Friday, 25 Oct, 5.40 am My महानगर

क्रीडा
गांगुलीसोबत चर्चा करण्यास उत्सुक!

सौरव गांगुलीशी चर्चा करण्यास मी उत्सुक आहे, असे विधान भारताचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी केले. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहली हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती असून मी लवकरच त्याच्याशी चर्चा करणार आहे, असे गांगुली म्हणाला होता.

गांगुलीला भेटण्याबाबत कोहलीला विचारले असता त्याने सांगितले, मी त्याला भेटणार आहे. मी त्याच्याशी चर्चा करण्यास उत्सुक आहे. तो याआधी खूप क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे आम्ही कोणत्या परिस्थितीत आहोत, संघाला कशाची गरज आहे, भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी काय केले पाहिजे, हे त्याला ठाऊक आहे. आम्ही चांगली, व्यावसायिक, गंभीर चर्चा करू. मी सध्या खेळत आहे आणि तो याआधी खेळला आहे, त्यामुळे आम्ही एकमेकांना चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. मी याआधी त्याच्याशी चर्चा केली आहे आणि आताही आमच्यात चांगली चर्चा होईल असे मला वाटते.

कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने मागील काही वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कोहलीचा हा संघ सध्या जागतिक कसोटी क्रमवारीत पहिल्या, एकदिवसीय क्रमवारीत दुसर्‍या, तर टी-२० क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे. मात्र, आता भारताने आयसीसीच्या स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे गांगुलीला वाटते. तसेच गांगुलीला अध्यक्षपदी नऊ महिन्यांचाच कार्यकाळ मिळणार असला तरी या काळात भारताला जगातील सर्वोत्तम संघ बनवण्यासाठी तो कोहलीला पूर्ण पाठिंबा देणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top