Dailyhunt

Sunetra Pawar : "आजची निवडणूक दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी" म्हणत सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना केले भावनिक आवाहन

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयोजित मेळाव्यात त्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधत भावनिक भाषण केलं.

या वेळी बोलताना त्यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. "दोन महिन्यांपूर्वी आपण आपल्या लाडक्या नेत्याला गमावलं. त्यांचं जाणं ही केवळ आमच्या कुटुंबाची नाही, तर बारामती, महाराष्ट्र आणि देशाची मोठी हानी आहे," असे त्या म्हणाल्या.

बारामतीशी असलेलं अजितदादांचं नातं सांगताना त्यांनी विशेष भावनिक शब्दांत प्रतिक्रिया दिली. "बारामती दादांसाठी आईसारखी होती. इथल्या जनतेची सेवा करणे म्हणजे त्यांच्यासाठी श्रद्धेचा विषय होता. बारामती हा त्यांचा श्वास होता आणि शेवटपर्यंत ते या मातीतच रमले," असं त्यांनी नमूद केलं.

सुनेत्रा पवार यांनी पुढे सांगितले की, बारामतीतील प्रत्येक गोष्ट, झाडं, रस्ते, शाळा, इमारती या सगळ्यात अजितदादांचा स्पर्श आहे.. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी जनतेकडे पाठिंबा मागितला आणि म्हटलं, "तुमचं प्रेम आणि साथ हीच माझी खरी ताकद आहे. गेल्या अनेक वर्षांत बारामतीकरांनी अजितदादांवर प्रचंड विश्वास दाखवला. ही निवडणूक म्हणजे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी आहे."

राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने ही पोटनिवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, सर्व पक्ष आणि मतदारांचे लक्ष सध्या बारामतीकडे लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook