Tuesday, 04 May, 11.19 pm My महानगर

होम
बांगलादेश क्रिकेट बोर्डाची घोडचूक; ट्विट बघून अश्विनलाही बसला धक्का

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन स्पष्टवक्ता म्हणून ओळखला जातो. मैदानात असो किंवा मैदानाबाहेर, तो आपले मत मांडायला आणि एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायला कधीही घाबरत नाही. आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) एक घोडचूक केली आणि त्यावर अश्विनने प्रतिक्रिया दिली. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्यांचा दिवंगत क्रिकेटपटू काझी मंजुरूल इस्लाम राणाच्या ३७ व्या जयंतीनिमित्त त्याचे स्मरण केले. राणाचे वयाच्या २२ व्या वर्षी मोटारसायकल अपघातात निधन झाले होते. त्याचे जयंतीनिमित्त स्मरण करताना बांगलादेश बोर्डाने वाढदिवसाच्या शुभेच्छा असे म्हटले. त्यापुढे त्यांनी घोडचूक केली.

२२ वर्ष आणि ३१६ दिवस असे वय असताना मरण पावलेला सर्वात युवा कसोटीपटू, अशी बीसीबीने कॅप्शन दिली

बीसीबीला त्यांची चूक लक्षात आली

'वाढदिवसाच्या शुभेच्छा मंजुरूल इस्लाम राणा. २२ वर्ष आणि ३१६ दिवस असे वय असताना मरण पावलेला सर्वात युवा कसोटीपटू,' असे बीसीबीने लिहिले. बीसीबीची ही कॅप्शन वाचून अश्विन आणि अनेक क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. अश्विनने बीसीबीच्या या ट्विटर पोस्टवर धक्का बसल्याचा इमोजी देत प्रतिक्रिया दिली. अखेर बीसीबीला त्यांची घोडचूक लक्षात आली आणि त्यांनी आपल्या पोस्टमध्ये बदल केला. 'मंजुरूल इस्लाम राणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. बांगलादेशच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक,' अशी नवी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली.

६ कसोटी, २५ वनडेत बांगलादेशचे प्रतिनिधित्व

राणाने २००३ मध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी बांगलादेशकडून पदार्पण केले. या एकदिवसीय सामन्यात त्याने इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉनला तिसऱ्या चेंडूवर बाद केले. बांगलादेशच्या क्रिकेटपटूने त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय षटकात विकेट घेण्याची ही पहिली वेळ होती. त्याने ६ कसोटी आणि २५ एकदिवसीय सामन्यांत बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top