Dailyhunt
Albert Einstein : भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन

Albert Einstein : भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन

ल्बर्ट आइनस्टाईन हे जर्मनीत जन्मलेले एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते. आज त्यांचा स्मृतीदिन. सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. आइन्स्टाईन हे सापेक्षतेचा सिद्धांत विकसित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

क्वांटम मेकॅनिक्स सिद्धांताच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म 14 मार्च 1879 रोजी जर्मनीतील उल्म या गावी एका ज्यू कुटुंबात झाला. लहानपणी मंद बुद्धीचा आणि एकलकोंडा समजल्या गेलेल्या अल्बर्ट यांना गणित, विज्ञान आणि संगीताची आवड होती. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी बीजगणितातील भौतिकी समीकरणे आत्मसात केली होती.

झ्युरिच (स्वित्झर्लंड) येथील फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलोजीमधून गणित व विज्ञान या विषयातून पदवी घेऊन ते एका पेटंट ऑफिसमध्ये कारकुनाची नोकरी करू लागले. आईन्स्टाईन नोकरी करीत असताना न्यूटनच्या गतीविषयक व गुरुत्वाकर्षण विषयक सिद्धांतावर विचार करायचे. त्यांना विश्वाचा शोध घेण्याची तळमळ लागली होती. प्रकाशविद्युत संबंधीचा (प्रकाशाच्या क्रियेमुळे निर्माण होणार्‍या विजेसंबंधीचा) सिद्धांत व भौतिकीतील त्यांच्या इतर सैद्धांतिक कार्याकरिता आइन्स्टाईन यांना 1921 मध्ये भौतिकी विषयाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

दुसर्‍या महायुद्धानंतर आइन्स्टाईन यांनी जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणार्‍या शास्त्रज्ञांमध्ये अग्रस्थानी भाग घेतला. जागतिक सरकार प्रस्थापित करण्याच्या कल्पनेचा त्यांनी जोरदार पुरस्कार केला. नाझी जर्मनीतून अमेरिकेत आलेल्या अनेक निर्वासितांना मदत करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो व अमेरिकेच्या नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. त्यांचे 300 हून अधिक शास्त्रीय प्रबंध व इतर विषयांवरील ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. आईनस्टाईन यांचे 18 एप्रिल 1955 रोजी निधन झाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar