Dailyhunt
Ashok Kharat Case : खरात 'कनेक्शन' मुळे महसूल अधिकाऱ्यांची नोकरी धोक्यात

Ashok Kharat Case : खरात 'कनेक्शन' मुळे महसूल अधिकाऱ्यांची नोकरी धोक्यात

नाशिक । भोंदू अशोक खरात याच्याशी लागेबांधे असलेल्या तसेच त्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करणार्‍या महसूल विभागातील अधिकार्‍यांची माहिती घेण्यात येत आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर या अधिकार्‍यांना सेवेत ठेवायचे की नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे आता खरात प्रकरणात सहभागी महसूल अधिकार्‍यांची नोकरी धोक्यात येण्याची शक्यता आहे.

भोंदू अशोक खरातने शासकीय अधिकार्‍यांच्या मदतीने अनेक गैरकारभार केल्याचे आता समोर आले आहे. महसूलसह पोलीस प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांची खरातसोबत उठबस असल्याचेही सांगितले जाते. अनेक अधिकारी त्याच्याकडे नेहमी येत. तर अनेक अधिकार्‍यांसमवेत तर काही अधिकार्‍यांच्या कुटुंबियांसमवेत खरातची सामाईक मालमत्ता असल्याचेही समोर आले आहे. सिन्नरमध्ये काही अधिकार्‍यांच्या मदतीने त्याने मोठी संपत्ती कमावल्याचेही सूत्रांकडून समजते. बड्या राजकीय नेत्यांशी असलेल्या संबंधाचा फायदा घेत खरात प्रशासनातील बदल्यांमध्येही हस्तक्षेप करत असल्याचे सांगितले जाते.

काही वर्षांपूर्वी नाशिक जिल्हाधिकार्‍यांच्या नियुक्तीसाठीही त्याने मर्जीतील अधिकार्‍यांच्या नावाची शिफारस केल्याचेही समोर आले आहे. अशोक खरात आणि अधिकार्‍यांचे इतके घनिष्ठ संबंध होते की, खरातच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात काही अधिकारी कुटुंबातील सोहळ्याप्रमाणे या कार्यक्रमात दोन दिवस उपस्थित असल्याचेही समोर आले आहे. नाशिकमध्ये कार्यरत एक तत्कालीन महिला आयएएस अधिकार्‍याचाही खरातशी कनेक्शन असल्याचे पुढे येत असून ही अधिकारीही चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यातही खरातने अधिकार्‍यांच्या संगनमताने तसेच काही ठिकाणी तर अधिकार्‍यांसमवेत जमिनी खरेदी केल्या. या एकूणच सर्व प्रकरणांचा तपास यंत्रणेमार्फत चौकशी सुरू आहे. या प्रकरणात कोण कोण अधिकारी सहभागी आहेत, त्यांचा खरातशी संबंध कसा आला, त्यांच्यामार्फत खरातला कशा प्रकारे मदत केली गेली याची माहिती घेतली जात असून चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या अधिकार्‍यांना नोकरीत ठेवायचे की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. त्यामुळे आता महसूलमधील ज्या अधिकार्‍यांचे खरातशी कनेक्शन आहे अशा अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

गोपनीय चौकशी सुरू
दरम्यान, एसआयटीमार्फत याप्रकरणी तपास सुरू असताना आता महसूल मंत्र्यांनी आपल्या यंत्रणेमार्फतही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात कोण कोण महसूल अधिकारी सहभागी आहेत, त्यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कशा प्रकारे खरातला मदत केली, त्याच्याकडे जाणार्‍या अधिकार्‍यांची यादीच मागविण्यात आली असून एका वरिष्ठ अधिकार्‍यामार्फत ही माहिती घेतली जात असून त्यांची नावे महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.

कठोर कारवाई करणार
राज्याच्या संस्कृतीला काळिमा लावणारे हे प्रकरण आहे. एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात सहभागी असलेले कोणीही सुटणार नाही. यात काही अधिकार्‍यांची नावेही समोर येत आहेत. काही नावे आमच्याकडे आली आहेत. महसूल अधिकार्‍यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कसा संबंध आहे, खरातसोबत जमीन व्यवहार करणारे अधिकारी कोण, त्याला मदत करणारे कोण याची माहिती मागविण्यात आली आहे. ही सर्व माहिती आल्यानंतर त्या अधिकार्‍यांना नोकरीत ठेवायचे की नाही याबाबत गांभीर्याने निर्णय घेतला जाईल.
चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar