Dailyhunt
Darekar Vs Shewale : अध्यक्षपदावरून बॉक्सिंग, दरेकर शेवाळेंवर तुटून पडले, म्हणाले, 'राज्यसभेवर जाता आले नाही, म्हणून.'

Darekar Vs Shewale : अध्यक्षपदावरून बॉक्सिंग, दरेकर शेवाळेंवर तुटून पडले, म्हणाले, 'राज्यसभेवर जाता आले नाही, म्हणून.'

मुंबई : महायुतीतील भाजप आणि शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये सध्या बॉक्सिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. याला कारणंही ठरलंय बॉक्सिंग फेडरेशन… शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांची बॉक्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

यावरच भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी आक्षेप घेतला आहे.

बॉक्सिंग फेडरेशनचा अध्यक्ष मी आहे. धर्मदाय आयुक्तांच्या निगराणीखाली झालेल्या निवडणुकीतून मी निवडून आलोय. शेवाळे एक दिवसांत उगवले आहेत. असं कुठे होते का? राहुल शेवाळेंना राज्यसभेवर जाता आले नाही. त्यांना वाटलं बॉक्सिंग असोशिएशनचा अध्यक्ष व्हावे. दिल्लीत बॉक्सिंग असोशिएशनमध्ये जाता येईल, म्हणून ते अध्यक्ष झाले असतील. पण, हे बोगस अध्यक्ष झाले आहेत, अशी घणाघाती टीका दरेकरांनी केली आहे. त्यामुळे बॉक्सिंग असोशिएशनच्या अध्यक्षपदावरून महायुतीतील दोन बडे नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, "बॉक्सिंग फेडरेशनची निवडणूक रितसर झाली. माझ्या नेतृत्त्वाखाली जय कवळींचे पॅनल निवडून आले. मी अध्यक्षपदी विराजमान झालो. आमचे पदाधिकाऱ्यांचीही निवड झाली. कुठल्याही संघटनेची निवडणूक ही नियमानुसार होत असते. मला वाटले म्हणून अध्यक्ष होता येत नाही. परंतु, कायदा गुंडाळून काही गोष्टी करण्यात आल्या आहेत."

सुनेत्रा पवारांचे नेतृत्त्व मान्य करणार का? युगेंद्र पवार म्हणाले, 'शरद पवार अन् सुप्रियाताई…'

"राहुल शेवाळेंना कितपत याची माहिती आहे, मला माहिती नाही. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी बॉक्सिंग फेडरेशनची निवडणूक पार पडली. निवडणुकीत निवडून आलेल्या कार्यकारणीची यादी दिल्लीत पाठवण्यात आली. मात्र, अजूनही कमिटीकडून आम्हाला पत्र देण्यात आले नाही," असा आरोप दरेकरांनी केला.

"माझी अध्यक्षपदी निवड झाल्यावर मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. मुख्यमंत्री बोगस लोकांना भेटत नाही. मुख्यमंत्र्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत फोटोही काढले. मात्र, क्रिडा विभागात तरी बोगसगिरी आणू नका. जे आपत्यच जन्माला आले नाही, त्याचे नाव ठेवले. अध्यक्ष व्हायला निवडणूक व्हावी लागते. मग, निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर झाला? निवडणूक कशाच्या आधारे घेतली? कंपनी मान्यताप्राप्त आहे का?" असा सवाल दरेकरांनी शेवाळेंना विचारला आहे.

"बॉक्सिंग फेडरेशनची निवडणूक आयुक्तांच्या निगराणीखाली घेण्यात आली होती. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत. ज्याचा निकाल जाहीर झाला आहे. मग शेवाळेंची संघटना कुठून आली? निवडणुकीत जिंकता आला नाही म्हणून हा रडीचा डाव सुरू आहे. आमची निवडणूक न्यायालयाच्या आदेशाने झाली," असे दरेकरांनी सांगितलं.

"यासंदर्भात आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. क्रिडाक्षेत्रात दळभद्री राजकारण कुणीही आणू नये. याच लोकांनी निवडणुकीत अर्ज भरले, सहभागी झाले होते. म्हणजे ही लोक निवडणुकीत सहभागी झाली होती ना? मला वाटते बोगस फेडरेशन स्थापन झाले आहे. बोगस अध्यक्षाची नियुक्ती झाली आहे. बॉक्सिंगसाठी आयुष्य घालवणाऱ्यांनी माझी निवड केली आहे. बॉक्सिंगला चांगले वैभव आणण्याचे माझ्या डोक्यात आहे. अशावेळी अडथळा आणण्याचा हा प्रयत्न आहे," असा संताप दरेकरांनी व्यक्त केला आहे.

"आमची निवड लपून छपून झाली नाही. शेवाळे एक दिवसात उगवले आहेत. असं कुठे होते का? राहुल शेवाळेंना राज्यसभेवर जाता आले नाही. त्यांना वाटलं महाराष्ट्र बॉक्सिंग असोशिएसन आहे. दिल्लीत बॉक्सिंग असोशिएशनमध्ये जाता येईल, म्हणून झाले असतील," अशी टीका दरेकरांनी केली आहे.

'तुम्ही तपास नीट करत नाही' शिंदेंचा OSD असल्याचे भासवून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, मग…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar