बारामती : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी आज सोमवार ( ६ एप्रिल ) अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी झालेल्या सभेत बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना अश्रू अनावर झाले.
ज्या नेत्याने आपल्या राज्यासाठी केलं, बारामती तालुक्यासाठी वस्ती, वाड्यासाठी केलं, प्रत्येक गावातील व्यक्तीला नावानिशी ओळखणारा नेता आपल्यात नाही, याचे सर्वांना दु:ख आहे, अशी भावना भरणेंनी व्यक्त केली.
दत्तात्रय भरणे म्हणाले, "बारामतीच्या पोटनिवडणुकीला आपण सामोरे जात आहोत. येत्या २३ तारखेला होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी अजित पवारांना सोडून पहिल्यांदा त्यांच्या प्रतिनिधी म्हणून सुनेत्रा पवारांना मतदान करावे. ज्या नेत्याला सोडून आयुष्यात कधीही कुणाला मतदान करण्याचा विचार केला नव्हता. ज्या नेत्याने आपल्या राज्यासाठी केलं, बारामती तालुक्यासाठी वस्ती, वाड्यासाठी केलं, प्रत्येक गावातील व्यक्तीला नावानिशी ओळखणारा नेता आपल्यात नाही, याचे सर्वांना दु:ख आहे. आपला आधार गेल्यासारखा वाटतोय."
"अजितदादांचे नाव राज्यात, 'कामाचा माणूस, काम करणारा माणूस, स्पष्टपणे बोलणारा माणूस' असं घेतलं जाते. आपल्या कार्यकर्त्यासाठी कितीही मोठ्या नेत्याला अजितदादा अंगावर घ्यायचे. तेच दादा आपल्यात नाहीत. दादांची शिकवण, विचार आणि आदर्श घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे," असे भरणेंनी म्हटलं.
"ही निवडणूक आपल्याला बिनविरोध करायची आहे. त्यामुळे काँग्रेस किंवा इतर पक्षातील नेत्यांना मला विनंती करायची की, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मदत करावी," अशी साद भरणेंनी घातली.
"मी एक शेतकऱ्याला मुलगा होतो. मला दादांनी मला बँकेचा चेअरमन, जिल्हा परिषद अध्यक्ष, कारखान्याचा चेअरमन, आमदार, मंत्री आणि आता कृषीमंत्री काम करण्याची संधी दिली. अजित पवारांवर प्रेम केलं तसेच, सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार आणि पवार कुटुंबावर केलं पाहिजे," असेही भरणे म्हणाले.

