Thursday, 08 Aug, 4.40 am My महानगर

क्रीडा
२०२३ वर्ल्डकपचा इतक्यात विचार नाही!

इंग्लंडमध्ये नुकताच झालेला विश्वचषक जिंकण्यात भारताला अपयश आले. मात्र, ही निराशा मागे सोडून भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली. विश्वचषकात साखळी सामन्यांच्या अखेरीस गुणतक्त्यात अव्वल स्थानी असणार्‍या भारताचा उपांत्य फेरीत न्यूझीलंडने पराभव केला, तर न्यूझीलंडवर मात करत इंग्लंडने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. मागील तीन विश्वचषक हे यजमान संघांनी जिंकल्याने २०२३ साली भारतात होणार्‍या या स्पर्धेत चाहत्यांना भारताकडून जेतेपदाची अपेक्षा असणार आहे. मात्र, आम्ही त्या विश्वचषकाचा इतक्यात विचार करणार नाही, असे कर्णधार विराट कोहली म्हणाला.

२०२३ विश्वचषकाला अजून खूप वेळ असल्याने आम्ही त्याबाबत इतक्यात विचार करणार नाही. विश्वचषकाला १२ महिने बाकी असताना तुम्ही खर्‍या अर्थाने या स्पर्धेच्या तयारीला लागता. आमचा पूर्वीपासूनच जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ बनण्याचा प्रयत्न आहे. मागील तीन-चार वर्षांत आम्ही खूप अप्रतिम कामगिरी केली आहे आणि याच कारणामुळे आम्ही जागतिक क्रमावारीत दुसर्‍या स्थानी आहोत. काही वेळा आम्ही अव्वल स्थानही गाठले आहे. भारताला सर्वोत्तम संघ बनवणे आणि जास्तीतजास्त सामने जिंकणे हे लक्ष्य आहे, असे कोहली म्हणाला.

दीपक चहरची कामगिरी उल्लेखनीय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्‍या टी-२० सामन्यात भारताने वेगवान गोलंदाज दीपक चहरला संधी दिली. त्याने या संधीचा उत्तम वापर करत ३ षटकांत अवघ्या ४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. त्यामुळे सामन्यानंतर कर्णधार कोहलीने त्याची स्तुती केली. खेळपट्टीकडून गोलंदाजांना फारशी मदत मिळत नव्हती. मात्र, दीपकने ज्याप्रकारे चेंडू स्विंग केला, ते फारच उल्लेखनीय होते. त्याने सुरुवातीला तीन विकेट्स घेतल्यामुळे विंडीजचा संघ अडचणीत सापडला. त्याने मला खूप प्रभावित केले, असे कोहली म्हणाला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top