Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
AI Agents : स्वत:च निर्णय घेणारं तंत्रज्ञान

AI Agents : स्वत:च निर्णय घेणारं तंत्रज्ञान

- अमोल जगताप

ज आपण ChatGPT, Google Gemini किंवा इतर एआय साधनांचा वापर करतो. आपण प्रश्न विचारतो आणि एआय उत्तर देतो. पण एआय एजन्ट्स त्यापेक्षा वेगळा आहे. तो केवळ उत्तर देत नाही, तर स्वतःहून काम पूर्ण करण्याचा प्रयत्नही करतो.

म्हणजेच, तुम्ही त्याला एखादं उद्दिष्ट दिलंत. उदाहरणार्थ, माझा पुढच्या आठवड्याचा प्रवास प्लॅन कर.. तर.. तर तो स्वतः माहिती शोधेल, पर्याय तपासेल, वेळ आणि खर्चाचा विचार करेल आणि त्या अनुषंगाने ट्रिपचे संपूर्ण नियोजन तयार करून देईल.


काही वर्षांपूर्वी आपण संगणकाला फक्त एक साधन म्हणून पाहत होतो. आपण सांगितलेलं काम तो करायचा. गणना करणं, माहिती साठवणं किंवा इंटरनेटवर काही शोध घेणं यासाठी आपण प्रामुख्याने त्याचा वापर करायचो. नंतर स्मार्टफोन आले, व्हॉईस असिस्टंट आले आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनू लागली. पण आता एआय एका नव्या टप्प्यावर पोहोचत आहे. हा टप्पा फक्त प्रश्नांची उत्तरं देणार्‍या एआयचा नाही, तर स्वतः विचार करून निर्णय घेणार्‍या एआयचा आहे. या एआयच्या नव्या पिढीलाच एकआय एजन्ट्स म्हणतात.

आज आपण ChatGPT, Google Gemini किंवा इतर एआय साधनांचा वापर करतो. आपण प्रश्न विचारतो आणि एआय उत्तर देतो. पण एआय एजन्ट्स त्यापेक्षा वेगळा आहे. तो केवळ उत्तर देत नाही, तर स्वतःहून काम पूर्ण करण्याचा प्रयत्नही करतो. म्हणजेच, तुम्ही त्याला एखादं उद्दिष्ट दिलंत. उदाहरणार्थ, माझा पुढच्या आठवड्याचा प्रवास प्लॅन कर.. तर.. तर तो स्वतः माहिती शोधेल, पर्याय तपासेल, वेळ आणि खर्चाचा विचार करेल आणि त्या अनुषंगाने ट्रिपचे संपूर्ण नियोजन तयार करून देईल. म्हणजे एआय आता फक्त सहाय्यक राहत नाही; तर तो डिजिटल सहकारी बनू लागला आहे.

एआय एजन्ट्समागची संकल्पना साधी असली तरी तिचे परिणाम खूप मोठे आहे. पारंपरिक सॉफ्टवेअर ठरावीक नियमांवर काम करतं. पण एआय एजन्ट्स परिस्थितीनुसार निर्णय बदलू शकतो. तो अनुभवातून शिकतो, चुका सुधारतो आणि पुढच्या वेळी अधिक चांगलं काम करतो. म्हणजेच, तो केवळ आदेश पाळत नाही, तर उद्दिष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ही संकल्पना आज अनेक क्षेत्रांमध्ये वेगाने वापरली जात आहे. ग्राहक सेवा क्षेत्रात एआय एजन्ट्स ग्राहकांशी संवाद साधून समस्या सोडवत आहेत. बँकिंगमध्ये संशयास्पद व्यवहार ओळखून तात्काळ निर्णय घेत आहेत. आरोग्य क्षेत्रात रुग्णांची माहिती तपासून डॉक्टरांना संभाव्य निदान सुचवत आहेत. काही कंपन्यांमध्ये एआय हे मीटिंगचं नियोजन, ईमेल्सना उत्तरं आणि डेटा विश्लेषण अशी कामं स्वत: करत आहे.

उदाहरण द्यायचे झाले तर, एखाद्या कंपनीत शेकडो ग्राहक तक्रारी येतात, त्यासाठी असंख्य मेल्स येतात. पूर्वी प्रत्येक तक्रार वाचून योग्य विभागाकडे पाठवण्यासाठी माणसांची गरज होती. पण आता एआय एजन्ट्स तक्रार वाचतो, तिचं स्वरूप समजतो, प्राधान्य ठरवतो आणि संबंधित टीमकडे स्वतःहूनच पाठवतो. काही वेळा तो प्राथमिक उपायही सुचवतो. यामुळे वेळ वाचतो आणि कार्यक्षमता वाढते. एआय एजन्ट्सची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची स्वायत्तता. म्हणजेच, सतत मानवी हस्तक्षेपाशिवाय काम करण्याची क्षमता. पण हाच मुद्दा सर्वात जास्त चिंता निर्माण करणारादेखील आहे. कारण मशीन स्वतः निर्णय घेऊ लागली, तर त्यावर नियंत्रण कोणाचं असेल ? हाच मोठा प्रश्न उभा राहतो. कल्पना करा जर भविष्यात एखादी एआय प्रणाली शेअर मार्केटमध्ये व्यवहार करत आहे, हॉस्पिटलमध्ये उपचार प्राधान्य ठरवत आहे किंवा ट्रॅफिक कंट्रोल करत आहे. आणि जर त्या एआयने चुकीचा निर्णय घेतला, तर जबाबदार कोण? मशीन, कंपनी की माणूस? हा प्रश्न आज जगभरातील तज्ज्ञांना सतावत आहे.

एआय एजन्ट्सबाबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोजगार. इतिहास पाहिला तर प्रत्येक तांत्रिक क्रांतीने काही नोकर्‍या बदलल्या आणि नवीन निर्माण केल्या. पण एआय एजन्ट्सचं स्वरूप वेगळं आहे, कारण ते केवळ शारीरिक काम नव्हे, तर विचाराधारित कामही करू लागले आहेत. डेटा एन्ट्री, ग्राहक सेवा, प्राथमिक लेखन, रिपोर्ट तयार करणं अशी अनेक कामं एआय करू शकतो. त्यामुळे भविष्यात नोकर्‍यांचं स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलू शकतं. तरीही, याचा अर्थ माणसाची गरज संपेल असा नाही. एआयकडे वेग, डेटा विश्लेषण आणि सातत्य आहे; पण मानवी मेंदूकडे भावना, नैतिकता, सर्जनशीलता आणि अनुभव आहे. एआय एजन्ट्स निर्णय घेऊ शकतो, पण योग्य काय? हा नैतिक प्रश्न अजूनही माणूसच विचारू शकतो. यामुळे भविष्यात सर्वात महत्त्वाचं कौशल्य कोणतं असेल, तर ते म्हणजे एआयसोबत काम करण्याची आपली क्षमता विकसित करणं. जसं संगणक शिकणं एकेकाळी महत्त्वाचं होतं, तसंच आता एआय समजून घेणं तितकंच आवश्यक होणार आहे.

दुसरीकडे एआय एजन्ट्सच्या वाढीसोबत डेटा गोपनीयतेचाही प्रश्न अधिक गंभीर होत आहे. कारण हे एजन्ट्स आपली सवय, आवडी, संवाद आणि कामाची पद्धत समजून घेतात. म्हणजेच, त्यांच्याकडे आपल्या आयुष्याची मोठी माहिती असते. जर हा डेटा चुकीच्या हातात गेला, तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. जगभरातील सरकारं आणि तंत्रज्ञान कंपन्या एआयसाठी नियम तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. एआय किती स्वतंत्र असावा? त्याच्या निर्णयांवर मानवी नियंत्रण किती असावं? डेटा सुरक्षित कसा ठेवावा? या प्रश्नांवर चर्चा सुरू आहे. कारण एआय जितका शक्तिशाली होत आहे, तितकी त्याच्या वापराची जबाबदारी वाढत आहे. भारतासाठीही एआय एजन्ट्स मोठी संधी ठरू शकतात. शिक्षण, शेती, आरोग्य, प्रशासन या सगळ्या क्षेत्रांमध्ये एआयचा वापर करून कार्यक्षमता वाढवता येऊ शकते.

ग्रामीण भागात एआय आधारित आरोग्य सहाय्यक, शेतकर्‍यांसाठी हवामान आणि पीक सल्ला, विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक शिक्षण अशा अनेक शक्यता आहेत. पण यासाठी आवश्यक आहे डिजिटल साक्षरता आणि जागरूकता. कारण तंत्रज्ञान समजून न घेता त्यावर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं. एआय एजन्ट्स ही केवळ आणखी एक टेक्नॉलॉजी नाही; ती काम करण्याची, विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची पद्धत बदलणारी क्रांती आहे. आज एआय आपल्याला मदत करत आहे; उद्या तो आपल्यासोबत काम करेल आणि कदाचित परवा काही निर्णय स्वत: घेईल. त्यामुळे भविष्यात सर्वात मोठं आव्हान मशीन तयार करणं नसेल तर मशीन किती स्वतंत्र असावीत, हे ठरवणं असेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar