Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
I Am Cuba Movie : क्युबातील क्रांतीचं वास्तव!

I Am Cuba Movie : क्युबातील क्रांतीचं वास्तव!

- प्रा. डॉ. अविनाश कोल्हे

हात्माजींच्या नेतृत्वाखाली भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य. त्याचप्रमाणे 1949 साली माओने चीनमध्ये केलेली मार्क्सवादी क्रांती. नंतरची महत्त्वाची घटना म्हणजे जुलै 1953 मध्ये क्युबात फिडेल कॅस्ट्रोने केलेली क्रांती.

यापैकी नोंद केलेल्या या घटनांवर अनेक चित्रपट बनले आहेत. दुसर्‍या महायुद्धावर किती चित्रपट बनले याचा तर हिशेब नाही. त्या तुलनेत क्युबातील क्रांतीवर फारसे चित्रपट बनले नाहीत. म्हणूनच 1964 साली आलेला 'आय अ‍ॅम क्युबा' हा चित्रपट महत्त्वाचा ठरतो.


विसाव्या शतकाचा पूर्वार्ध तसेच उत्तरार्ध वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा समजला जातो. पूर्वार्धात दोन महायुद्धं झाली. 1917 साली रशियात कामगार क्रांती झाली आणि ऑगस्ट 1945 मध्ये अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकून जगाला अणूशक्तीचे संहारक रूप दाखवून दिले. 1945 साली दुसरे महायुद्ध संपले आणि विसाव्या शतकाचा उत्तरार्ध सुरू झाला. यातील पहिली महत्त्वाची घटना म्हणजे महात्माजींच्या नेतृत्वाखाली भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य. त्याचप्रमाणे 1949 साली माओने चीनमध्ये केलेली मार्क्सवादी क्रांती. नंतरची महत्त्वाची घटना म्हणजे जुलै 1953 मध्ये क्युबात फिडेल कॅस्ट्रोने केलेली क्रांती. यापैकी नोंद केलेल्या या घटनांवर अनेक चित्रपट बनले आहेत. दुसर्‍या महायुद्धावर किती चित्रपट बनले याचा तर हिशेब नाही. त्या तुलनेेत क्युबातील क्रांतीवर फारसे चित्रपट बनले नाहीत. म्हणूनच 1964 साली आलेल्या 'आय अ‍ॅम क्युबा' हा चित्रपट महत्त्वाचा ठरतो.

या चित्रपटाची चर्चा करण्याअगोदर क्युबातील क्रांतीबद्दल जुजबी का होर्इना माहिती असणे गरजेचे आहे. क्युबा (लोकसंख्या ः 97 लाख, राजधानी ः हवाना) हा देश भौगोलिकदृष्ठ्या लॅटीन अमेरिकेतील छोटा देश आहे. या देशाचा आकार महत्त्वाचा नाही तर याचे भौगोलिक स्थान. हा देश अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतापासून फक्त 90 मैल दूर आहे. श्रीलंकेसारखं क्युबा हे एक बेट आहे. हे तपशील लक्षात घेतले म्हणजे अमेरिकेला क्युबातील कम्युनिस्ट राजवटीबद्दल किती राग असेल याचा अंदाज येतो. त्याआधी जगात झालेल्या मार्क्सवादी क्रांती अमेरिकेपासून शेकडो मैल दूर असलेल्या देशांत (रशिया, चीन वगैरे) झाल्या होत्या. क्युबातील क्रांती म्हणजे भांडवलशाही व्यवस्था प्रमाण मानणार्‍या देशांचे नेतृत्व करणार्‍या अमेरिकेच्या नाकाखाली. ही क्रांती फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा या तरुणांनी केली होती. तेव्हापासून म्हणजे 1953 सालापासून अगदी आजपर्यंत म्हणजे 2026 सालापर्यंत क्युबातील साम्यवादी सरकार अमेरिकेला खुपत आलं आहे.

आता चित्रपटाबद्दल. या कृष्णधवल चित्रपटाला सलग असं कथानक नाही. यात चार कथा आहेत ज्यातून प्रेक्षकांसमोर एक कथानक तयार होतं. या चारही कथांत तेव्हाच्या क्युबातील कमालीची गरीबी, लोकांनी जमेल तेव्हा याचा केलेला सामना वगैरेंचं चित्रण आहे. यातून अधूनमधून 'मी क्युबा आहे कॅसिनो, रात्रीच्या धमाल पार्ट्यांचा क्युबा तसेच गरीबांचा क्युबा आहे' असं एका स्त्रीच्या आवाजात प्रेक्षकांना सांगण्यात येतं. यातील पहिल्या कथेत मारीया नावाच्या क्युबन तरुणीची कथा आहे. तिला गरीबीपोटी वेश्याव्यवसाय करावा लागतो. या कथेच्या निमित्ताने क्युबात मजा करायला आलेले अमेरिकन धनदांडगे, त्यांच्याजवळ असलेली अमाप संपत्ती आणि सर्वसामान्य क्युबन माणसाची गरीबी वगैरेंचे दर्शन होतं. एका रात्री एक श्रीमंत अमेरिकन मारीयाला म्हणतो की, मला तुझ्या घरी यायचं आहे..तुम्ही लोक कुठे राहता? कसे राहता, हे मला बघायचं आहे. श्रीमंत अमेरिकन गिर्‍हार्इकाची मागणी मारीया नाकारू शकत नाही. त्या निमित्ताने दिग्दर्शक मिखाईल कालाटोझोव यांनी हवाना शहराच्या बाहेर असलेली स्थानिक क्युबन लोकांची वस्ती आणि तेथील अठराविश्व दारिद्य्र दाखवलं आहे.

दुसरी कथा पेद्रो या छोट्या शेतकर्‍याची आहे. यावर्षी त्याच्या शेतात उसाचे जबरदस्त पीक आलं आहे. मात्र शेताचा मालक त्याला सांगतो की त्याने हे शेत अमेरिकन कंपनीला विकले आहे. आता शेतकर्‍याला हे शेत, हे घर, हा परिसर सर्व सोडून जावं लागेल. एवढी वर्षं या शेतापलीकडे काहीही माहिती नसलेला पेद्रो अंतर्बाह्य उद्ध्वस्त होतो. (इथं मला आनंद यादवांची 'गोतावळा' ही कादंबरी आठवली). पेद्रोच्या शोकांतिकेला कारणीभूत म्हणजे अमेरिकन भांडवलदार. या नव्या शक्तींना शरण जाण्याऐवजी पेद्रो शेताला आग लावून देतो आणि मृत्यूला कवटाळतो.

तिसरी कथा आहे, हवाना विद्यापीठातील पुरोगामी विचारांच्या विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाची. अशा विद्यार्थ्यांचा नेता म्हणजे एनरिके. त्याला आता छोट्यामोठ्या क्रांतीकारक कृत्यांचा कंटाळा आला आहे. काही तरी मोठं, भव्यदिव्य केलं पाहिजे, या विचाराने त्याच्या मनाचा ताबा घेतला आहे. तो स्वत: एकट्याने हवाना शहराच्या पोलीस आयुक्तांच्या खुनाचा कट रचतो. रायफलमधून तो नेम धरतो तेव्हा त्याला दिसते आयुक्त पत्नी आणि मुलाबाळांसह न्याहरी करत आहे! अशा स्थितीत रायफलचा चाप ओढण्याची हिंमत त्याच्यात येत नाही. तो तेथून पळतो. दुसर्‍या दृश्यात त्याचे साथी क्रांती कार्याबद्दलची पोस्टर्स चिकटवत असतात, लोकांना वाटत असतात. तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांचा पाशवी हल्ला सुरू होतो. यात लाठीमार होतो. गोळीबार होतो. यात एनरिकेला गोळी लागते आणि तो मरतो. मात्र त्याच्या प्रेतयात्रेत बघता बघता सर्व शहर सामील होतं.

शेवटच्या कथेत एक शेतकरी मारीओना क्रांती कार्यात सहभागी व्हायला नकार देतो. एक क्रांतीकारक त्याला क्रांतीनंतर कसं जीवन चांगलं असेल वगैरे सांगतो. पण मारीओना 'मला शांतपणे शेती करत जगायचं आहे', म्हणत नकार कायम ठेवतो. एवढंच नव्हे तर तो क्रांतीकारकांना निघून जाण्यास सांगतो. ही सर्व चर्चा सुरू असताना सरकार सर्वत्र बॉम्बहल्ले सुरू करतं. यात शेतकर्‍याचं घर, शेतात उभं असलेलं पीक आणि कुटुंब सर्वच उद्ध्वस्त होतं. आता तो शेतकरी चिडून उठतो आणि डोंगरात असलेल्या क्रांतिकारकांना सामील होतो. चित्रपटाच्या शेवटी सर्व क्रांतिकारक हवाना शहरात विजेत्याच्या थाटात शिरताना दाखवले आहेत.

सुमारे सव्वादोन तास चाललेला 'आय अ‍ॅम क्युबा' चित्रपट कधी संपतो कळतच नाही. फिडेल कॅस्ट्रो या तरुणाने अमेरिकेच्या हातातील बाहुलं असलेल्या हुकुमशहाच्या विरोधात केलेली क्रांती, हा या चित्रपटाचा विषय आहे. यामुळे यात आपोआपच अमेरिकन भांडवलदारीच्या विरोधातील चित्रण आलं आहे. ते तसं चुकीचं नाहीच. या चित्रपटाचे दिग्दर्शक मिखार्इल कालाटोझोव हे एक नामवंत रशियन दिग्दर्शक आहेत. त्यांचा दुसरा गाजलेला चित्रपट म्हणजे 1957 साली आलेला 'द के्रन आर फ्लाईंग'. 'आय अ‍ॅम क्युबा' हा चित्रपट बनला तो काळ म्हणजे 1960 चं दशक. आज 2026 मध्ये हा चित्रपट बघताना यातील काही संदर्भ, काही भूमिका, काही गृहितकं तपासून घ्याव्या लागतील. खास करून 1990 साली सोव्हिएत युनियनचं झालेलं विघटन लक्षात घ्यावं लागेल. असं असलं तरी चित्रपटाचं कलात्मक मूल्यं यत्किंचितही कमी झालेलं नाही. अनेक अभ्यासकांनी या चित्रपटाच्या छायाचित्रणाची मुक्तकंठाने प्रशंसा केलेली आहे. शिवाय लझ मारीया कोलाझो (मारीया), जोसे गेलार्डो (पेद्रो), राऊल गार्सिया (एनरिके) वगैरेंचा उच्च दर्जाचा अभिनय. यामुळे हा चित्रपटातील अनेक संदर्भ आज जरी पाचपन्नास वर्षं जुने असले तरी त्यातील पात्रांचं दु:ख, दारिद्य्र, त्यांचं होत असले़लं अमानुष शोषण आणि यावर मात करण्याची त्यांची धडपड हे सर्व कालातीत आहे हे मात्र जाणवतं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar