सरसंघचालक मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील दौऱ्यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी देशातील लोकशाही, सांस्कृतिक दहशतवाद आणि तरुणांच्या असंतोषावर भाष्य करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच अकाली दल आणि एकनाथ शिंदेंच्या प्रगती पुस्तकावरूनही त्यांनी जोरदार टोले लगावले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत लवकरच अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील एका परिसंवादात सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी त्यांना एक खोचक आणि मोठे आव्हान दिले आहे. अमेरिकेत मजबूत विचारस्वातंत्र्य असल्याचे सांगत राऊतांनी भागवतांना सुनावले की, त्यांनी अमेरिकेत जाऊन भारतातील कथित हुकूमशाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकारणातील ‘सांस्कृतिक दहशतवाद’, तसेच जंतरमंतरवरील आंदोलन आणि तरुणांच्या उद्रेकावर आपली स्पष्ट भूमिका मांडावी. भारतात काही बोलता आले नाही तरी अमेरिकेत जाऊन त्यांनी देशातील खऱ्या परिस्थितीवर प्रकाश टाकावा, असा टोला राऊतांनी लगावला.
या मुलाखतीत राऊतांनी इतर राजकीय घडामोडींवरही आपले मत व्यक्त केले. अकाली दल पुन्हा भाजपसोबत युती करत असल्याच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की, पंजाबमध्ये भाजपची स्थिती अत्यंत खालावली असून त्यांना पाच जागाही मिळणार नाहीत. त्यामुळे अकाली দलाने एनडीएत जाण्यापूर्वी आपण पूर्वी का बाहेर पडलो याचा विचार करावा, अन्यथा त्यांची उरलीसुरली प्रतिष्ठाही रसातळाला जाईल. याशिवाय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक तपासण्यास सुरुवात केल्याच्या वृेटावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी उपरोधिक टोला लगावला की, “स्वतः उपमुख्यमंत्र्यांपासून संपूर्ण मंत्रिमंडळच नापास आहे, मग ते मंत्र्यांचे प्रगती पुस्तक काय तपासणार? शिंदेंचे मंत्री ATKT ने सुद्धा पास होऊ शकणार नाहीत,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
