Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बरसानाची शान राधाराणी मंदिर

बरसानाची शान राधाराणी मंदिर

विजय गोळेसर

गात राधाकृष्णाची असंख्य मंदिरं आहेत, परंतु राधा आणि कृष्णाच्या भक्तांचे यातील सर्वात आवडते मंदिर आहे बरसाना येथील श्री राधा राणी मंदिर! हे मंदिर ब्रह्मगिरी टेकडीवर वसलेले आहे, राधा आणि कृष्ण यांनी नंदगाव आणि बरसाना या परिसरात ज्या अनंत लीला केल्या त्यांचे साक्षी हा परिसर आहे आणि त्याचा सर्वोच्च बिंदू आहे ते म्हणजे राधाकृष्ण मंदिर.

आजही या परिसरात राधाकृष्ण यांची अनुभूती भाविकांना येते असं म्हणतात. आयुष्यात एकदा तरी बरसाना येथील या राधाकृष्ण मंदिराला भेट द्यावी ही प्रत्येक राधाकृष्ण भक्ताची इच्छा असते.


भगवान श्रीकृष्णाच्या जीवन लीलेत राधाराणीला अपार महत्त्व आहे. त्यामुळेच जगभरात राधाकृष्णाची असंख्य मंदिरं आहेत. राधाकृष्णाच्या या सर्व मंदिरांचा शिरोमणी आहे ते बरसाना येथील भानगडावरील श्री राधाराणी मंदिर. बरसानाचे मुख्य आकर्षण असलेलं हे राधाराणी मंदिर अतिशय भव्य आणि आकर्षक तर आहेच, परंतु भगवान श्रीकृष्णाच्या प्रपौत्राने सर्वप्रथम निर्माण केलेले हे मंदिर जगभरातील राधाकृष्ण भक्तांचे माहेरघर आहे असे म्हणता येईल. प्रत्येक राधाकृष्ण भक्ताची एकच इच्छा असते ती म्हणजे आयुष्यात एकदा तरी बरसाना येथे जाऊन राधाराणीचे दर्शन घ्यावे. बरसानाचे हृदय आहे हे राधाराणी मंदिर. या मंदिराच्या भोवती बरसाना हे गाव वसलेलं आहे आणि वृषभानू टेकडीच्या सर्वोच्च शिखरावर आहे श्री राधाराणी मंदिर. त्यामुळे या परिसरात येताच तीन ते चार किलोमीटर अंतरावरूनच उंच शिखरावरील आकर्षक राधाराणी मंदिर कुठूनही सर्वप्रथम नजरेस पडतं. या मंदिराच्या प्रवेशद्वारावरील अर्ध गोलाकार घुमटावर लिहिलेलं आहे श्री लाडली जी महाराज बरसाना आणि त्याखाली अक्षर आहेत भानू दुलारी श्री राधाराणी. हे मंदिर 'लाडली जी मंदिर' आणि 'राधाराणी महाल' म्हणूनही प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी राधाराणी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. आपल्या सख्यांसोबत याच पावन भूमीत ती वावरत होती. खेळत होती. अनेक प्रकारच्या लीला तिने या भूमीत केलेल्या आहेत.

राधाराणी मंदिर ब्रह्मगिरी पर्वतावर सुमारे 250 मीटर उंचीवर वसले आहे. बरसानात 'भानगढ', 'मानगढ', 'दानगढ' आणि 'विलासगढ' ही चार शिखर ब्रह्मदेवाची चार मुखं असल्याचं मानलं जातं. ब्रह्मदेवाने राधाकृष्णाच्या लीला पाहण्याची इच्छा भगवान विष्णूकडे व्यक्त केली तेव्हा श्रीकृष्ण अवतार घेण्यापूर्वी भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला ब्रजभूमीत पर्वताचे रूप घेण्यास सांगितले होते. त्यानुसार श्रीकृष्ण आणि राधाराणी यांच्या जन्मापूर्वीच ब्रह्मदेव येथे पर्वत रूपाने वास करू लागले होते. येथील ब्रह्मगिरी पर्वत हा साक्षात ब्रह्मदेव असून त्यावरील चार गड त्याची चार मुखं असल्याची मान्यता आहे.

या टेकडीच्या पायथ्यापासून मंदिरात जाण्यासाठी सुमारे 251 पायर्‍या आहेत. या पायर्‍यांवर राधाराणी आणि श्रीकृष्ण पूजेसाठी लागणार्‍या पानं, फुलं, गंध, नैवेद्य इत्यादी वस्तूंची दुकानं आहेत. त्याचप्रमाणे पायर्‍यांच्या मधल्या टप्प्यावर श्रीराधाराणीचे 'दादी- बाबा' म्हणजे महिभान जी महाराज आणि सुखदा दादी यांचं लहानच सुबक मंदिर आहे. या मंदिरात राधाराणीच्या दादी बाबांच्या आकर्षक मूर्ती आहेत. येथे दादी बाबांचे दर्शन घेऊन सुमारे शंभर पायर्‍या चढून आपण राधाराणीच्या मंदिरात प्रवेश करतो. येथेच दुरून दिसणारे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्यावर अर्धवर्तुळात लाल रंगावर पांढर्‍या रंगाच्या अक्षरात श्री लाडली जी महाराज बरसाना आणि त्याखाली भानू दुलारी श्री राधाराणी मंदिर ही अक्षर भाविकांचे चित्त आकर्षित करतात. इतर सर्व मंदिरात फक्त प्रमुख आराध्य देवतेचे नाव किंवा महत्त्व दिसते, येथे मात्र राधाराणीचे पिताश्री भानुजी गोप त्याचप्रमाणे दादी बाबा यांचीही मंदिरे आणि नावे आवर्जून घेतली जातात. त्यामुळे राधाराणीविषयी कौटुंबिक भक्तीभाव जागृत होतो.

राजस्थानी वास्तुकला

राधाराणी मंदिराची रचना काहीशी मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरासारखीच आहे, परंतु मथुरेत जागेअभावी ते मंदिर उपलब्ध जागेतच बांधलेले आहे. बरसाना येथे मात्र जागेची अडचण नसल्यामुळे राधाराणीचे हे मंदिर अतिशय भव्य आणि अतिशय आकर्षक बनविण्यात आले आहे. मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी एक अर्धगोलाकार गॅलरी आहे. हजार पंधराशे भाविक येथे एकाच वेळी सामावू शकतात, एवढी ती भव्य आहे. येथून चहूबाजूनी बरसाना गावाचं विहंगम दृश्य दिसते. बरसानातली घरं, गल्ल्या, वस्त्या पाहून हजारो वर्षांपूर्वी राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण येथे वावरले, खेळले, त्यांनी अनंत लीला याच जागेवर केल्या हे आठवून मन भक्ती भावाने भरून येते.

राधाराणी मंदिर राजस्थानी वास्तुकलेनुसार बांधण्यात आले आहे. लाल आणि पांढर्‍या रंगाच्या दगडांचा अप्रतिम वापर येथे करण्यात आलेला आहे. मंदिराच्या प्रत्येक खांबांवर, कमानींवर आणि भिंतीवर अप्रतिम कलाकुसर करण्यात आलेली आहे. या मंदिराची स्वच्छता आणि रेखीवपणा वाखाणण्यासारखा आहे. दररोज हजारो भाविक या मंदिरात राधाकृष्णाचे दर्शन घेतात, उत्सव काळात तर लाखो भाविक येथे येतात, परंतु मंदिराची रंगरंगोटी स्वच्छता इतकी अप्रतिम आहे की हे मंदिर प्राचीन असूनही नजीकच्या काळात बांधले असावे असे वाटते. इतके ते नवे कोरे दिसते. या मंदिरात आधुनिक टाइल्स, सर्वत्र आकर्षक रंगाची लाइटिंग, त्याचप्रमाणे मंदिर स्वच्छ ठेवण्यासाठी, फरशी पुसण्यासाठी आधुनिक यंत्रणेचा वापर केला जातो. त्यामुळे राधारानीचे हे मंदिर किंवा देऊळ न वाटता एखाद्या महालासारखे वाटते आणि दिसतेही. त्यामुळेच याला राधाराणणी महाल असेही म्हणतात.

रोप वे सुविधा

राधाराणी मंदिरात येण्यासाठी बरसाना गावातून मुख्य रस्ता आहे. रंगीली गल्ली येथूनही मंदिरात जाता येते. नांदगावहून तिसरा तर चौथा मार्ग रोपवेचा आहे. राधाराणी मंदिरात येण्यासाठी 2024 मध्ये रोपवे मार्ग सुरू करण्यात आला आहे. पूर्वी दिव्यांग वयस्कर आणि ज्यांना पायर्‍या चढणे अवघड वाटतं अशा भाविकांसाठी रोपवे हा उत्कृष्ट पर्याय आहे. 210 मीटर लांब आणि 48 मीटर उंचीचा या रोप-वे यामुळे पाच मिनिटातच भाविक मंदिरापर्यंत पोहोचू शकतात. पूर्वी मंदिरात जाण्यासाठी डोलीचा उपयोग केला जायचा. पण डोलीवाले भाविकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करायचे. या रोपवेचे जाणे-येण्याचे भाडे फक्त शंभर रुपये आहे. त्यामुळे वृद्ध, दिव्यांग आणि ज्यांना पायर्‍या चढणे अवघड आहे असे भाविक देखील केवळ पाच मिनिटात राधाराणीच्या मंदिरात पोहोचू शकतात. रोपवेने येणार्‍यांसाठी फोर व्हीलर पार्किंगदेखील मंदिराच्या खाली उपलब्ध आहे. येथेच श्री माताजी गौशाला असून राधाराणी रसोई आणि निशुल्क प्रसाद भांडार आहे. या ठिकाणी भाविकांना निशुल्क भोजन दिले जाते.

हे स्थान प्रथम कुणी शोधले?

राधाराणी मंदिराच्या मुख्य गाभार्‍यात प्रवेश करण्यापूर्वी फुलं, माळ विक्रेत्यांची अनेक दुकाने आहेत. येथे राधाराणीचा शृंगार, फुल माळा तसेच पंचमेवा भोग यात 5 प्रकार, 11 प्रकार, राधे राधे नावाची ओढणी, चुनरी वगैरे वस्तू मिळतात. पूर्वी पायर्‍यांची ही जागा मोकळी होती, परंतु हल्ली भाविकांची संख्या वाढू लागल्यामुळे स्टीलचे बॅरिकेट्स सर्वत्र बसविण्यात आले आहेत. मंदिराच्या बाजूला प्राचीन राधाराणी मंदिराचे जुने अवशेष आहेत. चैतन्य महाप्रभू यांचे शिष्य नारायण भट्ट स्वामी यांनी आपल्या भक्ती साधनेतून सर्वप्रथम या स्थानाचा शोध लावला. त्यावेळच्या राधाकृष्णाच्या खंडित प्रतिमा त्यांना मिळाल्या. पुढे 1675 मध्ये राजा वीर सिंह यांनी जुने मंदिर निर्माण केले. त्याच मंदिराचे अवशेष येथे पाहायला मिळतात. पायर्‍या चढून वर आल्यानंतर प्रशस्त गॅलरी आहे आणि इथूनच मंदिरात जाण्यासाठी पायर्‍यादेखील आहेत. या पायर्‍यांच्या मार्गावर एक सफेद छत्री आहे. येथे वर्षातून दोनदा म्हणजे राधा अष्टमी आणि वसंत पंचमी या दिवशी राधाराणी आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी येते.

अधिक मासाची विशेष परिक्रमा

वृंदावन किंवा गोवर्धन परिक्रमेप्रमाणेच बरसाना परिक्रमादेखील भाविकांमध्ये अत्यंत श्रद्धेने केली जाते. यावर्षी पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास असल्यामुळे बरसाना परिक्रमेला विशेष महत्त्व आलेले आहे. या भागात सध्या प्रचंड उन्हाळा असल्याने भाविक रात्रीही परिक्रमा करतात. परिक्रमेच्या मार्गावर प्रवेश मार्गापासून साकर खोरे, गहिवर कुंड, मानगड, मोरकुटी या मार्गांनी शेवटी राधाराणी मंदिरापाशी येऊन ही परिक्रमा समाप्त होते. रात्री साडेनऊ दहा वाजेनंतर या परिक्रमा मार्गावरील बहुतेक सर्व मंदिरे बंद केली जातात. तरीही भाविक अत्यंत श्रद्धेने मनापासून या स्थानांचे दर्शन घेऊन ही परिक्रमा पूर्ण करतात. तीन ते चार किलोमीटरच्या या परिक्रमा मार्गावर भक्तांसाठी पायघड्या घालण्यात आलेल्या आहेत. मार्गांवर अनेक लोकांनी आपल्या घरातील पंखे आणि कुलर्स लावले आहेत. प्रशासनानेही संपूर्ण मार्ग दिवाबत्तीने उजळून टाकला आहे. सर्व रस्त्यावर जागजागी पाणपोया, कापडी पंख्याने हवा देण्याची सेवा अनेक लोक करतात, परिक्रमा मार्गांवर कुलर्स आणि मोठमोठे पंखे लावलेले आहेत. रात्रीच्या शांत आणि भक्तिमय वातावरणात 'राधे राधे'च्या उत्साही जयघोषात हजारो भाविक बरसानाची ही परिक्रमा पूर्ण करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar