Assam Election Result 2026 गुवाहटी : आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवलेल्या भाजपला मोठं यश मिळालं आहे. आसाममधील एकूण 126 जागांपैकी 102 जागांवर विजय मिळवत भाजपनं विजयाची हॅट-ट्रिक केली आहे.
दुसरीकडे आसामच्या जनतेने काँग्रेसला सफसेल नाकारलं आहे. काँग्रेसला केवळ 19 जागांवरच विजय मिळवता आला आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी या पाच राज्यांतील बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकांमध्ये केरळ आणि तामिळनाडू वगळता भाजपला प्रचंड मोठं यश मिळालं.
आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडी यांच्यात मुख्य लढत झाली. तसेच, बदरुद्दीन अजमल यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) 27 जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. 9 एप्रिल रोजी आसाम विधानसभा निवडणुकीसाठी मतदार पार पडलं. त्यानंतर सोमवारी (4 मे) या विधानसभेचा निकाल जाहीर झाला.
आसाममध्ये यंदा 85.38 टक्के इतकं विक्रमी मतदान झालं. हे मतदान 1951 साली झालेल्या निवडणुकीनंतरचं सर्वाधिक मतदान ठरलं. राज्यातील 126 विधानसभा मतदारसंघांत एकूण 722 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आसाममध्ये 126 जागांच्या विधानसभेत 64 जागा हा बहुमताचा आकडा असून एनडीनं हा आकडा गाठला.
भाजपा, आसाम गण परिषद (AJP) आणि बोडोलॅण्ड पीपल्स फ्रंट (BPF) या तीन पक्षांनी एनडीएच्या माध्यमातून आसाम विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपला 82 जागा, आसाम गण परिषदेला 10 जागा आणि बोडोलॅण्ड पीपल्स फ्रंटला 10 जागांवर विजय मिळवता आला, विरोधात असलेल्या काँग्रेसला 19 जागा आणि एआययूडीएफ केवळ 2 जागांवर विजय मिळवता आला. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना 1 लाख 27 हजार 151 मतं मिळाली. हिमंता सरमा यांनी काँग्रेसच्या बिदीशा निओग यांचा 89 हजार 434 पराभव केला. बिदीशा निओग यांना 37 हजार 717 मतं मिळाली.
या निवडणुकीत आसामिया, बंगाली भाषिक, मुस्लिम, चहा बागेतील कामगार आणि आदिवासी समाज अशा विविध गटांचा मतदानावर मोठा प्रभाव राहिला आहे. राज्यातील ओळख राजकारण, कल्याणकारी योजना आणि प्रादेशिक आकांक्षा हे या निवडणुकीतील मुख्य मुद्दे ठरले. शिवाय नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (NRC) आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) यांसारख्या मुद्द्यांमुळे आसामची निवडणूक गाजली.
दुसरीकडे बेरोजगारी, महागाई आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर आक्रमक प्रचार करत या निवडणुकीत भाजपला काटे की टक्कर देण्यासाठी काँग्रेसनं सर्व शक्ती पणाला लावली होती. मात्र मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या निवडणुकीत लक्ष केंद्रीत केलेल्या "मामा" आणि "मिया" दोन शब्दांनी काँग्रेसचा दारूण पराभव केला.
"मामा" आणि "मिया" दोन शब्दांमुळे काँग्रेसला केवळ पराभवाचाच सामना करावा लागला नाही तर आसाममधील प्रमुख नेतेही पिछाडीवरच राहिले. आसामचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गौरव गोगई यांना पराभवाचा धक्का बसला आहे. आसामच्या जोहरट विधानसभा मतदारसंघातून जोहरट हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. गौरव गोगई यांच्यासमोर भाजपच्या हितेंद्र नाथ गोस्वामी यांचं आव्हान होतं. मात्र, या निवडणूक भाजपचं आव्हान पेलण्यात काँग्रेसला अपयश आल्यानं गौरव गोगई यांचा परभाव झाला आहे. 23 हजार 182 मतांच्या फरकांनी हितेंद्र नाथ गोस्वामी यांनी पराभव केला आहे. हितेंद्र नाथ गोस्वामी यांना 69 हजार 439 मतं मिळाली.
दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आसाम विधानसभा विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांचाही पराभव झाला. देबब्रत सैकिया यांनी नाजिरा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. नाजिरा मतदारसंघ हा खरंतर देबब्रत सैकिया यांचा बालेकिल्ला होता. मात्र, त्याच बालेकिल्ल्याला भाजपनं खिंडार पाडलं. भाजपचे उमेदवार मयूर बोरगोहेन यांचा विजय झाला आहे. मयूर बोरगोहेन यांना 98 हजार 198 मतं मिळाली. तसेच, देबब्रत सैकिया यांना 51 हजार 497 मतं मिळाली असून त्यांचा 46 हजार 701 मतांनी पराभव झाला.
"मामा" आणि "मिया" शब्दांचा कसा झाला करिष्मा?
आसामच्या निवडणुकीत "मामा" आणि "मिया" हे दोन शब्द हिमंता बिस्वा सरमा यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले. "मामा" आणि "मिया" या दोन शब्दांमागचं राजकारण पाहिलं तर, आसामच्या राजकारणात एकीकडे हिमंता हे महिलांसाठी लाडके "मामा" बनले तर, दुसरीकडे 'मिया' राजकारणावर निशाणा साधत त्यांनी विरोधकांना बचावाची संधीच सोडली नाही.
आसाममध्ये लहान मुलांपासून ते वृद्ध महिलांपर्यंत प्रत्येकजण हिमंता बिस्वा सरमा यांना केवळ मुख्यमंत्री मानत नाही, तर 'मामा' म्हणून त्यांना संबोधत आहेत. राजकारणात अनेक नेते स्वतःला 'सेवक' किंवा 'प्रधान' म्हणतात, पण हिमंता यांनी जनतेशी कौटुंबिक नाते निर्माण केले. या 'मामा' ब्रँडिंगच्या मागे महिलांची एक मोठी आणि निष्ठावान व्होट बँक उभी राहिली. आसामच्या राजकारणात हिमंता बिस्वा सरमा यांनी राजकीय गणितं आखताना महत्त्वाची पावलं टाकली. त्यानुसार, 'अरुणोदयी 2.0' आणि इतर रोख हस्तांतरण योजनांनी थेट बहिणी आणि भाच्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. निवडणुकीत काळात भाजप सरकारकडून योजनांची व्याप्ती वाढवण्यात आली. त्याविरोधात काँग्रेसने महागाईचा मुद्दा मांडला, मात्र ग्रामीण महिलांसाठी 'मामा'कडून येणारी ही थेट मदत मोठा आधार ठरली.
'मिया' पॉलिटिक्स
'मिया' शब्दाचा वापर हिमंता यांनी एका धारदार शस्त्रासारखा केला. आसाममधील लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि बांगलादेशी घुसखोरी हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. हिमंता यांनी यावर 'नो कॉम्प्रमाइज' अशी भूमिका घेतली. रॅलींमधून त्यांनी 'मिया पॉलिटिक्स'वर कडाडून टीका केली आणि त्याला आसामी संस्कृतीसाठी धोका ठरवले. "जर आपली जमीन आणि ओळख वाचवायची असेल, तर स्वदेशी लोकांनी एकत्र यायला हवे", हा त्यांचा नॅरेटिव्ह मतदारांना भावला. शिवाय मदरसे बंद करण्यापासून ते 'लँड जिहाद' विरुद्ध घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे हिंदू आणि स्वदेशी आसामी मतदार पूर्णपणे भाजपकडे वळले.
विकासाचा 'टास्कमास्टर'
केवळ भावना आणि ध्रुवीकरणाने निवडणूक जिंकता येत नाही, हे ओळखून हिमंता यांनी विकासाचा वेग कायम ठेवला. 24/7 काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. रस्ते, नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि तरुणांना लाच न देता सरकारी नोकऱ्या देण्याची त्यांची कार्यपद्धती मतदारांना प्रभावित करून गेली. त्यांच्या या 'प्रोअॅक्टिव्ह गव्हर्नन्स'मुळे राज्यात सत्ताविरोधी लाट कुठेही दिसली नाही.
काँग्रेसचे 'सेल्फ-गोल' आणि गौरव गोगोईंचे अपयश
काँग्रेससाठी ही निवडणूक म्हणजे 'भाजपला विजय भेट देण्यासारखी' ठरली. विरोधी पक्षाचा मुख्य चेहरा असलेले गौरव गोगोई यांचा अधिक वेळ दिल्लीत राहुल गांधींसोबत गेला. संसदेत त्यांनी प्रभावी भाषणं केली, पण जनतेशी संवाद साधण्यात ते अपयशी ठरले. दुसरीकडे, एआययूडीएफ (AIUDF) सोबत आघाडी न करणे काँग्रेससाठी आत्मघातकी ठरले. यामुळे अल्पसंख्याक मतांचं विभाजन झालं आणि 'मिया' नॅरेटिव्हमुळे हिंदू मते एकतर्फी भाजपच्या पारड्यात पडली.
एआययूडीएफचा स्वबळाचा निर्णय चुकला
बदरुद्दीन अजमल यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) 27 जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना केवळ दोन जागांवरच विजय मिळवता आला. बिन्नाकंडी मतदारसंघातून एआययूडीएफचे प्रमुख मोहम्मद बदरुद्दीन अजमल यांनी विजय मिळवला. त्यांना 1 लाख 19 हजार 721 मतं मिळाली असून त्यांनी आसाम गण परिषदेच्या करीम चौधरी (84 हजार 341) यांचा 35 हजार 380 मतांनी पराभव केला.

