Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Dr. Anand Nadkarni : आनंद कभी मरा नहीं करते.

Dr. Anand Nadkarni : आनंद कभी मरा नहीं करते.

- प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार

मानसोपचार, मानसिक आजार, मानसिक विकृती याबाबत समाजात प्रचलित असलेले गैरसमज, पूर्वग्रह, अज्ञान, गैरसमजुती, अंधश्रद्धा दूर करून यामागचा कार्यकारणभाव आणि शास्त्रीय दृष्टिकोन सहज नि सोप्या भाषेत समजून सांगण्याचे काम डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.

मानसोपचारतज्ज्ञ म्हणजे वेड्यांचा डॉक्टर ही आपल्या समाजात खोलवर रुजलेली धारणा त्यांनी दूर केली. नाडकर्णी सरांचे अचानक जाणे हा अनेकांसाठी एक मानसिक धक्का असला तरी मानसोपचार क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान पाहता 'आनंद कभी मरा नहीं करते,' असेच म्हणावे लागेल.


पदवीचे शिक्षण घेत असताना माझी डॉ. आनंद नाडकर्णी या व्यक्तिमत्वाशी ओळख झाली. अर्थातच त्यांचं लेखन वाचून. पुढे मुंबई येथील अत्यंत नामांकित आणि प्रतिष्ठित अशा Tata institute of Social Sciences या स्वायत्त विद्यापीठात पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी जायची संधी मला मिळाली. इथे ते पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमाच्या 'Medical and Psychiatric Social Work' या स्पेशलायझेशनसाठी visiting faculty (अभ्यागत प्राध्यापक) म्हणून शिकवायला यायचे. मी निवडलेल्या शिक्षणक्रमासाठी अनिवार्य नसतानाही मी ते शिकवत असलेला विषय ऐच्छिक विषय म्हणून निवडला. त्यांच्या अनुभवसिद्ध अध्यापनाचा लाभ व्हावा आणि त्यांच्याशी संवाद साधता यावा हा माझा हेतू होता. हा साधारणत: 1990 नंतरचा कालखंड होता. त्यावेळी ते नाटककार म्हणून देखील भरात होते. या सुमारास त्यांची 'आमच्या सारखे आम्हीच' आणि 'जगतो आम्ही बेफाम' यासारखी नाटके व्यावसायिक रंगभूमीवर अतिशय लोकप्रिय झाली होती. त्यांच्या बहुतांशी नाटकांची निर्मिती चंद्रलेखा नाट्य संस्थेच्या मोहन वाघ यांनी केली असल्याचे दिसून येते. एकदा त्यांना मी विचारले, सर तुमची नाटके चंद्रलेखाच का करते? त्यावर ते म्हणाले, का नाही करणार ! मोहन वाघ माझे सासरे आहेत !

डॉ. नाडकर्णी सरांचे 'गद्धेपंचविशी' हे मी वाचलेलं पहिलं पुस्तक. यानंतर त्यांच्या विपुल लेखनातून ते भेटत गेले. अनेक वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि ग्रंथांमधून ते सातत्याने आपले विचार मांडायचे. केवळ मुद्रितच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि समाज माध्यमांमधूनही ते वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करून समाजाचे प्रबोधन करायचे. मानसोपचार, मानसिक आजार, मानसिक विकृती याबाबत समाजात प्रचलित असलेले गैरसमज, पूर्वग्रह, अज्ञान, गैरसमजुती, अंधश्रद्धा दूर करून यामागचा कार्यकारणभाव आणि शास्त्रीय दृष्टिकोन सहज नि सोप्या भाषेत समजून सांगायचे. मानसोपचारतज्ज्ञ म्हणजे वेड्यांचा डॉक्टर ही आपल्या समाजात खोलवर रुजलेली धारणा नष्ट करण्यात त्यांचे कार्य आणि योगदान फार मोठे आहे.

नाडकर्णीसर, लेखक, नाटककार, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक, चित्रकार, समुपदेशक तर होतेच त्याखेरीज एक संवेदनशील कवीदेखील होते. त्यांचा गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानावर आधारित कवितांचा निरुपणासह संग्रह 'बुद्धांसोबत क्षणोक्षणी' (मनोविकास प्रकाशन) विशेष गाजला आहे. ठाणे येथून प्रकाशित होणार्‍या 'वयम्' या बालकांसाठीच्या मासिकाच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात त्यांचा सहभाग असायचा. 'वयम्' मासिकाने आयोजित केलेल्या 'बहुरंगी बहर' या एका आगळ्यावेगळ्या शिबिरासाठी माझ्या लेकीची निवड झाली होती. त्यामुळे तिलाही मुलांसाठीच्या या शिबिरात नाडकर्णीसरांचे मार्गदर्शन मिळालं. कोरोना साथीच्या काळात त्यांनी अनेकविध मुद्द्यांवर लोकांचे प्रबोधन करून त्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

लोकांचे मनोधैर्य टिकवून ठेवायला मदत केली. एखाद्या घटनेवर सर्वसामान्य माणूस प्रतिसाद देण्याऐवजी प्रतिक्रिया देतो. याविषयी त्यांनी केलेले विश्लेषण आवर्जून समजून घेण्यासारखे आहे. प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यातील फरक, याचे फायदे-तोटे सर्वसामान्य लोकांना सहज कळतील, अशा पद्धतीने त्यांनी विशद केले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ यू-ट्यूबवर उपलब्ध असून प्रत्येकाने अवश्य पाहायला हवा. रूढार्थाने बाय प्रोफेशन ते 'मनोविकारतज्ज्ञ' होते. मात्र नाडकर्णीसर स्वत:ला मनोविकारतज्ज्ञ म्हणण्याऐवजी 'मनोविकासतज्ज्ञ' म्हणवून घ्यायचे. त्यांच्या या कृतीतूनही मानसिक आजाराकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन लक्षात येतो !

डॉ. आनंद नाडकर्णी यांनी 1990 मध्ये ठाणे येथे 'मानसिक आरोग्य' या दुर्लक्षित, उपेक्षित पण सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत निकडीच्या अशा क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने आय.पी.एच. अर्थात institute for psychological health या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या वतीने अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांनी 'मानसिक आरोग्य' हा विषय ऐरणीवर आणून मानसिक आरोग्य सेवेला सामाजिक चळवळीचे स्वरूप दिले, असे म्हणायला हरकत नाही. करिअर मार्गदर्शन करणारा या संस्थेचा 'वेध' हा उपक्रम अतिशय उपयुक्त आणि उल्लेखनीय आहे. 'वेध'च्या निमित्ताने त्यांचे नाशिक शहरातही बर्‍याचदा येणे व्हायचे. ठाणे-नाशिक-पुणे इथे 'वेध'चे आयोजन केले जाते. शिवाय डॉ. अल्बर्ट एलीस यांनी विकसित केलेल्या rationale emotive behaviour therapy (REBT) अर्थात 'विवेकनिष्ठ विचार वर्तन पद्धती' आपल्या दैनंदिन जीवनात कशी महत्त्वाची आहे, यामुळे आपल्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल घडून येऊ शकतात, यासाठी नाडकर्णीसर कार्यशाळा घ्यायचे. आपल्या या कार्यशाळेच्या माध्यमातून हजारो लोकांना त्यांनी या प्रणालीची दीक्षा दिली. अनेक प्रशिक्षक तयार केले. अनिल अवचट यांच्या पुणे येथील 'मुक्तांगण' या व्यसनमुक्ती केंद्राच्याही अनेकविध उपक्रमांमध्ये त्यांचा लक्षणीय सहभाग असायचा. व्यसनमुक्तीसाठी देखील त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. डॉ. नाडकर्णी यांनी 'कॉर्पोरेट ट्रेनर' या भूमिकेतूनही अनेक उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील मनुष्यबळाला प्रशिक्षित केले.

मार्च महिन्यात नाडकर्णी सरांना एका आजाराचे निदान झाले होते. 6 मे रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली…यानंतर त्यांची तब्बेत सुधारून ते बरे होतील याच्या प्रतीक्षेत असलेल्या त्यांच्या असंख्य हितचिंतकांना मेच्या 15 तारखेला पहाटे पाच वाजता त्यांच्या जाण्याची दु:खद बातमी आली..! सारेच कसे अनपेक्षित, धक्कादायक आणि अकल्पित! डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या आकस्मिक जाण्याने मानसिक आरोग्य क्षेत्रातीलच नव्हे तर कला, साहित्य, तत्त्वज्ञान, काव्य, चित्रकला, समाजकार्य, अंधश्रद्धा निर्मूलन, समुपदेशन, संप्रेषण, मनुष्यबळ प्रशिक्षण, संगीत, वादन, सर्जनशीलता, विवेकशील विचारपद्धती, व्यसनमुक्ती अशा असंख्य क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करणार्‍या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा अंत झाला आहे. नाडकर्णीसरांना भावपूर्ण श्रद्धांजली ! आनंद कभी मरा नहीं करते…

(लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar