Wednesday, 05 May, 4.10 am My महानगर

महामुंबई
१६ जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांमध्ये वाढ

रत्नागिरी, सिंधुदुर्गासह राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये सातत्याने कोरोनाचे सक्रिय रुग्ण वाढत असून त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. केंद्र सरकारकडून सध्या होत असलेल्या पुरवठ्यात २०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करावा. तसेच लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी १० टँकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना सोमवारी पत्र पाठवून केली आहे.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने ऑक्सिजन, रेमडेसिवीर, रुग्ण शय्या यांचा आढावा घेतला जात आहे. राज्याला वाढीव ऑक्सिजनची गरज असून त्याबाबत केंद्र सरकारकडे मागणी करण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले होते. त्यानुसार कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांना पत्र पाठवले आहे.

राज्यात सध्या ६ लाख ६३ हजार ७५८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ७८ हजार ८८४ रुग्ण ऑक्सिजनवर असूनही २४ हजार ७८७ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. त्याचबरोबर राज्यातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या १६ जिल्ह्यांमध्ये सातत्याने सक्रिय रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन ऑडीट केले जात असल्याचे मुख्य सचिवांनी या पत्रात म्हटले आहे.

वाढीव ऑक्सिजन लिफ्टींगची सुविधा राज्याच्या नजीक असावी. सध्या गुजरात जामनगर येथून दिवसाला १२५ मेट्रिक ऑक्सिजन पुरवठा होत असून त्यात १०० मेट्रिक टनाने वाढ करून दिवसाला २२५ मेट्रिक टन आणि भिलाई येथून २३० मेट्रिक टन पुरवठा व्हावा, अशी विनंतीही मुख्य सचिवांनी केली आहे. भौगोलिकदृष्ट्या ही दोन्ही ठिकाणे महाराष्ट्राच्या जवळ असून त्यामुळे वाहतुकीचा कालावधी कमी होण्यास मदत होतानाच रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन देण्यासाठी मदत होईल, असे मुख्य सचिवांनी पत्रात नमूद केले आहे.

केंद्र सरकारला लिक्विड ऑक्सिजन वाहतुकीसाठी सिंगापूर, दुबई आणिअन्य देशांतील तेल उत्पादक कंपन्यांकडून आयएसओ टँकर्स मिळाले आहेत. त्यातील किमान १० टँकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून ओडीशातील अंगुल येथून रोरो सेवेच्या माध्यमातून लिक्विड ऑक्सिजन आणणे सोपे होईल, असेही मुख्य सचिवांनी पत्रात म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top