- सुशांत किर्वे
दीड वर्ष बंद फ्लॅट असल्याने मृतदेह नेमका कोणाचा आहे, घातपात आहे की आणखी काही? घटनास्थळी कोणताही पुरावा नसल्याने या घटनेचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
या घटनेचे गांभीर्य ओळखत बोईसर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे व त्यांच्या सहकार्यांनी तपास करत कोणताही पुरावा नसताना पत्नीचा खून करणार्या पतीला मोबाईल क्रमांक आणि लोकेशनवरून शोधले.
पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये 'दृश्यम' चित्रपटाप्रमाणेच कोरोनाकाळात 2019-20 मध्ये एका फ्लॅटमधील प्लास्टिकच्या टाकीमध्ये कुजलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आला होता. कुजलेल्या अवस्थेत अनोळखी मृतदेह आणि कोणताही पुरावा नसतानाही बोईसर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे व त्यांच्या सहकार्यांनी 'मनी ट्रान्सफर'वरून मोबाईल क्रमांक आणि हल्लेखोर पतीचे लोकेशन शोधून काढले. पोलिसांच्या एका टीमने पंजाबमधील युवकाकडून हल्लेखोर पतीचा फोटो मिळवला. त्यानंतर लगेच दुसर्या टीमने सापळा रचून पतीला उत्तर प्रदेशमधून अटक केली. आई-वडिलांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पत्नीचा काटा काढल्याची कबुली पतीने बोईसर पोलिसांना दिली.
विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे हे पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलीस ठाण्यात 2019-20 मध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते. बोईसर पोलीस ठाणे हद्दीमध्ये 2019 मध्ये सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये बाथरूमच्या प्लास्टिक टाकीमध्ये कुजलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा दिसल्याने खळबळ उडाली होती. दीड वर्ष बंद फ्लॅट असल्याने मृतदेह नेमका कोणाचा आहे, घातपात आहे की आणखी काही, घटनास्थळी कोणताही पुरावा नसल्याने या घटनेचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. या घटनेचे गांभीर्य ओळखत बोईसर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे व त्यांच्या सहकार्यांनी तपास करत कोणताही पुरावा नसताना पत्नीचा खून करणार्या पतीला मोबाईल क्रमांक आणि लोकेशनवरून शोधले.
उत्तर प्रदेशमधील एक दाम्पत्य पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये एका भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत होते. फ्लॅट भाड्याने दिल्याने आणि नियमित दरमहिना मनी ट्रान्सफरद्वारे घरभाडे मिळत असल्याने घरमालक कधीही फ्लॅट बघण्यास आला नाही. शिवाय, घरमालकाने भाडेकरी राकेश पांडे (नाव बदलले) याच्याकडे फ्लॅटबाबत विचारपूस केली नाही. दरम्यान, पांडे दाम्पत्यामध्ये सातत्याने किरकोळ कारणावरून भांडण व्हायचे. त्यातून दोघांमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत होता. सासू आणि सासरेही विवाहितेशी परकेपणाने वागत होते. सासरचा शारीरिक व मानसिक छळ असह्य झाल्याने पीडित विवाहितेने 2017 मध्ये बोईसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विवाहितेच्या पती, सासू व सासर्यांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. ही बाब खटकल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेला अधिक त्रास देणे सुरू केले. विवाहितेला आई-वडील नव्हते. पतीने पैसे देवून तिच्याशी लग्न केले होते. तिला माहेरचे नातेवाईकसुद्धा नव्हते. ही संधी साधत पतीने पत्नीला छोट्या-छोट्या कारणावरून टोमणे मारणे सुरू केले. काही महिन्यानंतर अचानक पांडे दिसेनासे झाले. मात्र, काही दिवसांनी पांडे दाम्पत्य राहत असलेल्या फ्लॅटशेजारील रहिवाशांना उंदीर मेल्याप्रमाणे दुर्गंधीयुक्त वास येऊ लागला.
रहिवाशांनी बोईसर पोलिसांना एका फ्लॅटमधून दुर्गंधीयुक्त वास येत असल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी घरमालकाशी संपर्क साधला. त्यानंतर घरमालकाने सोसायटीमध्ये येत कोरोनामुळे दीड वर्षांनी फ्लॅटचा मुख्य दरवाजा उघडला असता आतून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येऊ लागली. पोलिसांनी फ्लॅटमधून नेमका कोणत्या ठिकाणाहून दुर्गंधी येत आहे, याचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलिसांना फ्लॅटमधील बाथरूमच्या स्लॅबवर ठेवलेल्या प्लास्टिकच्या टाकीतून दुर्गंधी येत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी प्लॅस्टिकच्या टाकीचे झाकण उघडले असता त्यातून अधिकच दुर्गंधी येऊ लागली. पोलिसांनी टाकीमध्ये काय आहे, याची पाहणी केली असता पोलिसांना टाकीमध्ये मानवी सांगाडा दिसला.
बोईसर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे यांनी घटनास्थळी येत बारकाईने पाहणी केली. त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाआधारे सखोल तपास सुरू केला. हल्लेखोराने खून करताना पोलिसांना कोणताही सुगावा लागू नये, यासाठी सर्वतोपरी खबदारी घेतल्याचे समोर आले. पोलिसांनी मानवी सांगाडा आढलेल्या पाण्याच्या टाकीची बारकाईने तपासणी केली असता दीड वर्षे मृतदेह पाण्याच्या टाकीमध्ये ठेवल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहाचा दुर्गंधीयुक्त वास येवू नये, यासाठी मृतदेह मिठामध्ये ठेवल्याचे दिसून आले. हल्लेखोराला मिठामध्ये मृतदेह ठेवल्याने कधीच वास येणार नाही, असे वाटले होते. मात्र, तिथेच तो हल्लेखोर फसला. दीड वर्षांमध्ये मीठ वितळल्यानंतर दुर्गंधीयुक्त वास येण्यास सुरुवात झाली.
मृतदेह कोणाचा आहे, याचा शोध घेत असताना पोलिसांना भाडेकरूवर संशय आला. फ्लॅटमध्ये मानवी सांगाडा आढळून आल्यापासून भाडेकरू राकेश पांडेशी पोलिसांचा संपर्क होत नव्हता. त्याने घरमालकाला घरभाडे देणेही बंद केले होते. तपासादरम्यान, नियमित घरभाडे येत असल्यामुळे घरमालक फ्लॅट बघण्यासाठी कधीही आला नसल्याचे समोर आले. भाडेकरू किराणा दुकानदाराच्या मदतीने मनी ट्रान्सफरद्वारे घरभाडे पाठवत होता. त्यानुसार भाडेकरू कोणत्या दुकानदाराचा मोबाईल घरभाडे पाठवण्यासाठी वापर करत होता, याचा शोध पोलिसांनी सुरू केला. त्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी दुकानदाराचा मोबाईल क्रमांक मिळवला. तपासात राकेश पांडे याने घरमालक आणि पंजाबमधील एका युवकाला पैसे पाठवल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित युवकाचे लोकेशन शोधले असता पंजाबमधील अंबाला ठिकाण समोर आले.
बोईसर पोलिसांची एक टीम लोकेशननुसार पंजाबला गेली. पोलिसांनी अंबालामधील युवकाला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवतचा युवकाने राकेश पांडे आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद असल्याचे सांगितले. शिवाय, त्याने पोलिसांना पांडेचा ठावठिकाणा सांगितला. त्यानुसार पोलिसांची दुसरी टीम लगेच त्याला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये गेली. त्याला महाराष्ट्र पोलीस उत्तर प्रदेशमध्ये आले आहेत, हे समजू नये, यासाठी पोलिसांनी वेशांतर केले होते. पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. पोलिसांनी बोईसरमधील राहत असलेल्या फ्लॅटमध्ये मानवी सांगाडा सापडल्याचे सांगत विचारपूस केली. त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच राकेश पांडेने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.
पत्नीने आई-वडिलांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, ही बाब राकेश पांडेला खटकली होती. त्यातूनच त्याने पत्नीचा काटा काढण्याचे ठरवले होते. दरम्यानच्या काळात पांडेच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे त्याचा पत्नीविरुद्ध राग दिवसेंदिवस वाढत होता. त्याने पत्नीचा काटा काढण्यासाठी नियोजन केले. खून करणार असल्याचे पत्नीला कळू दिले नाही. दरम्यान, दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात पांडेने पत्नीच्या डोक्यात वर्मी घाव घालत तिचा खून केला. त्यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्याने फ्लॅटमधील बाथरूमच्या स्लॅबवरील प्लास्टिकची पाण्याची टाकी रिकामी केली. टाकीमध्ये भरपूर मीठ टाकले. त्यानंतर त्याने पत्नीचा मृतदेह टाकीत ठेवला. मृतदेहावर पुन्हा मीठ टाकत टाकीचे झाकण बंद केले. सोसायटीतील रहिवाशांना कळू न देता त्याने फ्लॅटच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून उत्तर प्रदेशमध्ये आल्याचे राकेश पांडे याने पोलिसांना सांगितले. कोरोनाकाळ असल्याने घरमालकाने दीड वर्षे फ्लॅट बंद आहे की नाही, नियमित घरभाडे येत आहे की नाही, याची शहानिशा केली नसल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशी आणि फ्लॅटमालकांनी नव्या भाडेकरूबाबत सतर्क राहणे आवश्यक आहेे, भाडेकरूची माहिती व मोबाईल क्रमांक फ्लॅटमालकाकडे असणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलिसांनी केले.

