Friday, 11 Jun, 12.10 am My महानगर

महाराष्ट्र
अमावस्येला झाला कांदा लिलाव, ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच

आशिया खंडात अग्रेसर कांदा बाजारपेठ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात प्रथमच 75 वर्षांच्या इतिहासात अमावस्येच्या दिवशी कांदा लिलाव झाले. बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे आणि व्यापार्‍यांनी परम पूज्य भगरी बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करत फटाक्यांची आतषबाजी केल्यानंतर लिलाव प्रक्रिया सुरू झाली. यामुळे अंधश्रद्धेचे मळभ अखेर दूर झाले.

या दिवशी पहिल्या वाहनातील कांद्याला 2251 रुपये इतक्या बाजार भावाने वेफकोमार्फत नाफेडने खरेदी केले. गेल्या ७५ वर्षांपासून अमावस्येला कांदा लिलाव बंद ठेवण्याची परंपरा होती. मात्र, बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी व्यापारी वर्गाशी चर्चेतून अमावस्येला कांदा लिलाव सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. त्याला व्यापारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ऐतिहासीक निर्णय होऊन अमावस्येला कांदा लिलाव झाले. शेतकर्‍यांच्या हितासाठी केंद्र सरकारतर्फे प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीची राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली. 1 एप्रिल 1947 मध्ये लासलगाव बाजार समितीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत 75 वर्षांपासून एक परंपरा अवलंबली जात होती, ती म्हणजे दर महिन्याला येणार्‍या अमावस्येला कांद्याचे लिलाव बंद ठेवणे. या परंपरेला फाटा देत आज अमावस्येच्या दिवशी लिलाव करण्यात आले. 871 वाहनांतील 17 हजार क्विंटल कांद्याला कमाल 2251 रुपये, किमान 700 रुपये, तर सर्वसाधारण 1800 रुपये इतका बाजारभाव मिळाला.

महिन्याच्या दर अमावस्येला लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद राहत होते. मात्र, गुरुवारी अमावस्या असतानाही ऐतिहासीक निर्णय होऊन कांद्याचे लिलाव सुरू करण्यात आले. पहिल्या ट्रॅक्टरमधील कांद्याला 2251 रुपये इतका प्रतिक्विंटल भाव मिळाला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top