Tuesday, 19 Jan, 7.40 am My महानगर

फिचर्स
अंतर्विरोधाच्या चक्रव्यूहात अमेरिका

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले तेव्हापासूनच त्या देशात विरोधी पक्षातील लोकांचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यावेळी बिल क्लिंटन यांच्या पत्नी आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार याच निवडून येतील, असे वातावरण असताना डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आल्यामुळे अनेकांना धक्का बसला. कारण डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राजकारणात सक्रिय असलेले राजकीय नेते नव्हते, ते राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी त्यांना फारसे कुणी ओळखतही नव्हते. डोनाल्ड ट्रम्प यांचा पूर्वेतिहास नंतर उजेडात आला, त्यावेळी अनेकांना आश्चर्य वाटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडून येऊन त्यांच्या विरोधकांप्रमाणे अन्य देशातील लोकांनाही धक्का दिला. ट्रम्प निवडून आल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या समर्थकांना हा विजय पचवता आला नाही. त्यामुळे ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी निषेध आंदोलने केली. पण ते विरोधक काहीही करू शकत नव्हते. शेवटी नाईलाजास्तव त्यांना आपला पराभव मान्य करावा लागला. पण आता चार वर्षांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला, तेव्हा मात्र परिस्थिती हिलरी समर्थकांपेक्षा भयंकर झाल्याचे दिसून आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाचा वापर करून निवडणुकांचा प्रचार करताना विरोधकांचा अपप्रचार केलाच, पण त्याचबरोबर आपला पराभव झाला तर मी अमेरिका सोडून जाईन, अशा भंपक धमक्या द्यायला सुरुवात केली. पुढे निवडणुकीसाठी मतदान झाले आणि ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे प्रचंड खवळले आणि कुठल्याही परिस्थितीत आपण राष्ट्राध्यक्षपद सोडणार नाही, असे सांगून व्हाईट हाऊसमधून बाहेर पडण्यास ठाम नकार दिला. असा प्रकार अमेरिकेच्या आजवरच्या कुठल्याही राष्ट्राध्यक्षाने केला नव्हता. हा अतिशय बालिश प्रकार होता. हा प्रकार म्हणजे एखाद्या लहान मुलाने दुकानातील खेळण्याचा हट्ट करून जमिनीवर लोळण घेण्यासारखे आहे. पण त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे होते, की आपण लहान मूल नाही तर अमेरिकेसारख्या जगातील सर्वात बलशाली देशाचे राष्ट्राध्यक्ष आहोत.
डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी त्यांच्या चार वर्षांच्या कारकिर्दीत काय केले हाच एक खरे तर संशोधनाचा विषय आहे. आपली मनमौजी जीवनशैली आणि बेताल विधाने यांच्यासाठीच ते त्यांच्या कार्यकालात चर्चेत राहिले. त्यात खास करून महिलांविषयी त्यांनी केलेली आक्षेपार्ह विधाने चर्चेचा विषय झाली. पण आपल्याला कोण काय म्हणतेय त्याचा त्यांना ना खेद होता ना, त्यांना त्यांची खंत होती. ते बिनधास्त आणि बेधडक होते. त्यांनी चार वर्षांपूर्वी आपल्या निवडणूक प्रचाराच्या वेळी लोकांना अव्वाच्या सव्वा आश्वासने दिली होती. त्यांनी निवडणूक प्रचारात ही घोषणा केली होती की, अमेरिका फॉर अमेरिकन्स. म्हणजे अमेरिकेमध्ये अमेरिकी लोकांच्या हितासाठी निर्णय घेतले जातील. निर्णय घेताना अमेरिकी नागरिकांना प्राधान्य देण्यात येईल. इतकेच नव्हे तर जे लोक छुप्या मार्गाने अमेरिकेत प्रवेश करतात, त्यांना रोखण्यासाठी मी उंच भिंत उभी करेन. ती इतकी उंच असेल की, कुणाला उडी मारूनही आतमध्ये येता येणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणाबाजी म्हणजे मी हे करेन, ते करेन, आकाशाला शिडी लावीन, अशा स्वरूपाची होती. सर्व काही मी फक्त अमेरिकी नागरिकांसाठी करेन, बिगर अमेरिकनांशी मला काही देणेघेणे नाही, असा त्यांचा प्रचारकाळातील पवित्रा होता. पण त्यांना या गोष्टीचा विसर पडला की, अमेरिकेमध्ये बाहेरून आलेल्या लोकांचे अमेरिकेच्या विकासात आणि अर्थकारणात मोठे योगदान आहे. आज अमेरिकेचा जो विविधांगी विकास झालेला आहे, त्याचे कारण जगभरातील विविध भागातील लोक तिथे गेलेले आहेत. तिथे त्यांच्या प्रतिभेला मोकळा वाव आणि प्रोत्साहन मिळालेले आहे. हाच अमेरिकेच्या विकासाचा गाभा आहे. पण या विविधेचाच ट्रम्प यांना विसर पडला. ट्रम्प हे हिटलरी धोरण राबवायला गेले. जसे हिटलर म्हणत असे की, जगावर राज्य करायला केवळ जर्मनीतील आर्य वंशीय लोक लायक आहेत. पण हिटलरचा अतिरेक पुढे त्याला महागात पडला. त्याला स्वत:वर गोळी झाडून आपले जीवन संपवावे लागले. जग आणि निसर्ग हा विविधतेवर टिकून असतो. जंगलात केवळ एकाच प्रकारची झाडे असत नाहीत, विविध प्रकारची असतात, त्यामुळेच ती वाढतात आणि टिकून राहतात. सगळी झाडे एकसारखी असली तर सगळीच झाडे नष्ट होऊन जातील.
अमेरिकेच्या विकासात भारतीय लोकांचेही मोठे योगदान आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'मध्ये अनेक भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आहेत. तसेच मोठ्या संख्येने भारतीय डॉक्टर्स आहेत. अमेरिकी विद्यापीठांमध्ये भारतीय प्राध्यापक आहेत. अमेरिकेत अनेक भारतीय उद्योजक आहेत. इतकेच नव्हे तर अलीकडेच अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत ३५ भारतीय वंशाचे लोक उतरले होते. त्यापैकी काही विजयी झाले. असे विविध देशांमधील लोक अमेरिकेत गेलेले आहेत. त्यांनी अमेरिकेच्या विकासात आपले मोठे योगदान दिलेले आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी विशेषत: बाहेरून अमेरिकत जाणार्‍या तरुणांना मोठा धक्का दिला. बाहेरून अमेरिकेत शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने येणारे तरुण हे अमेरिकेतील तरुणांच्या रोजगाराच्या संधी हिरावतात, असे ट्रम्प यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी बाहेरून येणार्‍या तरुणांच्या व्हिसावर बंधणे आणली. त्यामुळे विशेषत: भारतीय तरुणांना त्याचा फटका बसला. आज अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय आहेत, त्यांच्या संख्याबळाचा अमेरिकेतील निवडणुकांवर परिमाण होत असतो. त्यात पुन्हा जे अमेरिकेत गेलेले भारतीय आहेत, हे उच्च शिक्षित आहेत. त्याचा फायदा अमेरिकेला होत आहे.
अमेरिकेत अलीकडच्या वर्षांमध्ये स्थानिक अमेरिकनांच्या तुलनेत बाहेरून अमेरिकेत गेलेले लोक जिद्दीने अभ्यास करतात, अधिक मेहनत घेतात आणि यशस्वी होतात. पण त्याच वेळी स्थानिक अमेरिकन तरुण ऐदी आणि आळसात जगताना दिसतात, कारण अमेरिकेतील तरुणांना सरकारकडून भत्ता मिळतो. त्यामुळे एक प्रकारची सुस्तावस्था त्यांच्यामध्ये आलेली दिसते. बिल क्लिंटन हे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी अमेरिकेतील विद्यापीठांच्या प्रमुखांची एक बैठक बोलाविली होती. त्यावेळी त्यांनी त्यांना विचारले होते, अमेरिकेत बाहेरून आलेले तरुण विविध क्षेत्रात चमकताना दिसत आहेत, तर मग अमेरिकेतील तरुण वर्ग काय करतोय, त्यावर विद्यापीठांच्या प्रमुखांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. आम्ही श्रीमंत देशाचे नागरिक आहोत. सरकारने आमची सगळी सोय करावी. आम्ही फार परिश्रम करणार नाही, ही मानसिकता अमेरिकन तरुणाईमध्ये वाढत आहे. अमेरिकेत जसा शिक्षित वर्ग आहे, तशीच अर्धशिक्षितांचीही मोठी संख्या आहे. त्यांना सरकारकडून सगळे काही मोफत हवे आहे. ट्रम्प यांच्या समर्थकांमध्ये अशा लोकांचा मोठा भरणा आहे. नुकताच ज्यांनी कॅपिटॉल हिलवर हल्ला केला ते हेच लोक आहेत. हा हल्ला म्हणजे अमेरिकेतील आंतर्विरोधाचा उद्रेक आहे. तो पुढील काळात अमेरिकेतील राजकीय नेत्यांना जागरुकतेने हाताळावा लागणार आहे. पण त्यासाठी अमेरिकेचे दरवाजे इतरांना बंद करणे हा पर्याय नक्कीच नाही.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top