Sunday, 19 Jan, 7.26 pm My महानगर

ताज्या बातम्या
आदित्य ठाकरेंच्या 'त्या' निर्णयाच्या अंमलबजावणीला गृहमंत्र्यांची असमर्थता!

पहिली वहिली आमदारकी आणि त्यातच पहिलं वहिलं मंत्रिपद मिळालेल्या आदित्य ठाकरेंनी त्यांचं स्वप्न असलेल्या बाबतीत एक निर्णय वजा घोषणा शुक्रवारी जाहीर केली. मात्र, आता त्याला सरकारमधल्याच इतर विभागांचा विरोध होऊ लागला आहे. '२६ जानेवारीला नाईट लाईफ सुरू करणे शक्य होणार नाही. पोलीस यंत्रणांवर याचा किती ताण येईल याचा आढावा घेतला जाईल', असे सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नाईट लाईफला चक्क खो घातल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान गृहमंत्र्यांनी हे विधान केल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर २६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु होईल, असे आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना सांगितल्यानंतर भाजपाकडून याला विरोध होऊ लागला. मात्र आता चक्क गृहमंत्र्यांनीच २६ जानेवारीला नाईट लाईफ शक्य नसल्याचे सांगितले आहे.

कॅबिनेटमध्ये होणार चर्चा

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'आम्ही लवकरात लवकर या योजनेबाबत आढावा घेऊ. त्यानंतर या योजनेची अंमलबजावणी करायची की नाही यावर निर्णय घेऊ, असे सांगत येत्या २६ जानेवारीपर्यंत या योजनेची अंमलबजावणी होऊ शकेल, असे मला वाटत नसल्याचे सांगितले. तसेच हा विषय कॅबिनेटमध्ये आल्यानंतर त्यावर तिथे सविस्तर चर्चा होईल असे गृहमंत्र्यांनी सांगितले. तसेच कॅबिनेटमध्ये जेव्हा हा विषय चर्चेला येईल तेव्हा त्याचा यंत्रणेवर किती परिणाम होऊ शकतो? यंत्रणा किती वाढवावी लागेल? याचा विचार होईल आणि त्यानंतरच या योजनेची अंमलबजावणी करायची की नाही यावर निर्णय होईल, असे अनिल देशमुख यावेळी म्हणालेत.

कर्मचाऱ्यांच्या २४×७ ड्युटीचं काय?

दरम्यान भाजप आमदार आशिष शेलार यांनी 'लेडिज बारबाबत तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी व्यक्त केलेली भिती राष्ट्रवादीच्या तरी लक्षात आली आहे. शिवसेना नेते स्व. प्रमोद नवलकर यांनी 'भटक्यांच्या भ्रमंतीत रात्रीचा स्वैराचार' जो मांडला तो आता त्यांच्या पक्षाच्या लक्षात येईल का?' असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच 'नाईट लाईफमुळे पोलिसांवर ताण येईल, वाहतूक पोलीस, महापालिका, कामगार विभाग, फूड आणि ड्रग या विभागांना ही २४×७ काम करावे लागेल, याचा विचार हा निर्णय घेण्यापूर्वी करण्यात आलेला नाही. महिला व स्थानिकांच्या सुरक्षेचे काय? तसेच निवासी, अनिवासी भाग याबाबत व्याख्या ही स्पष्ट करण्यात आलेली नाही', याकडे आशिष शेलार यांनी लक्ष वेधले. 'राज्याच्या गृहमंत्र्यांनीच नाईटलाईफमुळे पोलीस यंत्रणेवर ताण येणार हे मान्य करत २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी असमर्थता' दर्शवल्याचे आशिष शेलार म्हणालेत.


काय आहे निर्णय? वाचा सविस्तर!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top