Tuesday, 19 Jan, 2.49 am My महानगर

महाराष्ट्र
अर्णब गोस्वामीप्रकरण : मुंबईत सुरक्षा यंत्रणांची मंगळवारी बैठक

रिपब्लिकन वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी व 'बार्क'चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचे ५०० पानांचे संभाषण व्हायरल झाले आहे. यामध्ये देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदशील गोष्टी समोर आल्या आहेत. यात बालाकोट, पुलवामा याचीही माहिती गोस्वामींकडे कशी आली, याची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि.१९) मुंबईत तपासी अधिकार्‍यांसह सुरक्षा यंत्रणांची महत्वाची बैठक घेण्यात येणार आहेे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाशिक शासकीय विश्रामगृह येथे दिली.

अनिल देशमुख सोमवारी नाशिक दौर्‍यावर आले होते. त्यांनी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. अर्णब गोस्वामी आणि पार्थोदास गुप्ता यांना लष्करी कारवाईची गोपनीय माहिती आणि पुलवामा हल्ल्याबाबतची माहिती कशी मिळते, असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला. याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेची माहिती दोघांच्या संभाषणामधून पुढे आल्याने केंद्र व राज्य सरकार सतर्क झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

देशमुख म्हणाले, नगरपालिका असो की महापालिका यापुढे राज्यात सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी असणार आहे. ग्रामपंचायतीप्रमाणेच यापुढेही असेच निकाल पहावयास मिळतील. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचे निकाल हाती आली असून यात आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसने विजय मिळवला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये जसा संदेश राज्यभरात गेला तसाच या निवडणुकांमधून जात असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे पुढील सर्व निवडणुकांमध्ये हेच चित्र दिसेल. विरोधी पक्ष मुंगेरीलालची स्वप्न पाहत आहेत. ती त्यांनी सोडून दिली पाहिजेत, असा टोलाही त्यांनी लगावला. नामांतराच्या बाबतीत महाआघाडीची समन्वय समिती आहे. यात सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते आहेत. ते याबाबत निर्णय घेणार आहेत.

पोलिसांच्या गणवेशाबाबत बोलताना देशमुख म्हणाले, काही दिवसांपूर्वी राज्याचे पोलीस महासंचालक व वरिष्ठ अधिकार्‍यांना जेवणासाठी बोलावले होते. त्यावेळी झालेल्या चेर्चेत काही सूचना त्यांनी केल्या. यामध्ये उपसंचालक सीवानंदन यांनी महाराष्ट्र पोलिसांचा ड्रेसकोड बदलाचा विषय सांगितला होता. त्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top