Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Dust Storm Rain Fury : वाळूच्या वादळाने राजस्थान हादरले, युपी-बिहारमध्ये पावसामुळे 48 जणांचा मृत्यू

Dust Storm Rain Fury : वाळूच्या वादळाने राजस्थान हादरले, युपी-बिहारमध्ये पावसामुळे 48 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : राजस्थानमधील चुरू, श्रीगंगानगर, बिकानेर, हनुमानगड आणि सीकर या पाच जिल्ह्यांना वाळूच्या वादळाने शनिवारी (30 मे) चांगलाच तडाखा बसला. भरदुपारी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अंधार झाल्याचे पाहायला मिळाले.

पाकिस्तानमधून आलेल्या या वादळाचा परिणाम राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांवर झाला. तसेच, गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मेघगर्जना तसेच वीज कोसळल्याने 48 जणांचा मृत्यू झाला.

राजस्थानमध्ये वादळ

पाकिस्तानमधून आलेल्या वाळूच्या वादळाने राजस्थान काहीकाळ संपूर्णपणे अंधारात गेले होते. या वादळामुळे लोकांना दिवसा आपल्या वाहनांचे हेडलाइट्स चालू ठेवावे लागले. लोक घरात धावत जाऊन दरवाजे बंद करत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. स्थानिकांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी असे वाळूचे वादळ कधीही पाहिले नव्हते. तसेच, उदयपूरसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा तडाखाही बसला. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास श्रीगंगानगर या सीमावर्ती जिल्ह्याला धडकलेल्या धुळीच्या वादळाने शहर धुळीने झाकून टाकले. अनेक ठिकाणी वाळूच्या वादळासारखे दृश्य दिसत होते. चुरू आणि बिकानेरमध्येही अशीच दृश्ये पाहायला मिळाली. सीकर जिल्ह्यातील फतेहपूर आणि लक्ष्मणगड परिसरही धुळीच्या ढगांनी व्यापला होता.

बिहार, उत्तर प्रदेशात पावसाचा हाहाकार

उत्तर प्रदेश तसेच बिहारला पावसाचा मोठा फटका बसला. मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. विद्युत खांब आणि झाडे कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तसेच यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. खराब हवामानामुळे अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले. उत्तर प्रदेशात पावसामुळे झालेल्या अपघातांमध्ये 20 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या वादळी पावसाचा फटका बुंदेलखंड आणि पूर्वांचलला सर्वाधिक फटका बसला आहे.

तसेच, बिहारसह उत्तराखंड आणि झारखंड या दोन राज्यांनाही वादळी पावसाचा तडाखा बसला. यामुळे, बिहारमध्ये 14, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये प्रत्येकी दोन मृत्यूंची नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बिहारमध्ये पुढील तीन दिवस हवामान असेच राहणार असल्याचे सांगितले आहे. देशात नौतप ऋतू सुरू असताना 10 राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. युरोपियन हवामान संस्थेने उपग्रह, महासागर आणि वातावरणीय माहितीच्या आधारे भारतासाठी 15 दिवसांचा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यानुसार, पुढील 8 दिवसांत केरळ, तामिळनाडू, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar