Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Barsana Temple : बरसानाची परिक्रमा

Barsana Temple : बरसानाची परिक्रमा

- विजय गोळेसर

रसानाची परिक्रमा करताना आजही या ठिकाणी कृष्ण आणि गोपानी मटकीतल जे दूध दही सांडलेलं होतं त्याच्या खुणा पाहायला तर मिळतातच, परंतु त्याचा सुगंधदेखील येतो असं म्हणतात. भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी हे येथील प्रत्येक दगडावरून चाललेले आहेत.

त्यामुळे येथील मातीला, दगड धोंड्यांना जे अलौकिकत्व प्राप्त झालेलं आहे त्याचा अनुभव येथे आल्यावरच आपल्याला येऊ शकतो. तिथल्या अनेक खडकांवर, पहाडातल्या दगडांवर श्रीकृष्णाच्या हाताच्या पंजाचे ठसे त्याचप्रमाणे पायाच्या पाऊल खुणा दाखवल्या जातात.


संपूर्ण ब्रजभूमीत परिक्रमेला फारच महत्त्व आहे. गोकुळ किंवा वृंदावनात गेल्यावर गोवर्धनाची परिक्रमा केली जाते. त्याचे जे मार्ग आहेत ते बर्‍यापैकी चांगले केलेले आहेत. गोवर्धनाच्या दोन प्रकारच्या परिक्रमा केल्या जातात. एक म्हणजे 21 किलोमीटरची मोठी परिक्रमा आणि दुसरी आठ किलोमीटरची आंतरिक परिक्रमा. परिक्रमेच्या या मार्गावर बाराही महिने हजारो भाविक परिक्रमा करताना दिसतात. या परिक्रमा सामान्यत: पायी चालून केल्या जातात. काही भाविक दर पाच-सहा फुटावर साष्टांग लोटांगण घालतात किंवा नमस्कार करतात तर काही भाविक चक्क लोटांगण म्हणजे संपूर्ण शरीर जमिनीवर गोल फिरवत या परिक्रमा पूर्ण करतात.

गोवर्धन पर्वताप्रमाणेच बरसाना येथेही अनेक भाविक बरसानाची परिक्रमा करतात. या परिक्रमेत बरसानातील सांकरी खोर, गहवर वन, मान मंदिर, मोर कुटी इत्यादी अनेक पवित्र स्थानं येतात. बरसाना परिक्रमा राधा राणी मंदिरापासून सुरू करतात. ही परिक्रमा चार किलोमीटरची असते. सुरुवातीलाच मंदिराच्या पायथ्याशी राधा राणी सेल्फी पॉइंट नावाचा एक बोर्ड आहे. त्याच्या एका बाजूला परिक्रमा मार्ग तर दुसर्‍या बाजूला मंदिर मार्ग याचं मार्गदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी दर्शन घेऊन जय श्री राधे राधे म्हणत बरसानाची परिक्रमा सुरू केली जाते.

हा परिक्रमा मार्ग बरसानाच्या अरुंद गल्ल्यांमधून सुरू होतो. परिक्रमा मार्गात अनेक मोटरसायकल स्वार, रिक्षावाले, पायी चालणारे भाविक, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानांच्या रांग आहेत, त्यात खरेदी करणारे यात्रेकरू आणि पर्यटक यांची एकच गर्दी बरसानाच्या या गल्ल्यांमध्ये झालेली पाहायला मिळते आणि यातूनच परिक्रमेचा मार्गही सुरू होतो. येथून श्री लाडली जी महाराज मंदिर भाविकांना खुणावत असत,ं परंतु मनाचा निग्रह करून प्रथम बरसानाची परिक्रमा करूया.

सुरुवात बरसाना गावातून

परिक्रमा मार्गावर सर्वप्रथम लागते ते सांकरी खोर. या अतिशय प्राचीन रस्त्यांवर आता दोन्ही बाजूने बरसानातील घरं आहेत. घरांच्या भिंती निळ्या रंगांनी रंगवलेले आहेत. खिडक्या दरवाजे यांच्या मधल्या भिंतीवर पानं फुलं रंगवलेली आहेत तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर 'श्री राधे' राधेचा जयघोष अनेक ठिकाणी लिहिलेला आहे, हा एक अरुंद रस्ता आहे. थोडं पुढे गेल्यावर एका बाजूने उंच टेकडी आपल्याला पाहायला मिळतो. या अरुंद घाट मार्गाने पूर्वी गोपी मथुरेला दही दूध घेऊन विक्रीसाठी जात असत तेव्हा कान्हा आपल्या सवंगडी मित्रांसह त्यांचा मार्ग अडवून त्यांच्याकडून दही दुधाचं दान वसूल करायचा आणि जी गोपी दान देत नसेल तिची मटकी ही गोप मुलं दगड मारून किंवा काठी मारून फोडत असतं, अशी श्रीकृष्णाची लीला सांगितली जाते.

बरसाना गाव संपलं की मातीचा प्रशस्त रस्ता आहे. बाजूला उंचवटा किंवा लहानशी टेकडी आहे त्यावर भरपूर झाडी आहे. या ठिकाणी फोर व्हीलर आणि टू व्हीलरचा रस्ता आहे. पार्किंगची सोय आहे. अनेक भाविक तर टू व्हीलर परिक्रमा करताना दिसतात, परंतु पायी चालल्याने जे पुण्य किंवा बरसानाच्या या भूमीत पायी चालताना जो आनंद मिळतो तो अर्थातच टू व्हीलरवर मिळत नाही. हा संपूर्ण परिसर राधा कृष्णाच्या पावन स्पर्शाने त्यांच्या विविध प्रकारच्या लीलांनी पवित्र झालेला आहे आणि आज पाच साडेपाच हजार वर्षे झाली तरीही त्याचा महिमा, त्याचा प्रभाव कमी झालेला नाही. या भूमीत आल्यानंतर कृष्णमय किंवा राधामय न होणारा भाविक शोधून सापडणार नाही.

सांकरी खोर्‍याचा हा मार्ग अतिशय पावन मानला जातो. तिथे गेल्यानंतर आपल्याला त्याची प्रचिती येते. अनुभव येतो. थोडं पुढे गेल्यानंतर या खोर्‍याच्या दोन्ही बाजूला लहानसे डोंगर किंवा त्यांना पर्वत म्हणतात. त्यातील एका पर्वताला ब्रह्मगिरी तर दुसर्‍याला विलास पर्वत असे म्हणतात. या दोन पर्वतांच्या मधून एक निमुळती पायवाट किंवा दरीवाट जाते. खरंतर तिलाच सांकरी खोरं किंवा सांकरी मार्ग म्हणतात. आजही या ठिकाणी चालायला जरा कठीण जातं. अवघड जातं. तरुण मंडळी आणि लहान मूलं मात्र उड्या मारत चालतात, परंतु ज्येष्ठांना या ठिकाणी जरा जपूनच सांभाळूनच चालवं लागतं. या मार्गातून एकावेळी एकच व्यक्ती जाऊ शकते, इतकी ती अरुंद आणि निसरडी आहे.

दह्याची दान घेण्याची जागा

ब्रह्मगिरी पर्वतावर एक 'सक -करा' रस्ता म्हणजे अतिशय अरुंद रस्ता आहे. या रस्त्याने एकावेळी एकच गोपी जाऊ शकत असे. या रस्त्याच्या बाजूला राधा राणीच्या अनेक सखींची गांव आहेत. तिची विशेष प्रिय सखी चित्रा हिचे गावदेखील या रस्त्यापासून जवळच आहे. या परिसरातील गोपी दही,दूध आणि माखन घेऊन याच अरुंद रस्त्याने मथुरेच्या बाजारात दही, दूध, माखन विकण्यासाठी जात असत. ब्रजवासीयांच्या कष्टाचे दही, दूध, माखन कंसाच्या गावाला देऊ नये, असं कृष्णाला वाटायचं. तो सर्व गोप आणि गोपींना तसं सांगायचादेखील. पण गोपी त्याचं ऐकत नसत. आपल्या घरातलं दूध दुभत आपल्या मुला बाळांना, गाईच्या वासरांना न देता मथुरेच्या बाजारात विकायला घेऊन जात असत. जाताना त्या याच अरुंद रस्त्याने जात. तेव्हा कृष्ण आपल्या मित्रांसोबत त्यांना अडवून त्यांच्याकडून दह्या, दुधाचं दान घ्यायचा. ज्या गोपी दही दूध दान देत नसत त्यांची मटकी गोप फोडून टाकत. यामुळे अर्थातच वाद विवाद होत. भांडणं होतं. श्रीकृष्णाच्या आणि त्याच्या गोप सवंगड्यांच्या ज्या लीलांमुळे पूर्वी भांडण व्हायची. राग रोष निर्माण व्हायचे. त्याच श्री हरीच्या लीला आज अत्यंत भक्ती भावाने आणि प्रेमाने पाहिल्या ऐकल्या जातात.

आजही येतो सुगंध

आजही येथील खडकांवर दही दूध सांडल्याच्या खुणा आणि खडकांना दह्या दुधाचा वास येतो, असं सांगितलं जातं. अर्थात इथल्या खडकांवर आजही दही दूध वाहतात. त्यामुळे दह्या दुधाचा सुगंध येतो. श्रीकृष्णाची दही दूध माखन दान घेण्याची तीन ठिकाण ब्रजभूमीत प्रसिद्ध आहेत. पाहिलं ठिकाण म्हणजे बरसानातील 'सांकरी खोरे', गोवर्धनमधील 'दान घाटी', आणि वृंदावन येथील 'बंस वट'. या सर्वात बरसाना येथील सांकरी खोरं विशेष प्रसिद्ध आहे. कारण येथील खडकांवर श्रीकृष्णाच्या हातांचे आणि पायांचे ठसे तसेच गायीच्या खुरांचे ठसे पाहायला मिळतात. येथे येणार्‍या भाविकांना इथले पंडे, मार्गदर्शक ते मोठ्या भक्ती भावाने दाखवतात आणि भाविकदेखील श्रीकृष्णाच्या हाताच्या पंजांना मनोभावे नमस्कार करतात. आजही भाद्रपद महिन्यात राधाष्टमीनंतर येणार्‍या त्रयोदशीला येथे मटकी फोडण्याचा उत्सव आयोजित केला जातो. आपल्याकडे जसं दहीहंडीचा प्रकार असतो तसे या ठिकाणी दह्या दुधाचे मातीची मडकी मोठ्या प्रमाणामध्ये फोडली जातात. येथील खडकांवर दह्या दुधाचा अभिषेक केला जातो. सर्वत्र दह्या दुधाचा सुगंध या परिसरात दरवळतो.

वाटेत दिसतात गायी

या मार्गाने परिक्रमा करीत असताना अनेक मंदिरं किंवा गोशाळा वगैरे लागतात. या ठिकाणी अनेक गाई चरताना, फिरताना दिसतात. त्यामुळे भाविक अतिशय प्रेमाने आणि श्रद्धेने या गायीच्या पाठीवर हात फिरवतात आणि पुढे चालतात. येथे अनेक ठिकाणी सांकरी खोर्‍यातून जाण्याचा जो मार्ग आहे त्याचे मार्गदर्शक बोर्ड लावलेले आहेत. रस्ता वाहता आहे म्हणजे या ठिकाणी कायमच भाविकांची गर्दी असते. या मार्गावरच कृष्ण आणि त्याचे सवंगडी गोपींकडून दही, दूध, माखन यांचे दान घ्यायच्या आणि कुणी दान दिले नाही तर त्यांच्या मटकी फोडायचे. ही श्रीकृष्णाची लीला या ठिकाणी पावलो पावली आपल्याला ऐकायला मिळते.

मुख्य म्हणजे या ठिकाणी आजही या मटकीतल जे दूध-दही सांडलेलं होतं त्याच्या खुणा पाहायला तर मिळतातच, परंतु त्याचा सुगंधदेखील येतो असं म्हणतात. भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी हे येथील प्रत्येक दगडावरून चाललेले आहेत. त्यामुळे येथील मातीला, दगड धोंड्यांना जे अलौकिकत्व प्राप्त झालेलं आहे त्याचा अनुभव येथे आल्यावरच आपल्याला होऊ शकतो. तिथल्या अनेक खडकांवर, पहाडातला दगडांवर श्रीकृष्णाच्या हाताच्या पंजाचे ठसे त्याचप्रमाणे पायाच्या पाऊल खुणा दाखवल्या जातात.त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गाईंच्या खुरांच्या खुणादेखील भक्ती भावाने दाखवल्या जातात आणि भक्तिभावाने पाहिल्या देखील जातात. राधा कृष्णाच्या वास्तव्याने आणि त्यांच्या अनेक मनमोहक लीलांनी पावन झालेल्या या भूमीत या वातावरणामध्ये मन भक्तीने भरून जातं. आपल्याही नकळत आपण कृष्णमय केव्हा होतो आणि मुखातून राधे राधेचे शब्द कधी सुरू होतात ते आपल्यालाही कळत नाही. आपण केवळ चालत असतो परिक्रमा पूर्ण करण्याच्या हेतूने.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar