Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
DGCA : वैध तिकिट असूनही 641 प्रवाशांना विमानात प्रवेश नाकारला; विमान कंपन्यांना लाखो रुपयांचा दंड

DGCA : वैध तिकिट असूनही 641 प्रवाशांना विमानात प्रवेश नाकारला; विमान कंपन्यांना लाखो रुपयांचा दंड

सुनील मेहरोत्रानवी दिल्ली : एप्रिल महिन्यात देशभरातील हवाई प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. वैध तिकिटे असूनही 641 प्रवाशांना विमानात प्रवेश नाकारण्यात आला, तसेच विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे 77,000 हून अधिक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.

त्यामुळे नागरी विमानन क्षेत्रावर देखरेख करणाऱ्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान कंपन्यांना लाखो रुपयांचा दंड लावला आहे.

एप्रिल महिन्यात प्रवाशांकडून डीजीसीएकडे 3,266 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींवर कारवाई करतानाडीजीसीएने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, वैध तिकिटे असूनही 641 प्रवाशांना विमानात प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे विमान कंपन्यांना 57.65 लाख रुपयांची भरपाई द्यावी लागली आहे. शिवाय, एप्रिलमध्ये विमान उड्डाणांना झालेल्या विलंबामुळे 1.35 लाखांहून अधिक प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. यासाठी विमान कंपन्यांना प्रवाशांच्या सोयीसुविधांवर 2.41 कोटींहून अधिक रक्कम खर्च करावी लागली. याव्यतिरिक्त, विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे 77,000 हून अधिक प्रवाशांना अडचणी आल्या, परिणामी विमान कंपन्यांना 2.04 कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागली.

देशातील हवाई प्रवासातही घट

दरम्यान, देशातील हवाई प्रवासाच्या एकूण प्रमाणातही घट दिसून आली आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये हवाई प्रवाशांच्या संख्येत सुमारे 4.2 टक्क्यांनी घट झाली आहे. एप्रिलमध्ये 1.38 कोटींहून अधिक लोकांनी हवाई प्रवास केला. याउलट, मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात 1.43 कोटी लोकांनी प्रवास केला होता. याचा अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवाशांच्या संख्येत सुमारे 3.47 टक्क्यांची घट झाली आहे. मार्च महिन्यात ही संख्या 1.44 कोटी होती, ज्यावरून हे स्पष्ट होते की, एप्रिल महिन्यात प्रवाशांनी हवाई प्रवास करणे टाळले आहे. मात्र चालू वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांचा (जानेवारी ते एप्रिल 2026) विचार केला तर एकूण प्रवाशांची संख्या 575.49 लाखांवर पोहोचली आहे. जी मागील वर्षाच्या याच चार महिन्यांच्या कालावधीच्या तुलनेत 0.06 टक्क्यांची वाढ दर्शवते. सध्या, इंधनाच्या वाढत्या किमती आणि प्रवाशांच्या संख्येत झालेली घट यामुळे विमान कंपन्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, काही विमान कंपन्यांनी आपल्या विमान उड्डाणांची संख्याही कमी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar