Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ECLGS 5.0 : उद्योगांना तातडीच्या पतपुरवठ्यासाठी सरकारी-खासगी बँकांचा संयुक्त पुढाकार

ECLGS 5.0 : उद्योगांना तातडीच्या पतपुरवठ्यासाठी सरकारी-खासगी बँकांचा संयुक्त पुढाकार

मुंबई : केंद्र सरकारच्या 'इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम 5.0' (ECLGS 5.0) योजनेचा व्यापक प्रसार आणि उद्योग क्षेत्राला सक्षम आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने आज (20 मे) मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात राज्यस्तरीय विशेष जनजागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले.

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभाग (DFS), नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी (NCGTC), 'जनसमर्थ' पोर्टल आणि पीएसबी अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला.

या परिषदेसाठी स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी, महाराष्ट्र (SLBC Maharashtra) आणि निमंत्रक बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र यांनी प्रमुख भूमिका बजावली. कार्यक्रमास महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका तसेच प्रमुख खासगी बँकांचे एमएसएमई आणि कर्ज विभाग प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय एमएसएमई चेंबर ऑफ कॉमर्स, ट्रेडर्स असोसिएशन आणि विविध एनबीएफसी संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

डिजिटल प्रक्रियेद्वारे जलद कर्जवाटपावर भर

परिषदेत ECLGS 5.0 योजनेचा लाभ राज्यातील पात्र उद्योग आणि व्यावसायिकांपर्यंत पारदर्शक व वेगवान पद्धतीने कसा पोहोचवता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. 'जनसमर्थ' या राष्ट्रीय डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून कर्ज अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ, कागदपत्रविरहित आणि पूर्णपणे डिजिटल करण्याबाबत थेट सादरीकरण करण्यात आले. तसेच कर्ज वितरण प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी बँकांनी तांत्रिक अडचणी दूर करून कॅश फ्लो आधारित क्रेडिट असेसमेंटला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

100 टक्के क्रेडिट गॅरंटीमुळे उद्योगांना मोठा दिलासा

NCGTC कडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या 100 टक्के क्रेडिट गॅरंटी कव्हरेजमुळे बँकांनी पात्र उद्योगांना तातडीने आणि विनासंकोच पतपुरवठा करावा, यावर परिषदेत विशेष भर देण्यात आला. त्यामुळे उद्योग क्षेत्रातील खेळत्या भांडवलाची टंचाई दूर होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

बँकिंग क्षेत्राचा सकारात्मक प्रतिसाद

उपस्थित सर्व सरकारी आणि खासगी बँकांच्या प्रतिनिधींनी ECLGS 5.0 योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्धता व्यक्त केली. शाखास्तरावर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यासह रिटेल आणि एमएसएमई लोन प्रोसेसिंग सेंटर्स अधिक सक्रिय करण्याचे आश्वासनही देण्यात आले. वित्तीय सेवा विभागाच्या उपसचिव गरिमा कपूर आणि अवर सचिव शैलेन्द्र कुमार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. तसेच नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनीचे उपमहाप्रबंधक हृषिकेश सावंत, सहायक महाप्रबंधक अभिषेक मालवीय, पीएसबी अलायन्सचे मुख्य वित्तीय जोखीम अधिकारी दिलीप कुमार जैन तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे महाप्रबंधक आणि एसएलबीसी महाराष्ट्रचे संयोजक उपस्थित होते. त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच पात्र उद्योजक आणि व्यावसायिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या सरकारी किंवा खासगी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा अथवा 'जनसमर्थ' पोर्टलचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar