Tuesday, 22 Oct, 10.27 am My महानगर

होम
बुधवारपासून गांगूली बीसीसीआयचा नवा अध्यक्ष!

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा सौरव गांगुली बुधवारपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार आहे. तो बीसीसीआयचा ३९ वा अध्यक्ष असेल. बुधवारी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळही संपणार आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरणारा गांगुली हा एकमेव उमेदवार होता. त्यामुळे त्याची निवड ही केवळ औपचारिकता उरली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांची सचिव म्हणून, माहीम वर्मा यांची उपाध्यक्षपदी नेमणूक होणार आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमाळ हे खजिनदार आणि केरळचे जयेश जॉर्ज हे सहसचिव असणार आहेत.

कार्यकाळ किती याने फरक पडत नाही - गांगूली

गांगुलीला केवळ ९ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. 'कार्यकाळ किती याने फरक पडत नाही. मला काहीतरी चांगले करण्याची संधी मिळत आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे', असे गांगुली म्हणाला होता. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून बीसीसीआयवर प्रत्यक्ष क्रिकेटशी संबंध नसलेल्या लोकांचा वरचष्मा राहिला आहे. शरद पवार, एन. श्रीनिवासन, अनुराग ठाकुर या दिग्गजांची नावे त्याचेच उदाहरण आहे. मात्र, आता गांगूलीच्या रुपाने एक उत्तम क्रिकेटपटू बीसीसीआयची धुरा हाती घेत आहे. त्यामुळे बीसीसीआय नव्या पर्वाची सुरुवात होईल, असे बोलले जात आहे.


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top