Dailyhunt
Bacchu Kadu : झेंडा बदलला असला तरी अजेंडा कायम, बच्चू कडूंचा शिवसेनेत प्रवेश; प्रहारचं काय होणार?

Bacchu Kadu : झेंडा बदलला असला तरी अजेंडा कायम, बच्चू कडूंचा शिवसेनेत प्रवेश; प्रहारचं काय होणार?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील. आधी त्यांनी नाकारले पण ऑफर समोर आली तर नक्कीच विचार करू असे ते बुधवारी, 29 एप्रिल रोजी म्हणाले होते.

त्यानंतर, गुरुवारी (30 एप्रिल) बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हातात धनुष्यबाण हाती घेतला. यावेळी, त्यांनी आमदारकीसाठी नव्हे तर मुद्द्यांसाठी आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे ते यावेळी म्हणाले. मात्र, शिवसेनेत प्रवेश करत असलो तरी प्रहार संघटना समाजसेवेत कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पक्षप्रवेश झाल्यानंतर बच्चू कडू म्हणाले की, "फक्त आमदारकीसाठी नव्हे तर मुद्याच्या लढाईसाठी हा पक्ष प्रवेश केला आहे. ही लढाई पदासाठी नसून लोकांच्या मुद्यांची लढाई आहे. या राज्यात ठिकठिकाणी कामगार-शेतकऱ्यांसाठी शिवसेना उभी करू," असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केले. "आमचा झेंडा बदलला असला तरी आमचा अजेंडा कायम राहणार आहे," असेही ते पुढे म्हणाले. बच्चू कडू यांनी आपला राजकीय पक्ष शिवसेनेत विलीन केला आहे. पण, त्यांची प्रहार ही सामाजिक संघटना पूर्वीप्रमाणेच स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे.

"जिथे आहे तिथे प्रामाणिकपणे, तेवढ्याच ताकदीने राजकारणात इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहेत. सुरुवात शिवसेनेची झाली आणि आता जो शेवटचा जो 15-20 वर्षांचे जे राजकारण असेल ते सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेतच राहिल, अशी ग्वाही देतो," अशी भावना बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केली. "एकनाथ शिंदेंचा स्वभाव सेवाभावी आहे. रात्री 2 वाजतादेखील वर्षा बंगल्याची दारे उघडी होती. देशातील ऐतिहासिक निर्णय दिव्यांग मंत्रालय देण्याचे काम केले. कर्जमाफीमध्ये घेतलेला मोठा पुढाकार निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आणि म्हणून निव्वळ पद नाही तर विचार जुळणे महत्त्वाचे आहे. विचारा सोबत कर्तृत्व महत्वाचे असते त्या दोन्ही गोष्टी आम्ही त्यांच्यामध्ये पाहतो. ही लढाई फक्त पदापुरतीच मर्यादित राहणार नाही तर आम्ही जे मुद्दे दिले दिव्यांगाच बळकटीकरण असेल. मंत्रालयाचे पेरणीच्या कापणीपर्यंत सगळे काम असेल. शेतकऱ्यांचे मजुरांची असेल हमीभावाची लढाई असेल. आमच्या विधवा भगिनीची लढाई असेल कामगारांची लढाई असेल." असेही ते पुढे म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar