- प्रा. डॉ. किरणकुमार जोहरे
मान्सूनच्या खर्या-खोट्या बातम्यांनी शेतकरी आणि सामान्य जनतेत गोंधळ निर्माण केला आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अंदाज नव्हे, तर अचूक हवामान माहिती अत्यंत महत्त्वाची बनली आहे.
चुकीच्या हवामान माहितीचा फटका थेट शेती, उत्पादन, बाजारभाव आणि महागाईला बसतो. अजून जन्मालाच नाही अशा एल निनोवर खापर फोडत मान्सूनची दिशाभूल हे वास्तवदेखील समजून घ्यायला हवे. मान्सून प्रगतीपथावर मग मान्सून अडकला अशा खर्या-खोट्या बातम्यांच्या खेळामुळे शेतकर्यांच्या काळजाचा ठोका चुकतो.
इराण-अमेरिका व इस्रायल संघर्ष, होर्मुझ सामुद्रधुनीतील कोंडीने वाढलेला तणाव आणि जागतिक अस्थिरतेचे पडसाद आता थेट भारतीयांच्या स्वयंपाकघरात उमटू लागले आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, सीएनजी वाहतूक आणि जीवनावश्यक वस्तूंची महागाई पुन्हा भडकली आहेत. दुसरीकडे बेरोजगारी, आरक्षणाची आंदोलने, नीट पेपरफुटी प्रकरण, विकासाच्या नावाने वृक्षांची कत्तल व पर्यावरण रक्षणासाठी कार्बन क्रेडिट विक्रीचा धंदा, शिक्षण व्यवस्थेवरील प्रश्न आणि वारंवार पेपरफुटीमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, डिझेलसाठी तंबू ठोकून शेतकर्यांच्या अनेक किलोमीटरच्या रांगा यामुळे सामान्य नागरिकांमधील अस्वस्थता सातत्याने वाढत आहे.
कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) म्हणून ओळखल्या जाणार्या काही डिजिटल आणि सामाजिक मोहिमा सामान्य माणसाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत असल्याचा दावा करतात; तर दुसरीकडे राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांचा उल्लेख करत काही संकेतस्थळांवर कारवाई करण्यात आली. या सर्व गोंधळात झुरळासारखे तग धरत जगणारा सामान्य माणूस आज मुख्य मुद्द्यांपासून महागाई, धर्म व जातीपातीच्या नावाने दिशाभूल, संभ्रम आणि अनिश्चिततेच्या विळख्यात अडकवला जात आहे.
याच काळात मान्सूनच्या खर्या-खोट्या बातम्यांनी शेतकरी आणि सामान्य जनतेत गोंधळ निर्माण केला आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अंदाज नव्हे, तर अचूक हवामान माहिती अत्यंत महत्त्वाची बनली आहे. चुकीच्या हवामान माहितीचा फटका थेट शेती, उत्पादन, बाजारभाव आणि महागाईवर बसतो. अजून जन्मालाच नाही अशा एल निनोवर खापर फोडत मान्सूनची दिशाभूल हे वास्तव देखील समजून घ्यायला हवे. मान्सून प्रगतीपथावर मग मान्सून अडकला अशा खर्या-खोट्या बातम्यांच्या खेळामुळे शेतकर्यांच्या काळजाचा ठोका चुकतो.
मान्सूनपूर्व पाऊस, मान्सूनचा पाऊस आणि मान्सूनउत्तर पाऊस अशी तीन टप्प्यांत पावसाची वर्गवारी करता येऊ शकते. याशिवाय अचानक येणारा अवकाळी पाऊस काय? हे शेतकर्यांनी समजून घेतले पाहिजे. वृत्तपत्रांतील बातम्या कधीकधी नव्हे तर अनेकदा शेतकरी आणि सामान्य माणसाच्या मनात गोंधळ निर्माण करतात. म्हणून पावसाला समजून विचार करणे महत्त्वाचे आहे.
'मान्सून' हा शब्द अरबी भाषेतील 'मौसिम' या शब्दापासून आला असून त्याचा अर्थ ऋतू किंवा हंगाम असा होतो. समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे वातावरणात ढग निर्माण करतात आणि योग्य स्थितीत त्यातून पाऊस पडतो. जून ते सप्टेंबर हा अधिकृत मान्सून भारतात असतो. पाऊस ही एक वातावरणामधली एक प्रक्रिया आहे. जून-जुलैमध्ये मान्सून हिमालयापर्यंत धडकतो. आपल्या कृषिप्रधान भारत देशाचा जुलै ते ऑक्टोबर असा खरीप हंगाम यावर अवलंबून असतो. त्यानंतर त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. यावेळी प्रामुख्याने बंगालच्या उपसागरातील बाष्पामुळे आणि 'ईशान्य मोसमी' वार्यामुळे 'रिटर्न म्हणजे परतीचा मान्सून' पाऊस देतो. या पावसावर ऑक्टोबर ते मार्च असा रब्बी हंगाम पिकतो. मात्र गेल्या काही वर्षांत मान्सून आणि वादळांचे स्वरूप झपाट्याने बदलताना दिसत आहे. अनेकदा मान्सूनपूर्व पावसालाच खरा मान्सून समजून शेतकरी पेरणी करतो आणि नंतर दुबार पेरणीचे संकट ओढवते. काहीवेळा कर्जबाजारीपणा आणि नैराश्यामुळे आत्महत्यांसारख्या टोकाच्या घटना घडतात. वादळांच्या प्रभावामुळे मान्सून लवकर आल्याचा केवळ आभास निर्माण होत आहे. हा आभासी मान्सून भारतीय शेतीसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.
केरळमधील आठ केंद्रांवर अडीच मिलीमीटर पावसाची नोंद होणे, असे निकष वादळी पावसाने केवळ पूर्ण झाले म्हणून आभासी मान्सूनलाच खरा मान्सून असे अनेकदा घोषित करण्यात येत आहे. आणि तो भारतीय शेतीला अतिशय आत्मघातकी ठरू शकतो. भारत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार केरळमधील ठरावीक केंद्रांवर सलग पाऊस पडल्यास मान्सून आगमन घोषित केले जाते. मात्र वादळी पावसामुळे हे निकष पूर्ण झाले तरी तो स्थिर मान्सून असेलच असे नाही. त्यामुळे केवळ घोषणांवर विसंबून न राहता शेतकर्यांनी स्थानिक हवामान, वातावरणातील स्थिरता आणि पुढील काही दिवसांचा अंदाज पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यायला हवा.
यालाच प्री मान्सून रेन म्हणजेच वळवाचा पाऊस असेही म्हणतात. ढोबळमानाने मार्च ते मे आणि मान्सून पॅटर्न बदलल्याने सध्या जूनमध्येही होणारा पाऊस हा मान्सूनपूर्व/वळवाचा पाऊस होय. वातावरणातील तापमान, हवेचा दाब, आर्द्रता आदी घटकांच्या लक्षणीय बदलामुळे अस्थिरता वाढल्याने हा पाऊस होतो. अजस्र क्युम्युलोनिंबस प्रकारच्या ढगांमुळे हा पाऊस होतो. वातावरणातील अस्थिरतेमुळे वादळीवारे, गडगडाट व कडकडाट असे विजांचे तांडव, गारा किंवा गारपीट, आकाशात ढगांचे पुंजके वेगवेगळ्या रंगछटा वा शेडमध्ये दिसणे ही हा पाऊस ओळखण्याची साधी लक्षणे किंवा खूण आहे. हा पाऊस दोन प्रकारे कोसळतो.
दिवसभर उष्णता वाढल्यामुळे दुपारी 12 वाजेनंतर आणि जास्त करून 2 वाजेनंतर हवा तापल्याने ऊर्ध्व झोत निर्माण होत खालून वरच्या दिशेने हवेचा प्रवास होऊन अस्थिरतेमुळे दिवसा पडतो. सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर हवा थंड होऊन वरून खालच्या दिशेने येऊ लागल्याने ढगात घुसळण होत अस्थिरतेने रात्री ते पहाटे सूर्य नसताना पाऊस पडतो. मान्सूनोत्तर पाऊस हाच पाऊस मान्सून पश्चात किंवा पोस्ट मान्सून म्हणून पण ओळखला जातो. यात मान्सूनपूर्व पावसाप्रमाणेच सर्व लक्षणे वातावरणात असतात. ढोबळमानाने याचा कालावधी ऑक्टोबर व नोव्हेंबर असा असून याची तीव्रता कमी असते.
मान्सूनपूर्व पाऊस आणि खरा मान्सून यात स्पष्ट फरक असतो. मान्सूनच्या पावसात ढगांचे पुंजके दिसत नाहीत तर आकाश समान एका रंगांच्या शेडमध्ये काळपट दिसते. पाऊस रिपरिप पडत राहतो. मान्सूनपूर्व पावसातली कुठलीच लक्षणे दिसत नाहीत, कारण वातावरण स्थिर झालेले असते. वातावरणातील अस्थिरतेचे क्युम्युलोनिंबस ढगांची निर्मिती होत मान्सूनपूर्व पावसात गडगडाट, वादळी वारे, गारपीट आणि ढगांचे पुंजके दिसतात. तर खर्या मान्सूनमध्ये वातावरण स्थिर असते आणि वातावरणातील स्थिरतेमुळे निंबोस्ट्रेटस ढगांची निर्मिती होत सतत रिपरिप पाऊस पडत राहतो. हा साधा फरक समजून घेणे आज अत्यंत गरजेचे बनले आहे.
2019 मध्ये प्रकर्षाने जाणवलेला व बदललेल्या मान्सून पॅटर्नमुळे महाराष्ट्रातील लाखो हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली होती. परिणामी आज एक रुपये किलोपर्यंत विकला जात असलेल्या कांद्याचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. यावरून चुकीच्या हवामान आकलनाचा थेट विपरित परिणाम महागाईवर कसा होतो हे स्पष्ट दिसते. रोजच्या जीवनातील वापराचे कांदा, डाळी, तेलबिया, खाद्यतेल आणि भाजीपाल्याचे वाढलेले दर सामान्य नागरिकांच्या जगण्याला अस्थिर करतात व एकंदर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करतात.
आज कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सुपरकॉम्प्युटर्स, उपग्रह, डॉप्लर रडार नेटवर्क आणि रिअल टाईम हवामान विश्लेषणाची क्षमता भारताकडे उपलब्ध आहे. त्यामुळे बदलत्या हवामानानुसार मान्सूनचे निकष, मॉडेल्स आणि अंदाज प्रणाली अधिक वास्तववादी करण्याची गरज निर्माण झाली आहे. देशहितासाठी हवामान विभाग, संशोधक, प्रसारमाध्यमे आणि शेतकरी यांच्यात खुला वैज्ञानिक संवाद होणे अत्यावश्यक आहे.
(लेखक हवामान संशोधक, ढगफुटीतज्ज्ञ आहेत.)

