नागपूर : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शुक्रवारी (ता. 3 एप्रिल) रात्री 10 वाजता झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण दिंडोरी तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिवाजीनगर परिसरात रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या विहिरीत कार कोसळून हा अपघात झाला असून या अपघातातील कारमधील एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अंधारात रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने आणि विहिरीला कठडा नसल्याने हा अपघात झाल्याचे आता स्थानिक नागरिकांकडून आणि मृतांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर शनिवारी (ता. 4 एप्रिल) सकाळी दिंडोरी विधानसभेचे आमदार तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
शुक्रवारी दिंडोरीत झालेल्या अपघाताबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या घटनेतील सर्व लहान मुले आणि त्यांचे आई-वडील हे सर्व ज्या गाडीत होते, ती गाडी विहिरीत पडली. याबाबत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळावरून माझ्यासोबत चर्चा केली. त्यांनी त्या ठिकाणची परिस्थिती सांगितली. इतक्या लहान मुलांचे निधन होणे, यापेक्षा आक्रोश आणि दुःख दुसरे कोणतेही असू शकत नाही. ती जी विहीर आहे, त्याला अतिशय छोटा कठडा होती. ती विहीर कुठेतरी मध्यभागी होती आणि त्यामुळे ही घटना घडल्याचे प्रथम दर्शनी लक्षात येत आहे. या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो, त्या कुटुंबाला मदत देखील घोषित केली आहे, असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.
तसेच, या घटनेनंतर आता सूचना दिलेल्या आहेत की, रस्त्याच्या मधे अशा प्रकारच्या विहिरी असतील किंवा ज्या ठिकाणी रहदारी आहे, अशा ठिकाणी विहिरी असतील तर त्यांचे तत्काळ ऑडिट करून त्याबाबतची आवश्यकता लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात. कारण, या प्रकरणात असे होते की, या विहिरीला भिंत होती, मात्र ती छोटी होती. ती भिंत जर का मोठी असती, तर एखाद्यावेळेस हे सर्व वाचू शकले असते. त्यामुळे तत्काळ या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे सांगत ही घटना प्रचंड वेदना देणारी असल्याच्या भावना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

