Dailyhunt
CM Fadnavis : .तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही, खरात प्रकरणावरून फडणवीसांनी कोणाला दिला इशारा?

CM Fadnavis : .तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही, खरात प्रकरणावरून फडणवीसांनी कोणाला दिला इशारा?

मुंबई : राज्यात गेल्या महिन्याभरापासून भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांनी धुमाकूळ घातला आहे. आज गुरुवारी (ता. 30 एप्रिल) अशोक खरात आठव्या गुन्ह्यात न्यायालयात हजर करण्यात आले होते.

यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर त्याला न्यायालयाने 12 मे पर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आज पहिल्यांदाच न्यायालयाने खरातची पोलीस कोठडी नाकारली. परंतु, याच भोंदू खरातच्या प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस महत्त्वाचे विधान करत खरात ज्या ज्या लोकांना भेटला, त्यांना इशारा दिला आहे. मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाच्या कार्यक्रमातील मुलाखतीत फडणवीसांनी अशोक खरात प्रकरणावर थेट आणि सविस्तर भाष्य केले आहे.

एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खरात प्रकरण अतिशय वाईट, गलिच्छ आहे. आस्थेचा बाजार कसा मांडला जातो हे यातून दिसले. खरात प्रकरणाचा तपास अगदी योग्य सुरू आहे. लोकांना त्याची माहिती नाही. फोटो कोणाचा कोणासोबतही असू शकतो. महाराष्ट्राला आश्वासन देतो, खरात सारख्या भोंदूंची जागा जेलमध्येच आहे, त्यांना आम्ही बाहेर येऊ देणार नाही, असे यावेळी फडणवीसांकडून सांगण्यात आले. यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबाबतही भाष्य केले. तपास अजून संपला नाही. थेट कोण-कोण संबंधी आहेत, त्याचा आधी तपास सुरू आहे आणि चार्जशीट दाखल करणे ही प्रायोरिटी आहे. गुन्हेगारांना चार्जशीट आधी फायदा मिळू नये हा हेतू आहे. तपास सुरू आहे, अजून खूप काही बाहेर येईल. चार्जशीट दाखल होईल, असे यावेळी फडणवीसांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

तसेच, धर्माचे शुद्धीकरण सुरू आहे. त्यागाला महत्व आहे. त्याग आणि त्यागी जर भोगी निघाला, तर अशी प्रकरणे येतात. अजून 4 ते 5 केसेस आल्या आहेत. मूळ महाराष्ट्राची प्रवृत्ती वारकरी संप्रदायाची आहे, महाराष्ट्र धर्माची आहे. अध्यात्म गुरूंना जे योग्य काम करतात त्यांना त्याच चष्म्यातून पाहणे योग्य होणार नाही. खरात कोणाकोणाकडे जात होता हे मी सांगितले तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशाराच यावेळी फडणवीसांकडून देण्यात आला. तसेच एकनाथ शिंदेंचे नाव उगाच घुसवून आमचे संबंध बिघडवण्याचा हेतू आणू नका. अजित पवारांच्या घरासमोर पूजा झाली असेल तर चौकशी होईल. अपघाताशी अशोक खरातशी संबंध असेल तर ते सुद्धा बाहेर येईल. खरात पोपटासारखा बोलत आहे. कोणाच्या फोटोसमोर क्रॉस मारले होते, याबाबत पोलीस बोलतील, असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीदरम्यान सांगितले. परंतु, तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असे म्हणत फडणवीसांनी नेमका कोणाला इशारा दिला आहे? याबाबतची चर्चा आता रंगली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar