Friday, 16 Aug, 6.40 am My महानगर

क्रीडा
चेल्सीवर मात करत लिव्हरपूलने जिंकला सुपर कप

गोलरक्षक अ‍ॅड्रीयानच्या चमकदार कामगिरीमुळे इंग्लिश संघ लिव्हरपूलने दुसरा इंग्लिश संघ चेल्सीचा पराभव करत युएफा सुपर कप जिंकला. पुरुष संघांच्या या सामन्यात पहिल्यांदाच महिला पंचांनी काम केले. मागील वर्षी चॅम्पियन्स लीग (लिव्हरपूल) आणि युरोपा लीग (चेल्सी) या युएफाच्या दोन प्रमुख स्पर्धा जिंकणार्‍या संघांमध्ये हा सामना झाला. ९० मिनिटांचा नियमित सामना आणि ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ यानंतर या सामन्यात २-२ अशी बरोबरी होती. त्यामुळे विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी-शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. यामध्ये लिव्हरपूलने ५-४ अशी बाजी मारत हा सामना जिंकला. लिव्हरपूलचा गोलरक्षक अ‍ॅड्रीयानला चेल्सीचा युवा खेळाडू टॅमी अ‍ॅब्राहमची पेनल्टी अडवण्यात यश आले. सुपर लीग जिंकण्याची ही लिव्हरपूलची चौथी वेळ होती.

दोन इंग्लिश संघांमध्ये झालेल्या या सामन्याची सुरुवात चेल्सीने उत्कृष्टरित्या केली. आक्रमक खेळासाठी ओळखल्या जाणार्‍या लिव्हरपूलला आपल्या भागातून बाहेर पडण्यात अडचण येत होती. चेल्सीने केलेल्या आक्रमणामुळे त्यांना गोल करण्याची संधी मिळाली, पण पेड्रोने मारलेला फटका गोल पोस्टला लागला. मात्र, ३६ व्या मिनिटाला क्रिस्टियन पुलिसीचच्या पासवर अनुभवी स्ट्रायकर ऑलिव्हिएर जिरुडने गोल करत चेल्सीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यांना ही आघाडी मध्यंतरापर्यंत कायम राखण्यात यश आले.

मध्यंतरानंतर लिव्हरपूलने दमदार खेळ केला. ४८ व्या मिनिटाला रॉबर्टो फर्मिनोच्या पासवर साडियो मानेने गोल करत लिव्हरपूलला १-१ अशी बरोबरी करून दिली. यानंतर या सामन्याच्या ७४ व्या मिनिटाला चेल्सीचा गोलरक्षक केपाने आधी मोहम्मद सलाह आणि मग वर्जिल वॅन डाईक यांनी मारलेले फटके अप्रतिमरीत्या पडवल्याने नियमित सामन्याअखेरीस १-१ अशी बरोबर राहिली. अतिरिक्त वेळेच्या पूर्वार्धात मानेने गोल करून लिव्हरपूलला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

मात्र, त्यांची ही आघाडी केवळ ६ मिनिटेच टिकली. चेल्सीला १०१ व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली, ज्यावर जॉर्जिन्होने गोल केला. त्यामुळे सामन्यात २-२ अशी बरोबरी झाली. पुढे दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी-शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. लिव्हरपूलच्या सर्व खेळाडूंनी पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले, तर चेल्सीच्या अ‍ॅब्राहमची पेनल्टी गोलरक्षक अ‍ॅड्रीयानने अडवली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top