Wednesday, 13 Jan, 9.10 pm My महानगर

महाराष्ट्र
'आम्ही कोरोना योद्धे नाही का' : आरोग्य सेवकांचा सवाल

कोरोना योद्धे म्हणून गौरव करण्यासाठी आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचरिका, तंत्रज्ञ यांचा समावेश केला आहे. मात्र यातून आरोग्य सेवक, कक्ष सेवक यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य सेवक, कक्ष सेवक यांनी संताप व्यक्त करत आम्ही कोरोना योद्धे नाहीत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कोविड १९ साथीच्या कालावधीत जिल्हा रुग्णालयांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या कोरोना योद्ध्याचा एका खासगी संस्थेमार्फत सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कारासाठी खासगी संस्थेने आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालकांकडून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कोरोना योद्धयांची नावे मागवली आहे. या पार्श्वभूमीवर संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आरोग्य सेवा परिमंडळाचे उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना पत्र लिहून त्यांच्या रुग्णालयातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींची नामांकने शिफारशीसह देण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये १० वैद्यकीय अधिकारी, १० अधिपरिचरिका किंवा आरोग्य सेविका, १० सर्व संवर्गातील विविध तंत्रज्ञ, १० आशा कर्मचारी यांचा समावेश असून, प्रत्येक संवर्गातून रुग्णालयांना एकच व्यक्तीचे नामांकन देता येणार आहे. ही नामांकने उपसंचालकांनी १५ जानेवारीपर्यंत आरोग्य सेवा संचालनालयाकडे सादर करण्यास सांगितली आहेत. मात्र कोरोना कालावधीत प्रत्यक्ष रुग्णांच्या संपर्कात असलेले, कोरोना रुग्णांच्या चाचण्या करणे, त्यांना जेवण पुरवणे, औषधे देणे ही कामे प्राधान्यांने करणारे कक्ष सेवक, त्याचप्रमाणे कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात नेणे, रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी नेणे, रुग्णांच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करणे, रुग्णांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करणे ही कामे प्राधान्याने करणारे आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक त्याचप्रमाणे रुग्णालयाची व्यवस्था काटेकोरपणे करणारे शिपाई यांना मात्र यातून वगळले आहे.

कोरोना काळामध्ये जीवावर उदार होऊन काम करूनही आम्हाला उपेक्षीत ठेवले असून, संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी काढलेले पत्र म्हणजे आमच्यावर अन्याय करणारे असल्याची भावना राज्यातील विविध जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवक, कक्ष सेवक, आरोग्य सहाय्यक, शिपाई, डेटा इंट्री ऑपरेटर यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्या पत्रानुसार आम्ही कोरोना योद्धे नाही का? असा प्रश्न निर्माण झाला असल्याचेही आरोग्य सेवकांकडून सांगण्यात आले. यासंदर्भात डॉ. अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top