Tuesday, 19 Jan, 7.10 am My महानगर

महाराष्ट्र
ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे मोठे यश, भाजप सर्वात मोठा पक्ष

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निम्म्याहून अधिक निकाल लागले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप आघाडीवर असून त्याखालोखाल शिवसेनेने मुसंडी मारली आहे. राज्यातील 12,711 ग्रामपंचायतींपैकी भाजपने 2,203, शिवसेनेने 2,049, राष्ट्रवादीने 1,939, काँग्रेसने 1,531, मनसे 36 आणि इतरांनी 2,071 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. ग्रामपंचायतींचा कौल आल्याने अनेक पक्षांची चिंता वाढली असून काहींवर तर महापालिकेतील सत्ता टिकवण्याचे संकट उभे राहिले आहे.
अजूनही 2,882 ग्रामपंचायतींचे निकाल लागायचे बाकी आहेत. त्यामुळे या सुमारे तीन हजार जागा कुणाच्या पारड्यात जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपनेच जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. युती आणि आघाडीचा विचार केल्यास आघाडीने युतीपेक्षा प्रचंड यश मिळवले आहे. त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
गावगाड्याचा कौल आल्याने अनेक पक्षांची चिंता वाढली आहे. महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्षाचे यश भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जाते. ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हांवर लढल्या जात नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीत कोणता पक्ष वरचढ ठरला हे तांत्रिक दृष्ट्या ठरवता येत नाही; पण उद्या येणार्‍या पालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये तिन्ही पक्ष एकत्र आल्यास भाजपला त्याचा मोठा फटका बसू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीची गणिते वेगळी असतात आणि जिल्हा परिषद, नगरपरिषदा आणि पालिका निवडणुकीतील गणिते वेगळी असतात. त्यामुळे आताच्या निकालावरून इतर निवडणुकींचा अंदाज काढणे योग्य नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही गावातील असते. गावात जवळपास सर्वच ओळखीचे असतात. नातेवाईक आणि भावकी असते. त्यामुळे आपसातीलच उमेदवार उभा केला जातो. त्यात बरीच राजकीय अंडरस्टँडिंग असते. त्यामुळे पंचायतीचे निकाल वेगळे येतात. त्याचे प्रतिबिंब इतर निवडणुकीत फारसे उमटत नाही. मात्र, राजकीय हवा निर्माण करण्यासाठी किंवा फसवा राजकीय भास निर्माण करण्यासाठी या विजयाचा वापर केला जाऊ शकतो, असे राजकीय निरीक्षक सांगतात.
औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या मतदारांचा काहीच रोल नसतो. त्यामुळे या महापालिकेतील राजकीय समीकरणावर पंचायत निकालाचा परिणाम होत नाही. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याच बाजूने जनतेने कौल दिल्याचं सांगून आपल्याच पक्षाची लाट कशी निर्माण झाली आहे, अशी हवा निर्माण करण्यासाठी राजकीय पक्षांना ग्रामपंचायत निकालाचा हत्यारासारखा वापर करता येऊ शकतो. पालिका निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या निकालाचे ढोल बडवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्याचा काही प्रमाणात राजकीय पक्षांना फायदाही होईल. पण पालिकेतील सत्तांतर करण्याएवढा हा मुद्दा महत्त्वाचा नसेल. त्यासाठी पालिकेतील समस्यांना घेऊनच राजकीय पक्षांना निवडणुकीचा प्रचार करावा लागणार आहे, असे राजकीय निरीक्षकांनी सांगितले आहे.

प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायती -१२,७११

निकाल जाहीर -११,८०४

भाजप २,६३२
शिवसेना २,५७६
राष्ट्रवादी २,४००
काँग्रेस १,८२३
मनसे ३६
स्थानिक २,३३७

गाव कारभार्‍यांनो, आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या. स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया भक्कम करणारी आणि महात्मा गांधीजींचे ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात आणणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेतील ग्रामपंचायत हा महत्वाचा घटक आहे.गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे.
-अजित पवार, उपमुख्यमंत्री.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील यश हे महाविकास आघाडीचे यश असून काँग्रेसला विदर्भात ५० टक्के यश मिळाले आहे. महाविकास आघाडीला ८० टक्के जागा राज्यात मिळाल्या आहेत. चार ते साडेचार हजार गावात सरपंच हे काँग्रेसचे झालेले दिसतील. या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे की भाजपच्या आजी आणि माजी प्रदेशाध्यक्ष यांना त्यांची गावे सुद्धा सांभाळता आली नाहीत.
-बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

राज्यातील जनतेचा विश्वास अगदी ठामपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सगळ्याच महाविकास आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.महाविकास आघाडी एकजुटीने जनतेसाठी काम करत आहे.
-आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री.

ज्याप्रकारे भाजपला लोकांनी समर्थन दिले आहे त्याचा मला अतिशय आनंद आहे. आम्ही समर्थन दिलेले सगळ्या पॅनलने ग्रामपंचायतीमध्ये चांगला विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाडा. उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल. सगळ्या भागात भाजपा एक नंबरचा पक्ष झाला आहे. इतर पक्षांच्या तुलनेत आम्ही खूप पुढे गेलो आहोत.
-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top