Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Hath Bhatti Daru : हातभट्टीत जळणार्‍यांवर तेल ओतणारी यंत्रणा

Hath Bhatti Daru : हातभट्टीत जळणार्‍यांवर तेल ओतणारी यंत्रणा

स्वातंत्र्यानंतर भारताने अवकाश भरारी घेत अनेक उपग्रह प्रक्षेपित केले, परंतु,जमिनीवरील परिस्थिती फार बदल झालेला नाही. गरीब वस्त्यांमधील पत्र्यांच्या शेडमध्ये कोणाच्या घरी कॅनमध्ये हातभट्टीच्या दारूच्या रूपाने ही वस्तुस्थिती दिसते.

मुळात अशी हातभट्टीची विषारी दारू पिऊन आतापर्यंत हजारो जणांनी प्राण गमावूनही, अशा विक्रीवर नियंत्रण कसं येत नाही, हा प्रश्न आहेच. याला कारणीभूत आहे,ज्यांना यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली आहे, त्या यंत्रणा.


24 जण गेले. 31 मे रोजी पुणे विषारी दारू कांडातील मृतांचा आकडा पुन्हा वाढला.आधीच रस्ते अपघातात माणसं होलसेलमध्ये मरत असताना पुण्यात विषारी दारूमुळे माणसं पटापट,काही मिनिटांच्या अंतराने मेल्याची बातमी समोर आली. या विषारी दारू सेवनामुळे एकाच वेळी बर्‍याच जणांचा मृत्यू झाल्याने या बातमीला प्रसिद्धी मिळाली आणि एरवी शांत असलेल्या यंत्रणा कामाला लागल्या. या प्रकरणात आतापर्यंत ९ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. तर राज्य उत्पादन शुल्क विभागातील १३ अधिकारी-कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल्सचा समावेश असल्याचे वृत्त आहे.

एकूण २२ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आता संबंधित अधिकार्‍यांची चौकशी होईल,त्यांना जी काय शिक्षा व्हायची ती होईल न होईल. काही दिवसांनी लोक पण ही बातमी विसरतील.पुन्हा तेच चक्र सुरू राहून वाडी,वस्त्या,मोहोल्यांमध्ये नेहमीप्रमाणे पत्रा शेडमध्ये, तर कोणाच्या घरातून तीच हातभट्टीची दारू विकली जाईल. पुन्हा तोच माणसे होलसेलमध्ये मरण्याचा धोका पुन्हा निर्माण होईल. कारण हातभट्टीची दारू पिऊन माणसं उदरांसारखी मरण्याची ही पहिली वेळ नाही.आतापर्यंत देशात अनेक वेळा अशा घटना घडल्या आहेत,पुन्हा घडणार नाहीत,याचीही काही शाश्वती नाही.याला कारण सामाजिक स्थिती आणि ज्यांना अशा गोष्टी रोखण्याचं काम दिलंय त्या सरकारी यंत्रणा.

पुुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे सुरू झालेल्या या मृत्यूच्या तांडवानंतर जे मृत्यूमुखी पडले आहेत,त्यांची आर्थिक स्थिती पाहता नेमका कोणता समाज यात गुरफटला गेला आहे,याची कल्पना येईल.तसेच दुसरीकडे या अशा अवैध दारू धंद्यांना पाठिंबा देणारे सरकारी यंत्रणेतील कर्मचारी आणि अधिकारी यांची भूमिका पाहता असे काळे धंदे राजरोसपणे कसे सुरू असतात,याची कल्पना येईल. पुण्यातील दारूकांडानंतर जिल्ह्यातील आनंदवन, काटेवस्ती, संजयनगर, आझाद चौक आणि जय महाराष्ट्र चौक या परिसरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. याप्रकरणात आरोपींनी दारु खरेदी केल्यानंतर अधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने त्यामध्ये मिथेनॉल मिसळले. मिथेनॉलमुळे दारुचे प्रमाण दुप्पट झाले. मात्र यावेळी मिथेनॉल नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात मिसळले गेले आणि ती दारु विषारी बनली. अनेकांचा जीव घेणारी ठरली.नवसागर आणि मिथेनॉल यांचा या हातभट्टीच्या अवैध दारू बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये वापर केला जात असल्याने ही दारू अधिकच घातक ठरत आहे. त्यात मिथेनॉलमुळे दृष्टी जाणे,अवयव निकामी होण्यासारख्या गंभीर घटना समोर आल्या आहेत.

भारतात विषारी दारू ही अनेक दशकांपासून गंभीर सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची समस्या राहिली आहे. अनेक वेळा हे मृत्यू ग्रामीण, गरीब किंवा मजूर वस्त्यांमध्ये होत असल्याने वास्तविक आकडे अधिक असण्याची शक्यता असते. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो अर्थात एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये भारतात विषारी किंवा बनावट दारूमुळे 421 लोकांचा मृत्यू झाला. 2023 मध्ये हा आकडा 522 होता.तर 2022 साली 708 जणांनी विषारी दारू पिऊन आपला जीव गमावला होता.पुणे विषारी दारू कांडाच्या आधी देखील देशातील विविध राज्यांत आतापर्यंत अनेक जणांनी या विषारी दारूचे सेवन केल्यामुळे आपला जीव गमावला आहे.

अहमदाबाद येथे 2009 मध्ये झालेल्या विषारी दारू दुर्घटनेत सुमारे 136 जणांचा मृत्यू झाला होता. ही भारतातील सर्वात मोठ्या दारूकांडांपैकी एक मोठी घटना मानली जाते. यावेळी मिथेनॉल मिश्रित दारू हे प्रमुख कारण असल्याचे तपासात समोर आले. 2011 साली बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने सुमारे 170 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. अनेक जण रुग्णालयात दाखल झाले होते. हे भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण दारूकांडांपैकी एक होते. उत्तर प्रदेशच्या अलिगड येथे 2021 मध्ये मिथेनॉलयुक्त दारूमुळे 106 लोकांचा मृत्यू झाला. गुजरातच्या बोताड आणि आसपासच्या भागात 2022 मध्ये विषारी दारूमुळे 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तपासात दारूत औद्योगिक मिथेनॉलचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले.बिहारमध्ये 2016 पासून संपूर्ण दारूबंदी लागू असली तरी बेकायदेशीर दारूचे जाळे कायम असल्याचे दिसून आले.

राज्य पोलिसांच्या माहितीनुसार, 2016 ते 2026 दरम्यान विषारी दारूमुळे 354 लोकांचा मृत्यू झाला आहे.तामिळनाडूतील कल्लाकुरिची दारूकांडात 2024 साली विषारी दारू दुर्घटनेत मृतांचा आकडा 69 पर्यंत पोहोचला. 2025 साली पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील माझीठा भागातील अनेक गावांमध्ये 2025 मध्ये विषारी दारूमुळे 17 जणांचा मृत्यू झाला. अनेक आरोपींना अटक करण्यात आली.देशातील या विषारी दारूच्या सेवनाने घडलेल्या घटनांपैकी काही ठळक घटना आहेत.अजून कित्येक घटनांमध्ये अनेकजण या विषारी दारूचे शिकार ठरले असतील.

आपल्या देशात संपूर्ण देशभर दारूबंदी लागू नाही.ज्या ठिकाणी दारूबंदी आहे,त्याठिकाणी काही विशेष परवान्यांद्वारे पर्यटक किंवा वैद्यकीय कारणांसाठी मर्यादित सवलत मिळू शकते. दारू विक्री, सेवन आणि उत्पादन याबाबतचे कायदे राज्य सरकारे ठरवतात. गुजरातमध्ये 1960 पासून दारूबंदी लागू आहे.बिहारमध्ये एप्रिल 2016 पासून संपूर्ण दारूबंदी लागू आहे. नागालँडमध्ये 1989 पासून दारूबंदी आहे. विक्री, सेवन, साठवणूक आणि उत्पादनावर बंदी आहे.तर लक्ष्यद्विपच्या बहुतांश बेटांवर दारूबंदी आहे. तर काही राज्यांमधील दारूबंदीच्या धोरणांमध्ये बदल करण्यात आले आहेत.आता एकंदरित विषारी दारूमुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांच्या प्रमाणावर कायमची दारूबंदीबाबतच्या निर्णयाचा सकारात्मक असा परिणाम दिसायला हवा, पण तो दिसत नाही. कठोर कायदे केल्यानंतरही आणि निर्णय घेतल्यानंतरही अशा घटना या घडतानाच दिसत आहेत. दारूबंदी असलेल्या राज्यांमध्येही बेकायदेशीर हातभट्टी दारू, तस्करी आणि विषारी दारूच्या घटना वारंवार समोर येतच आहेत.

भारतात,दारू,तंबाखू ही सरकारला सर्वाधिक कर देणारी उत्पादनं आहेत. संपूर्ण देशात राज्यांच्या धोरणांनुसार आणि दारूच्या ब्रँडनुसार,दारूवरील कर कमी जास्त असतो.परंतु,इतर वस्तूंच्या तुलनेत शासनाची तिजोरी भरण्यात दारू आणि इतर तंबाखूजन्य वस्तूंचा मोठा वाटा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर असूनही,मोठ्या प्रमाणात दारू विक्री आणि सेवन महाराष्ट्रासह भारतात होत आहे. यात दारू पिणारा आपल्या आर्थिक कुवतीनुसार दारू पित असतो.कोण बियर, कोण व्हिस्की,कोण रम अशा अनेक वर्गवारीत दारू पिणारे आहेत. त्यात प्रत्येकाचा एक वेगळा ब्रँड आहे. प्रत्येकाचा एक वेगळा वर्ग आहे. या कॅटेगरीमध्ये सर्वात खालच्या थरात येतात,ते हातभट्टीची दारू पिणारे.ज्यात केवळ बेकायदेशीरपणे दारू निर्मिती करून, कोणतेही नियम न पाळता,अल्कोहोलचे आणि इतर घटकांचे प्रमाण न तपासता,स्वच्छता न पाळता मद्य तयार केलं जाते. केवळ अगदी 20 रूपयांपासून प्लास्टिकच्या पिशवीत मिळणारी ही दारू सर्वात स्वस्त असते. बेकायदेशीर असल्याने कराचा प्रश्नच येत नाही. उलट ही स्वस्तातील दारू अधिक प्रभावी आणि ती मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठी मिथेनॉलसारखे पदार्थ वापरले जातात,जे अनेक जणांचे जीव घेताना दिसत आहेत.हे जीव फक्त एकटेच जात नाहीत,तर त्यांच्यासोबत अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होताना दिसत आहेत.

देशात या अशा व्यसनांमुळे कुटुंबेच्या कुटुंबे आणि पिढ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. शिक्षणाचा अभाव, हातावरील पोट, मग त्यात व्यसनाची गरज भागवण्यासाठी ही स्वस्तात मिळणारी दारू पिण्याचा पर्याय समाजातील एका वर्गाकडे असतो.त्यात ते एवढे बुडून जातात,की स्वत:सहीत त्यांची कुटुंबही दावणीला बांधली जातात. स्वातंत्र्यानंतर भारत देशाने प्रगती केली. देश अगदी चंद्रावर गेला.अनेक सॅटेलाईट सोडले गेले. परंतु,जमिनीवरील परिस्थिती काही भागांत तशीच आहे,हे नाकारता येणार नाही. वस्त्यांमधील पत्र्यांच्या शेडमध्ये,कोणाच्या घरी कॅनमध्ये हातभट्टीच्या दारूच्या रूपाने ही वस्तुस्थिती दिसते. मुळात अशी हातभट्टीची विषारी दारू पिऊन आतापर्यंत हजारो जणांनी प्राण गमावूनही,अशा विक्रीवर नियंत्रण कसं येत नाही, हा प्रश्न आहेच. याला कारणीभूत आहे,ज्यांना यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली आहे,त्या यंत्रणा.स्वत:चा काही आर्थिक फायदा व्हावा,म्हणून या यंत्रणांतील काही अधिकारी अशा दारू अड्डयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात,आणि त्याची परिणीती ही होते,की अनेकजण आपला जीव गमावतात.

देश सुरक्षित राहावा,नागरिकांना हानी पोहोचू नये म्हणून सीमेवर जवान,गुप्तचर यंत्रणा काम करत असतात.तीच दक्षता देशाच्या आतील भागात का घेतली जात नाही,हा देखील प्रश्न आहेच. या यंत्रणेतील काही अधिकारी आणि कर्मचारी या हातभट्ट्यांमध्ये तेल टाकण्यातच मश्गुल असतात. याआधीदेखील दारू,ड्रग्ज प्रकरणात अनेक जबाबदार अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. परंतु,त्यानंतरही फारसा फरक पडलेला नाही.त्यामुळे जोपर्यंत अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई होत नाही,तोपर्यंत काही दिवसांनी,महिन्यांनी आणि वर्षांनी अशाच घटना घडताना दिसण्याचीच शक्यता जास्त आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar