Tuesday, 11 Aug, 1.00 am My महानगर

क्रीडा
२०२१ मोसमाआधी होणारा आयपीएल 'मेगा लिलाव' रद्द?

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टी-२० स्पर्धा मानली जाते. जगातील आघाडीचे क्रिकेटपटू खेळत असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्यक्ष खेळाइतकेच, कोणता खेळाडू कोणत्या संघातून खेळणार, त्याला किती रक्कम मिळणार, हे जाणून घेण्यासाठीही चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. त्यामुळे प्रत्येक मोसमाआधी होणाऱ्या खेळाडू लिलावालाही मोठा प्रेक्षकवर्ग लाभतो. तसेच प्रत्येक संघासाठीही खेळाडू लिलाव खूप महत्त्वाचा असतो. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील मोसमाआधी होणारा खेळाडूंचा 'मेगा लिलाव' बीसीसीआय रद्द करण्याच्या विचारात आहे.

आताच्या खेळाडूंसहच पुढील मोसमात खेळावे लागणार

पुढील मोसमाआधी होणाऱ्या खेळाडू लिलावात प्रत्येक संघाला शून्यापासून सुरुवात करावी लागेल आणि त्यांना खेळाडू 'रिटेन' करता येणार नाहीत, अशी चर्चा होती. मात्र, कोरोनामुळे बीसीसीआयला लिलाव रद्द करावा लागणार आहे. संघांना आताच्या खेळाडूंसहच पुढील मोसमात खेळावे लागणार आहे. केवळ एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास किंवा तो उपलब्ध नसल्यास, त्याच्या जागी दुसरा खेळाडू निवडण्याची मुभा संघांना असेल. यंदा युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या मोसमाची १० नोव्हेंबरला सांगता होईल. त्यानंतर पुढील मोसमाच्या तयारीसाठी बीसीसीआयला साडेचार महिनेच मिळणार आहे. इतक्या कमी कालावधीत पुन्हा संघ नव्याने उभारण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही असा बीसीसीआयचा अंदाज आहे. त्यामुळेच हा 'मेगा लिलाव' रद्द करण्यात येणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top