल सुनावले. “काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांनी प्रादेशिक पक्षांच्या हक्कांचे रक्षण करणे गरजेचे आहे; त्यांच्या हक्कावर डल्ला मारू नये,” अशा शब्दांत राऊतांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रहार केला. राज्यसभेचे जागावाटप आणि मित्रपक्षांमधील समन्वय यावरून त्यांनी काँग्रेसला ‘मोठे व्हिजन’ ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेची संख्याबळानुसार ही जागा योग्य आहे आणि पुढील संधी काँग्रेसला दिली जाऊ शकते, यावर चर्चेतून मार्ग काढता येईल. “दिल्लीत आम्ही मोदींविरोधात काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अगदी २०२९ मध्ये काँग्रेसचा पंतप्रधान व्हावा हीच आमची इच्छा आहे,” अशी आठवण करून देतानाच, त्यांनी महाराष्ट्रात मात्र शिवसेनेचा सन्मान राखला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली. महाविकास आघाडीत शिवसेना हा मोठा भाऊ असल्याचे सांगत, छोट्या-मोठ्या पदांसाठी मित्रपक्षांमध्ये संघर्ष होऊ नये, अशी भूमिका राऊतांनी मांडली असून आता काँग्रेस यावर काय प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook