Dailyhunt
Baramati : बारामती पोटनिवडणुकीवरून हालचालींना वेग, रोहित पवार- सपकाळ भेट अन् सुनेत्रा पवारांचा फोन

Baramati : बारामती पोटनिवडणुकीवरून हालचालींना वेग, रोहित पवार- सपकाळ भेट अन् सुनेत्रा पवारांचा फोन

पुणे : बारामती पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 28 जानेवारीला झालेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघासाठी 15 मार्च रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली.

यावेळी दिवंगत अजितदादांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची उमेदवारी महायुतीकडून जाहीर करण्यात आली. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे, ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार असे वाटत असतानाच काँग्रेसने ही निवडणूक लढणार असून आकशा मोरे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यावरून आता राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरु आहेत.

गुरुवारी, 9 एप्रिल ही बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज घेण्याची शेवटची तारीख असल्याने काँग्रेसचे उमेदवार अर्ज मागे घेणार का? अशी चर्चा सुरु आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत असणार असून महायुतीकडून यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अशामध्ये, गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांनी मुंबईमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे. या भेटीत रोहित पवारांचा काँग्रेसचे प्रभारी नेते चेन्नीथला यांच्यासोबतही संवाद झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

रोहित पवारांची भेट महत्त्वाची

बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, यासाठी रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी काँग्रेसने बारामतीतून माघार घ्यावी, अशी विनंती केली. विशेष म्हणजे या चर्चेदरम्यान त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशीही संवाद साधला. बंद दाराआड झालेल्या या बैठकीत रोहित पवार यांनी अजितदादांसारखा मोठा नेता गेल्यानंतर या निवडणुकीकडे भावनिक दृष्टिकोनातून पाहायला हवे, असे म्हटल्याचे सांगितले. काँग्रेसने मात्र आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार प्रकरणात योग्य ती कारवाई आणि तपास व्हायला हवा, असा मुद्दा काँग्रेसकडून मांडण्यात आला. एवढा मोठा नेता गेल्यानंतर जर योग्य तपास होत नसेल, तर सामान्य नागरिकांना न्याय कसा मिळणार? असा सवाल काँग्रेसने त्यांच्यासमोर उपस्थित केला. त्यामुळेच त्यांनी आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

सुनेत्रा पवारांचा पुन्हा एकदा सपकाळांना फोन

बुधवारी (8 एप्रिल) राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी, त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. जवळपास एक तास चाललेल्या बैठकीत बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानंतर, गुरुवारी (9 एप्रिल) सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी दुसऱ्यांदा फोनवरून संवाद साधला. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची त्यांना विनंती करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी, सपकाळ यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याची विनंती सुनेत्रा पवार यांना केल्याची माहिती समोर आली आहे.

आकाश मोरे घेणार शरद पवारांची भेट

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी अजितदादांमुळे या निवडणुकीत उमेदवार न देण्याचे आधीच जाहीर केले होते. त्यानतंर आता या दोघांची भेटही महत्त्वाची ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar