मुंबई : आखाती देशातील युद्धामुळे राज्यासह देशात इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. अशातच महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरचाही तुटवडा जाणवू लागला आहे. अशातच आता शहरातील दादर पश्चिमेला असलेल्या अमरहिंद मंडळाजवळील महानगरची गॅस पाईपलाईन फुटल्याने खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी (ता. 29 मे) सायंकाळी 06 वाजून 05 मिनिटांनी या ही पाईलाईन फुटली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शिवाजी पार्क ते पोर्तुगीज चर्च मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर महानगर गॅसचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाकडून या गळतीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दादर पश्चिमेला असलेल्या पोर्तुगीज चर्चजवळील आणि त्याचा आजूबाजूचा परिसर हा वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो. याच परिसरातील अमरहिंद मंडळाजवळ असलेली महानगर गॅसची पाईपलाईन शुक्रवारी संध्याकाळी फुटली आणि त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होऊ लागली. झाडाचा बुंधा काढताना जेसीबीचा धक्का लागल्याने महानगर गॅसची पाईपलाईनला गळती लागली. अचानक पाईपमधून प्रचंड प्रमाणात गॅस बाहेर येऊ लागला. पाण्याची लाईन फुटल्यानंतर ज्या प्रमाणे त्याचे फवार्रे उडतात, अशा पद्धतीने गॅस बाहेर पडत होता. गॅसच्या वासामुळे नागरिकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान आणि महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी दुरुस्तीचे काम सुरू केले.
हा परिसर रहिवाशी परिसर असल्याने, या ठिकाणी अनेक इमारती असल्याने स्थानिकांना याचा काही वेळातच त्रास जाणवू लागला. त्यामुळे नागरिकांनी घराच्या दारे खिडक्या बंद करून घेतल्या. त्रास होऊ नये म्हणून लोक खबरदारी घेत आहेत. तसेच गोखले रोडवरील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला असून नागरिकांना गॅस गळतीच्या परिसरात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला.

