Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
FWICE : रणवीर सिंहआधी 'या' सेलिब्रिटींवरही घालण्यात आली होती बंदी

FWICE : रणवीर सिंहआधी 'या' सेलिब्रिटींवरही घालण्यात आली होती बंदी

'डॉन 3' चित्रपट ऐनवेळी सोडल्यामुळे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने अभिनेता रणवीर सिंहविरोधात बंदी जारी केली आहे. मात्र, चित्रपटसृष्टीतील अशा प्रकारची बंदी किंवा कडक कारवाईचा सामना करणारा रणवीर सिंह हा पहिलाच कलाकार नाही.

यापूर्वीही अनेक बड्या बॉलिवूड स्टार्सवर वेगवेगळ्या कारणांमुळे बंदी घातली होती. आज आपण हे स्टार्स कोणते होते आणि त्यावर का कारवाई करण्यात आली होती हे जाणून घेऊयात.

चंकी पांडे

अभिनेता चंकी पांडेवर FWICE ने बंदी घातली होती. मीडिया रिपोर्टनुसार 1987 मध्ये जेव्हा त्यांच्या 'आग ही आग' या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. तेव्हा इंडस्ट्रीत संप पुकारण्यात आला होता आणि शूटिंगला परवानगी नव्हती. तरीही निर्माते पहलाज निहलानी यांनी बंगळूरमध्ये शूटिंग सुरू ठेवले. इतकंच नाही उटीमध्येही शूटिंग पार पडले. या नियमांच्या उल्लंघनामुळे तेव्हा अनेक जणांवर कारवाई करण्यात आली होती.

दिलजीत दोसांझ

अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझवर FWICE ने असहकार निर्देश जारी केले होते. फेडरेशनने भारतीय कलाकारांना पाकिस्तानी नागरिकांसोबत काम न करण्याचे आवाहन केले होते. मात्र, दिलजीतच्या 'सरदार जी 3' या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर मुख्य भूमिकेत होती आणि दिलजीत या चित्रपटाचा सह-निर्माता देखील होता. त्यामुळे FWICE ने त्यांच्या 5 लाख कर्मचाऱ्यांना दिलजीतसोबत काम न करण्याचे आदेश दिले होते, तसेच 'बॉर्डर 2' चित्रपटातून त्याला काढून टाकण्याची मागणीही केली होती. नंतर भूषण कुमार यांच्या मध्यस्थीमुळे त्याला 'बॉर्डर 2' चे शूटिंग पूर्ण करण्याची परवानगी मिळाली.

मिका सिंग

2019 मध्ये प्रसिद्ध गायक मिका सिंगवर FWICE ने बंदी घातली होती. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचलेला असताना मिका सिंगने पाकिस्तानमधील कराची शहरात जाऊन एका हाय-प्रोफाइल लग्नात गाण्याचा कार्यक्रम केला होता. हे लग्न पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या जवळच्या नातेवाईकाचे होते. भारतात यावर तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर मिकावर बंदी आणली गेली. अखेर मिका सिंगने फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि ही बंदी एका आठवड्यात मागे घेण्यात आली.

साजिद खान

'मी टू' (Me Too) मोहिमेदरम्यान अनेक महिलांनी दिग्दर्शक साजिद खानवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाची दखल घेत FWICE ने साजिद खानवर चित्रपट दिग्दर्शन करण्यासाठी एका वर्षाची बंदी घातली होती.

गौहर खान

2021 मध्ये कोरोना महामारीच्या काळात अभिनेत्री गौहर खानवर FWICEने दोन महिन्यांची कठोर बंदी घातली होती. कोरोना पॉझिटिव्ह असून डॉक्टरांनी क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला असतानाही गौहर नियमांचे उल्लंघन करून एका चित्रपटाच्या सेटवर शूटिंगसाठी पोहोचली होती. पालिकेने तिच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर FWICEने तिच्यावर ही कारवाई केली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar