Thursday, 16 Sep, 2.51 pm My महानगर

ताज्या बातम्या
आतातरी क्रिकेट अकादमी सुरु करावी, गावस्करांसाठी निर्णय बदल्याचे आव्हाडांचे ट्विट

मंत्री म्हणून मी प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता परंतु सुनिल गावस्करसाठी बदलला आतातरी सुनिल गावस्करने तिथे क्रिकेट अकादमी सुरु करावी एवढीच इच्छा असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. गावस्करांनी आतातरी अकादमी सुरु करावी असे स्पष्ट वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. अनेक वर्षांपुर्वी भारतीय माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना बांद्रा येथे म्हाडाचा प्लॉट क्रिकेट अकादमी सुरु करण्यासाठी दिला होता. गावस्करांनी अकादमी अद्याप सुरु केली नसल्यामुळे हा प्लॉट ताब्यात घेण्याची तयारी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. परंतु हा निर्णय रद्द केला असून आता लवकरात लवकर त्या ठिकाणी क्रिकेट अकादमी सुरु करावी अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत क्रिकेटपटू सुनिल गावस्करवर खोचक निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, जर सुनिल गावस्कर नसता तर कदाचित त्याला आज देण्यात आलेला म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता. ज्या दिवशी सुनिल गावस्कर फिलिप्स डिफ्रायटेस च्या चेंडूवरती त्रिफळाचीत झाला. त्या दिवसापासून जवळ-जवळ माझा क्रिकेट मधला इंटरेस्टच संपला. स्टेडियम मधून रडत बाहेर पडलो होतो. गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनिल गावस्कर साठी बदलला. आतातरी सुनिल गावस्करने तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच ईच्छा असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईत बांद्रातील रंगशारदा सभागृहाच्या येथील २१ हजार ३४८ चौ.फू भूखंड सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला इनडोअर क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासाठी ३१ वर्षांपुर्वी दिला होता. परंतु या भूखंडावर अद्याप बांधकाम करण्यात आले नाही. यामुळे डिसेंबर महिन्यात हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकारने आदेश दिले होते. परंतु राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा करुन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा प्लॉट गावस्कर ट्रस्टकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top